आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सर्वात मोठी आनंदाची वार्ता:लवकरच कोरोनावर लस, ऑक्सफर्डच्या कोरोना लसीची मनुष्यांवरील दुसरी चाचणीही यशस्वी

लंडन2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अँटिबॉडीजसह कोरोनाला नष्ट करणाऱ्या टी-सेल्सही वाढल्या; भारतात त्याची चाचणी पुढील महिन्यात

कोरोना व्हायरसविरुद्धच्या लढ्यात ब्रिटनमधून आनंदाची वार्ता आहे. ऑक्सफर्ड विद्यापीठाची लस मनुष्यांवरील चाचणीच्या पहिल्या व दुसऱ्या टप्प्यात यशस्वी ठरली आहे. लॅन्सेट या वैद्यकीय नियतकालिकात सोमवारी प्रकाशित निकालांनुसार ही लस सुरक्षित आढळली. तिचा मनुष्यांवर धोकादायक दुष्परिणाम आढळला नाही. या लसीने कोरोनाला निष्क्रिय करणाऱ्या अँटिबॉडीजची मात्रा वाढवलीच, व्हायरसविरुद्ध लढणाऱ्या इम्यून टी-सेल्सचीही पातळी वाढवली. तथापि, संशोधकांनी सांगितले की, ही लस काेरोनाविरुद्ध प्रभावीपणे सुरक्षा करते की नाही याची खात्री होण्यासाठी तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या गरजेच्या आहेत. ऑक्सफर्डच्या प्रो. सराह गिल्बर्ट म्हणाल्या, आम्हाला खूप काम करायचे आहे. तूर्त निकाल आशादायक आहेत.

ऑक्सफर्डने लस अॅस्ट्राजेनेका कंपनीसोबत तयार केली आहे. अॅस्ट्राजेनेकाने पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटशी उत्पादनाचा करार केलेला आहे. सीरम इन्स्टिट्यूटचे सीईआे अदर पूनावाला म्हणाले, ‘आम्ही आॅक्सफाेर्ड लसीवर काम करत आहोत. भारतात आॅगस्टपर्यंत मानवी चाचण्या होतील. लस २०२० च्या अखेरीस उपलब्ध होऊ शकते.

चिंपांझीच्या सर्दीला कारणीभूत व्हायरसपासून लस तयार केली आहे, तो व्हायरस कोरोनासारखाच आहे
या लसीचे नाव सीएचएडीआेएक्स १ एनसीआेव्ही-१९ असे आहे. चिंपांझीच्या सर्दीस कारणीभूत होणाऱ्या व्हायरसचे जेनेटिक इंजिनिअरिंग करून ही लस तयार केली आहे. हे कोरोना व्हायरससारखेच आहे. वैज्ञानिकांनी त्यात कोरोना व्हायरसच्या स्पाइक प्रोटीनचे जेनेटिक इंन्स्ट्रक्शनही टाकले आहेत. म्हणजेच ही लस कोरोना व्हायरससारखीच आहे. जेव्हा लस शरीरात जाते तेव्हा पेशी स्पाइक प्रोटीन तयार करतात. त्या इम्यून सिस्टिमला कोरोनाला ओळखून त्यांचा नायनाट करण्याचे प्रशिक्षण देतात.

भारत सरकारचे वैज्ञानिक सल्लागार म्हणाले : पुढे सर्व ठीक राहिले तर डिसेंबर ते जानेवारीपर्यंत आपल्यालाही लस मिळेल
नवी दिल्ली | ऑक्सफर्डच्या लसीमुळे भारतातही उत्साह आहे. देशाचे मुख्य वैज्ञानिक सल्लागार डॉ. प्रो. के. विजयराघवन म्हणाले, ‘सर्व काही ठीक राहिले तर डिसेंबर ते जानेवारीपर्यंत भारताला लस मिळेल. ऑक्सफर्डने सर्वात मोठा अडथळा पार केला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे लसीचे गंभीर साइड इफेक्ट्स नाहीत. दुसऱ्या टप्प्यात मोठे दुष्परिणाम दिसले नसतील तिसऱ्या टप्प्यातील चाचण्यांसह लस लाँच केली जाऊ शकते. नियामक लसीला तत्काळ परवानगी देऊ शकतात. एआयमुळे रिस्क मॅनेजमेंटचा अचूक आकडा अल्पावधीतच मिळतो.
- दरम्यान, दिल्ली एम्समध्ये सोमवारी भारतात निर्मित पहिली कोरोना लस ‘कोवाक्सिन’ची मानवी चाचणी सुरू झाली. १०० पेक्षा जास्त स्वयंसेवकांना लसीचे डोस देण्यात आले आहेत.

अँटिबॉडी आणि टी-सेल्स नेमके करतात तरी काय?
अँटिबॉडीज राेगप्रतिकार क्षमतेचाच एक भाग आहेत. अँटिबॉडी या इम्यून सिस्टिमपासून निर्मित प्रोटीन आहेत, त्या व्हायरसच्या पृष्ठभागाला चिकटून त्याला निष्क्रिय करतात. टी- सेल्स हा पांढऱ्या पेशींचाच एक प्रकार आहे. त्या शरीरातील संक्रमित पेशींना शोधून नष्ट करतात.

१०७७ लोकांवर चाचण्या, ताप-डोकेदुखीचे साइड इफेक्ट
१८ ते ५५ वर्षे वयाेगटातील १०७७ लाेकांवर चाचण्या झाल्या. इंजेक्शन दिल्यानंतर १४ दिवसांत लाेकांतील टी-सेल्सचे प्रमाण अत्युच्च पातळीवर गेले. २८ दिवसांनी अँटिबॉडीही प्रचंड वाढल्या. लसीचे ताप व डोकेदुखी हे साइड इफेक्ट्स आहेत. मात्र ते साध्या पॅराासिटामॉलनेही बरे होतात.

जगभरामध्ये तयार होत असलेल्या लसींची स्थिती
लस टप्पे

- आॅक्सफर्ड विद्यापीठ 2*
- वुहान इन्स्टिट्यूट 2
- कॅन सिनाे बायाेलाॅजिक्स 2
- माॅर्डेना 2
- इन्स्टिट्यूट आॅफ मेडिकल बायाेलाॅजी 2
- सिनाेव्हॅक 2
- बायाेएनटेक 1**
- इम्पीरियल काॅलेज लंडन 1
- नाेव्हाव्हॅक्स 1
* मानवी चाचणीचा दुसरा आणि तिसरा टप्प्पा एकाच वेळी सुरू आहे.
**पहिला, दुसरा आणि तिसरा टप्पा एकाच वेळी सुरू आहे.

बातम्या आणखी आहेत...