आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मॉस्को:पुतीनविरोधी बुलंद आवाज कोमात; प्रकृती गंभीर, विरोधी पक्षनेते अॅलेक्सी नावाल्नी यांना चहातून विष देण्याचा प्रयत्न

मॉस्कोएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • 12 वर्षांपासून गैरकारभाराची लक्तरे टांगल्याने तुरुंगवास

रशियाचे विरोधी पक्ष नेता अॅलेक्सी नावाल्नी यांना विमान प्रवासादरम्यान चहातून विष देण्यात आले. त्यामुळे त्यांना सायबेरियातील रुग्णालयात दाखल केले आहे. त्यांची प्रकृती गंभीर आहे. राष्ट्रपती पुतीन यांचे कट्टर विरोधक अशी ४४ वर्षीय नावाल्नी यांची आेळख आहे. जूनमध्ये संविधानिक सुधारणांवर झालेल्या मतदान प्रक्रियेला त्यांनी संविधानाचे उल्लंघन असे संबोधले होते. २०१७ मध्ये नावाल्नी यांच्यावर हल्ला झाला होता. पुतीन यांना धडकी भरवणारी व्यक्ती नेमकी आहे तरी कोण? हे जाणून घेऊया...

पुतीन यांना का वाटे भीती : तरुण पाठीराख्यांची मोठी फौज, अनेकवेळा तुरुंगवासानंतरही लढा सुरूच रशियात विरोधी गटातील बुलंद आवाज व मजबूत प्रतिमा अशी नावाल्नी यांची आेळख आहे. २००८ मध्ये एक ब्लॉग लिहून राजकारण व सरकारी कंपन्यांतील भ्रष्टाचाराचा भंडाफोड करून त्यांनी थेट सरकारशी शत्रुत्व स्वीकारले. नावाल्नी यांना पहिल्यांदा २०११ मध्ये अटक झाली. सरकारविरोधी रॅलीत सहभागी झाल्याप्रकरणी त्यांना १५ दिवसांची शिक्षा झाली. निवडणुकीत पुतीन यांच्या पक्षाच्या विजयाबाबत नावाल्नी यांनी सोशल मीडियावर काही छायाचित्रे पोस्ट केली. निवडणुकीतील गैरव्यवहाराची ही छायाचित्रे होती. त्यामुळे पुतीन यांच्या अडचणी वाढल्या. अनेक प्रश्न उपस्थित झाले. २०१२ मध्ये दुसऱ्यांदा राष्ट्रपती झाल्यानंतर पुतीन यांनी नावाल्नी यांच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीची फौजदारी चौकशी करण्याचे आदेश दिले. त्यांना किरोव शहरातील अग्निकांड प्रकरणात ५ वर्षांची शिक्षा झाली. मात्र, दुसऱ्याच दिवशी त्यांची सुटका झाली. कारण त्यांच्यावरील आरोप सिद्ध होऊ शकला नव्हता.

२०१३ मध्ये मॉस्कोच्या मेयर निवडणुकीत पुतीन यांचे सहकारी सोब्यानिन यांच्याविरोधात मैदानात होते. त्यात ते दुसऱ्या क्रमांकावर राहिले. त्याद्वारे नावाल्नी यांनी पुतीन विरोधी मोहिमेला आणखी वरच्या टप्प्यावर पोहोचवले होते. त्यानंतर नावाल्नी यांना रशियाच्या टीव्हीवर बंदी घालण्यात आली. नावाल्नी आपली मते सोशल मीडिया, ब्लॉगद्वारे मांडू लागले. पुतीन व त्यांच्या सहकाऱ्यांवर त्यांनी प्रखर शब्दांत तसेच व्यंगात्मक शैलीतही टीका करणे सुरूच ठेवले. त्यातून त्यांना तरुण समर्थकांची मोठी फळी मिळाली. मार्च २०१८ मधील निवडणुकीसाठी त्यांनी २०१६ पासून प्रचार सुरू केला. परंतु, त्यांना निवडणूक लढवण्यास मनाई करण्यात आली. एप्रिल २०१७ मध्ये नावाल्नी यांच्या एका डोळ्यात अज्ञात हल्लेखोराने केमिकल फेकले होते. त्यांना उपचारासाठी बाहेर जाऊ दिले जात नव्हते. मानवी हक्क परिषदेच्या हस्तक्षेपानंतर स्पेनमध्ये त्यांना उपचाराची परवानगी मिळाली.

बातम्या आणखी आहेत...