आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रंजक:फक्त विश्वासावर 30 वर्षांपासून सुरू अाहेत दुकानदार नसलेली मिझाेराममधील दुकाने, गरजेच्या वस्तू घ्या अाणि पैसे पेटीत टाका

ऐझवाल (मिझाेराम)एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • शेतकऱ्यांनी पर्यटकांसाठी थाटली दुकाने; यात ना काेणी किंमत सांगणारा, ना पैसे घेणारा
  • मालाच्या सुरक्षिततेसाठी येथे सीसीटीव्ही पण नाही, कधीही चाेरी झालेली नाही

तुम्ही कधी रस्तामार्गे मिझाेरामला गेला तर महामार्गावर दुकाने अाहेत, पण खरेदीच्या बदल्यात पैसे घेणारा दुकानदार नाही. अशी अनेक दुकाने तुम्हाला दिसतील. या दुकानात ग्राहकांवर नजर ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरा नाही. तरीही फळे, भाजीपाला, पेय, रेशन विक्रीची ही दुकाने जवळपास ३० वर्षांपासून अशीच सुरू अाहेत. मिझाेरामच्या स्थानिक भाषेत ‘नगाह लाेह द्वार’ या नावाने ही दुकाने अाेळखली जातात. म्हणजेच ‘दुकानदार नसलेली दुकाने.’ या दुकानात मालाच्या किमतीची यादी ठेवलेली असते. माल खरेदी केल्यावर ग्राहकाला दुकानातील पेटीत पैसे टाकावे लागतात. साधारण १९९० पासून या दुकानांचा विस्तार सुरू झाला. राजधानी ऐझवाल ते लुंगलेई महामार्ग या ६० किलाेमीटरच्या पट‌्ट्यातील बक्तांग, तलुंगवेल, थिंगसुल्थलिया या गावांमध्ये ही दुकाने बघायला मिळतात. महामार्गावरून जाणारे पर्यटक वा ट्रकचालक हेच या दुकानांचे सर्वाधिक ग्राहक अाहेत. दैनंदिन जीवनात ही दुकाने चांगली कमाई करतात. परंतु लाॅकडाऊनमध्ये पर्यटक घटण्याचा या दुकानांवरही प्रतिकूल परिणाम झाला. अशाच एका दुकानाचे ललरिथपुईया गावाचे शेतकरी म्हणाले, राेज ५००-१००० रुपयांचे उत्पन्न मिळायचे, पण अाता खूप घटले अाहे. पर्यटक येण्याचे थांबले व ट्रकच ये-जादेखील कमी झाली. लवकरच परिस्थिती पूर्वपदावर येईल अशी अाशा अाहे. दुकानात सतत थांबणे शक्य नसल्याने दुकानदाररहित व्यवस्था सुरू झाली. ती अगदी सुरळीत सुरू आहे.

भाजीपाला, फळे, पेय अन् मासेही मिळतात या दुकानांत...
गावातील शेतकरी हे विश्वासाचे दुकान चालवतात. शेतकरी सकाळी शेतातून ताजी भाजी, फळे, फळांचा रस, पिण्याचे पाणी, सुके मासे अाणि गरजेचे दुसरे सामान दुकानात नेऊन ठेवतात. बांबूच्या काड्यांपासून तयार केलेला पावीशा बाॅन म्हणजे पैशाचा गुल्लक दुकानात ठेवलेला असताे. या गुल्लकमध्ये सुटे पैसेही ठेवलेले असतात. संध्याकाळी शेतावरून परतताना शेतकरी शिल्लक राहिलेला माल दुकानात तसाच ठेवून पैसे घेऊन घरी जातात.

बातम्या आणखी आहेत...