आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा1970 मध्ये क्युंग सूकचा दक्षिण कोरियात जन्म झाला. त्याच्या जन्मानंतर लगेचच त्याच्या आईचा मृत्यू झाला. गरीबीमुळे वडिलांनी त्याला एका देखभाल केंद्रात सोडले. जेणेकरून काही पैसे गोळा झाल्यावर ते पुन्हा त्याला स्वतःसोबत ठेवू शकतील. मात्र असे झाले नाही. सूकचे वडील त्याला परत आणतील त्याच्या आधीच एका दत्तक संस्थेने त्याला अनाथ ठरवत नॉर्वेत पाठवून दिले.
दक्षिण कोरियात 1950 ते 80 दरम्यान दत्तक संस्थांनी सूक प्रमाणेच सुमारे 2 लाख बालकांना परदेशात पाठवले होते. अमेरिकन माध्यम संस्था एनपीआरच्या शोध वृत्तात दावा करण्यात आला आहे की, यापैकी हजारो बालकांना खोटे बोलून आणि त्यांची ओळख लपवून परदेशी लोकांना दत्तक देण्यात आले होते.
दक्षिण कोरियाच्या सरकारी संस्थांवरही घोटाळ्यात सहभागाचा आरोप लावण्यात आला आहे. तिथल्या सरकारने घटनेच्या चौकशीसाठी एका आयोगाची स्थापना केली आहे. या आयोगाला ट्रुथ अँड रिकन्सिलेशन कमिशन असे नाव देण्यात आले आहे. ज्या बालकांना फसवून परदेशात पाठवण्यात आले त्यांची माहिती आणि नोंदींचा तपास हा आयोग करणार आहे.
फसवून दत्तक दिलेल्या बालकांसाठी दक्षिण कोरियाने स्थापन केला आयोग
दक्षिण कोरियाच्या ट्रुथ अँड रिकन्सिलेशन आयोगाने 8 डिसेंबर 2022 रोजी म्हटले की, फसवून परदेशात दत्तक दिलेल्या बालकांच्या प्रकरणाची चौकशी ते सुरू करणार आहेत. एनपीआरच्या वृत्तानुसार, दक्षिण कोरियातून बालके दत्तक घेतलेल्या सुमारे 400 जणांनी त्यांच्या दत्तक केसच्या तपासाची मागणी केली आहे. तपासाच्या अर्जासाठी सरकारने 9 डिसेंबर ही शेवटची तारीख दिली होती.
यावरूनच हा अंदाज लावला जाऊ शकतो की कोरियात बेकायदेशीरपणे बालके दत्तक देण्याचे प्रकरण किती मोठे आहे. हा आयोग सुरुवातीला केवळ 34 प्रकरणांचाच तपास करणार आहे. यात त्या 51 जणांचा समावेश आहे, ज्यांनी ऑगस्ट महिन्यात तपासासाठी अर्ज केला होता.
आयोगाच्या तपासाचे जे परिणाम असतील त्याच्या आधारे दुसरे लोकही या दत्तक संस्था किंवा सरकारविरोधात नुकसान भरपाईसाठी खटला सुरु करू शकतील. ज्या दत्तक संस्थांवर फसवणुकीचे आरोप आहेत, त्यात दोन मोठ्या कंपन्या आहेत. पहिली आहे - हॉल्ट चिल्ड्रन सर्व्हिस आणि दुसरी आहे - कोरिया सोशल सर्व्हिस. 2024 पूर्वी हा तपास पूर्ण होण्याचा अंदाज आहे.
खोटे बोलून बालकांना युरोप आणि अमेरिकेत दत्तक देण्याचे जास्त प्रकरणे 1950 ते 1980 च्या दशकातील आहेत. यापैकी अनेक प्रकरणांतील बालके हे गरीब कुटुंब आणि अविवाहित महिलांचे होते. आपली बालके रुग्णालयातच ठेवण्यासाठी त्यांच्यावर दबाव टाकण्यात आला होता. दत्तक देण्यासाठी या बालकांची कागदपत्रे बदलली जायची. या बालकांना कागदोपत्री अनाथ दाखवले जायचे आणि त्यांच्या आई-वडिलांना त्यांची माहिती दिली जात नसे.
दक्षिण कोरियातून बालके दत्तक घेण्यास कशी सुरुवात झाली
1954 मध्ये अमेरिकेच्या ओरेगॉन भागातून बर्था आणि हॅरी हॉल्ट नावाचे दाम्पत्य कोरियन युद्धात अनाथ झालेल्या बालकांवरील एक प्रेझेन्टेशन बघायला गेले होते. यावेळी दक्षिण कोरिया युद्धाच्या परिणामांतून बाहेर पडण्यासाठी धडपडत होता.
हे प्रेझेन्टेशन पाहून बर्थाचे ह्रदय हेलावले. द न्युयॉर्क टाईम्सच्या एका वृत्तानुसार, तिने एके ठिकाणी लिहिले होते की त्या लहान बालकांचे उदास चेहरे पाहून वाटत होते की जणू ते त्यांच्या देखभालीसाठी कुणाचा तरी शोध घेत आहेत. तेव्हा अमेरिकेत परदेशातून दोन पेक्षा जास्त बालके दत्तक घेण्यावर बंदी होती. मात्र 1955 मध्ये ओरेगॉनच्या दोन सीनेटर्सनी कोरियन युद्धात अनाथ झालेल्या बालकांसाठी एक विधेयक सादर केले. जेणेकरून हॉल्ट आणि त्यांच्या पत्नीला कोरियातील अनाथ बालकांना दत्तक घेता येईल.
हे विधेयक संमत झाल्यावर हॉल्ट यांनी कोरियातून चार मुले आणि चार मुली दत्तक घेतल्या. ही बातमी दुसऱ्या दिवशी वृत्तपत्रात प्रकाशित झाल्यावर हॉल्ट यांना अनेक पत्र आले. यात अनेक दाम्पत्यांनीही कोरियन युद्धातील अनाथ बालकांना दत्तक घेण्याची इच्छा व्यक्त केली.
एका वर्षातच हॉल्ट दाम्पत्याने एक अडॉप्शन कार्यक्रम सुरु केला. यानंतर दक्षिण कोरियातही हॉल्ट एजन्सी स्थापन करण्यात आली. हळूहळू या एजन्सीने केवळ अमेरिकाच नव्हे तर अनेक युरोपीय देशातील लोकांनीही बालके दत्तक घेतली. ही एजन्सी आज जगातील सर्वात मोठी दत्तक संस्था आहे.
कोरियाप्रमाणेच जॉर्जियाती हजारो बालकांना चुकीच्या पद्धतीने दत्तक देण्यात आले होते. दक्षिण कोरियातील दत्तक घोटाळ्यासारखाच घोटाळा 1980 ते 2005 दरम्यान जॉर्जियातही झाला होता. द टेलिग्राफच्या वृत्तानुसार, तिथे यावेळी हजारो बालकांना बेकायदेशीरपणे मृत घोषित करत दत्तक संस्थांना विकले जायचे. ते नंतर त्यांना दुसऱ्या देशांत पाठवायचे.
दक्षिण कोरियात युद्धानंतर जे झाले तसे अनेक देशांत यापूर्वीही घडले आहे. जगभरात अनेक नोंदी डिजिटल झाले आहेत. डिएनए टेक्नोलॉजीही सातत्याने अद्ययावत होत आहे. अशात आंतरराष्ट्रीय अॅडॉप्शन ट्रेडवरही कठोर निगराणी केली जात आहे. दक्षिण कोरियातील घटनेने यावर शिक्कामोर्तब केले आहे की बालके दत्तक देण्याच्या व्यवसायात केवळ पैशांनाच महत्व देण्यात आले.
युद्धादरम्यान युक्रेनमधूनही बालकांना चुकीच्या पद्धतीने रशियात पाठवल्याचा दावा
ही केवळ दक्षिण कोरियाचीच कहाणी नाही. तर 2022 मध्येही युद्धादरम्यान युक्रेनमधून हजारो बालकांना रशियात पाठवण्यात आले. युक्रेनचे राष्ट्रपती वोलोदोमीर झेलेन्स्कींचा दावा आहे की, युद्धादरम्यान आतापर्यंत सुमारे 2 लाखांपेक्षा जास्त बालकांना अपहरण करून रशियात पाठवण्यात आले आहे.
एनवायटी आणि अलजजीराच्या वृत्तात दावा करण्यात आला आहे की, या बालकांना तिथल्या लोकांनी दत्तक घेतले आहे. युद्धापूर्वी रशियात परदेशी बालकांना दत्तक घेणे बेकायदेशीर होते. मे 2022 मध्ये पुतिन यांनी कायदा बदलून परदेशी बालके दत्तक घेण्याचा अधिका दिला.
सप्टेंबरमध्ये अमेरिकेच्या राजदूत लिंडा थॉमस संयुक्त राष्ट्रात महणाल्या की जुलै 2022 मध्ये अपहरण केलेली 1800 पेक्षा जास्त युक्रेनी बालके रशियन लोकांनी दत्तक घेतली आहेत. तथापि, रशियाचे राजदूत वासिली नेबेन्झियांनी अमेरिकेचे आरोप फेटाळऊन लावले आणि म्हटले की, पोलंड आणि युरोपीय संघाप्रमाणे रशियातही युक्रेनी लोकांसाठी शरणार्थी शिबिर उभारण्यात आले आहेत. ते म्हणाले की, युक्रेन किंवा रशियाच्या नियंत्रणातील भागातूल 6 लाख बालके आणि युक्रेनीयन लोक रशियात आले. त्यांना तुरुंगाऐवजी शरणार्थी शिबिरांत ठेवण्यात आले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.