आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गॉर्डन रॅमसेंच्या कन्येचा वडिलांची अब्जावधींची संपत्ती घेण्यास नकार:स्वतःचा खर्चदेखील उचलणार; म्हणाली, मी माझ्या मेहनतीने संपत्ती कमावणार

लंडन2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

ब्रिटिश सेलिब्रिटी शेफ आणि ‘गॉर्डन रॅमसे रेस्टॉरंट’ चेनचे अब्जाधीश गॉर्डन रॅमसे यांची मुलगी माटिल्डा तिच्या वडिलांच्या १,१०० कोटी रुपयांपेक्षा जास्त (११ अब्ज रुपये) संपत्तीचा वारसा घेणार नाही. २१ वर्षांची माटिल्डा स्वतःचा खर्च स्वतः करते. ती म्हणते, माझे वडील माझे आदर्श आणि चांगले मित्र आहेत पण मी स्वतःसाठी पैसे कमावणार आहे. मी माझ्या मेहनतीने संपत्ती निर्माण करीन. माटिल्डा तिच्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत आहे. ती सोशल मीडियावर प्रभावी व्यक्तिमत्व आहे. तिचे इन्स्टाग्रामवर १२ लाख आणि टिकटॉकवर १० लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. वयाच्या १४ व्या वर्षी, ‘सीबीबीसी’ ची शेफ मालिका ‘मेटिल्डा अँड द रॅमसे बंच’ इतकी लोकप्रिय झाली की अनेक शहरांतील किशोरवयीन मुलांनी स्वत: स्वयंपाक करायला सुरुवात केली.

माटिल्डाच्या विचारसरणीचे व परिश्रमाचे कारण म्हणजे तिचे संगोपन. गॉर्डन व त्याची पत्नी ताना यांनी आपल्या मुलांचे इतर श्रीमंतांप्रमाणे संगोपन केले नाही. त्यांना परिश्रमांचे महत्त्व समजावले. गॉर्डन सांगतात की त्यांनी कधीही विमानांच्या बिझनेस क्लासमधून मुलांना प्रवास घडविला नाही. ते म्हणतात, बिझनेस क्लासपर्यंत पोहोचण्यासाठी कष्ट करून त्यांनी स्वत: कमवावे. त्यांनी पाचही मुलांसाठी स्क्रीन टाइम निश्चित केला होता. त्यांचा दिनक्रम ठरलेला होता. मुले हा दिनक्रम पाळतात की नाही याकडे पालक दोघेही लक्ष देत असत. माटिल्डाला घरी टिली म्हणतात. टिली आणि तिची इतर भावंडे लहानपणापासूनच घरातील कामात मदत करायची. मुलांना स्वच्छतेची सवय लावली. गॉर्डन म्हणतात, सर्व मुले घरातील सर्व कामे करतात. लंडनमधील कोट्यवधींच्या बंगल्यात वाढलेली माटिल्डा जगभर फिरते. ती स्वतःची कमाईही दान करते.

कष्ट न करता मिळालेली संपत्ती माणसाचा नाश करते : गॉर्डन रॅमसे ‘द टेलिग्राफ’ शी बाेलताना गॉर्डन रॅमसे म्हणाले की मला संपत्ती देऊन मुलांचे नुकसान करायचे नाही. मी त्यांना अशा प्रकारे वाढवले ​​आहे की ते स्वतःचे विश्व निर्माण करू शकतात. कष्टाशिवाय संपत्ती माणसाचा नाश करते. गाॅर्डन यांची इंग्लंड-अमेरिकेसह जगात ५८ रेस्टॉरंट आहेत. धाकट्या मुलीच्या १६ व्या वाढदिवसानिमित्त ते आणखी एक रेस्टॉरंट उघडणार आहेत.

बातम्या आणखी आहेत...