आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Sudoku's Godfather Maki Kazi Dies; Maki Kazi Says Puzzles Are Like A Treasure Hunt; News And Live Updates

श्रद्धांजली:सुडोकूचे गॉडफादर माकी काजी यांचे निधन; माकी काजी म्हणायचे-कोडे तयार करणे हे खजिन्याचा शोध घेण्यासारखे काम, ते सोडवण्याचा प्रयत्न करण्याची मजा अद्भुतच

टोकियो2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 100 वर देशांत सुडोकूला लोकप्रियता मिळवून दिली, 15 वर्षांपासून त्याचे वर्ल्ड चॅम्पियनशिप होते

जगातील १०० पेक्षा जास्त देशांत २० कोटींपेक्षा जास्त लोकांचे आवडते कोडे सुडोकूचे ‘गॉडफादर’ म्हटले जाणारे माकी काजी (६९) यांचे निधन झाले. काजी यांच्या निकोली कंपनीने ही माहिती दिली. सुडोकूचा शोध स्विस गणितज्ञ लियोनहार्ड यूलर यांनी १८ व्या शतकात लावला होता. पण काजींनी ते लोकप्रिय बनवले. १९८० मध्ये त्यांनी त्याला आपल्या मॅगझिनमध्ये स्थान दिले. लोकांना ते एवढे आवडले की, त्याची डिजिटल आवृत्ती आणावी लागली. २००६ पासून दरवर्षी त्याची वर्ल्ड चॅम्पियनशिप आयोजित करण्यात येऊ लागली. त्यातही काजींना बोलावले जात होते. काजींनी हे कसे घडवले ते वाचा...

कोड्यांची मजा समजावून सांगण्यासाठी ३० देशांत फिरले काजी, त्यांच्या पुस्तकांसाठी दुकानांत पझल कॉर्नर तयार झाले
१९५१ मध्ये सेपोरात जन्मलेल्या काजींनी हायस्कूलनंतर कियो विद्यापीठात प्रवेश घेतला. पण १९७० मध्ये जपान-अमेरिका सुरक्षा कराराच्या विरोधामुळे अनेक वर्ग रद्द झाले. काजींना शिक्षण सोडावे लागले आणि ते एका प्रिंटिंग कंपनीशी जोडले गेले. यादरम्यान एका अमेरिकी मॅगझिनमध्ये नंबर गेमचे हे कोडे त्यांना दिसले. १९८० मध्ये त्यांनी मित्रांसोबत ‘पझल सुशिन निकोली’ हे जपानचे पहिले कोड्यांचे मॅगझिन सुरू केले. त्याच मॅगझिनमध्ये ‘आकड्यांनी एकाकी राहावे, अविवाहित’ या नावाच्या शीर्षकासह कोडे सुरू केले. त्याचे ‘सुडोकू’ हे संक्षिप्त नाव खूप लोकप्रिय झाले. १९८३ मध्ये त्यांनी निकोली कंपनीची स्थापना केली. काजींनी त्रैमासिक पझल मॅगझिनमध्ये कोडी बनवणे सुरू केले. ती कोडी फक्त कर्मचाऱ्यांनी तयार केलेलीच नव्हती तर प्रशंसकांच्या कल्पनेची मदत घेऊनही नवी कोडी तयार करण्यात आली. त्यांच्या कंपनीने एकानंतर एक अशी कोड्यांची पुस्तके प्रकाशित करण्यास सुरुवात केली.

त्यामुळे जपानच्या पुस्तकांच्या दुकानांत पझल कॉर्नर दिसू लागले. २००४ मध्ये ब्रिटिश वंशाच्या एका प्रशंसकाने जपान दौऱ्यात ते पाहिले आणि ‘द टाइम्स’ पेपरमध्ये त्याला स्थान दिले. कोड्यांत दडलेला आनंद समजावून सांगण्यासाठी काजींनी ३० पेक्षा जास्त देशांचा प्रवास केला. सुडोकू चॅम्पियनशिपने १०० देशांतील २० कोटींवर लोकांना आकर्षित केले, असा निकोलीचा दावा आहे. काजी एका मुलाखतीत म्हणाले की, ‘मी जेव्हा कोड्यासाठी नवा विचार पाहतो तेव्हा उत्साहित होतो. चांगले कोडे बनवण्यासाठी नियम सोपे असणे गरजेचे असते. ते खजिना शोधण्यासारखे आहे. कोडे सोडवण्याचा प्रयत्न करण्याची मजा अद्भुत आहे.’ काजी नेहमी म्हणत,‘मला सुडोकूचा गॉडफादर व्हायचे नाही. जपानमध्ये कोड्यांची शैली स्थापित केली अशा व्यक्तीच्या रूपात माझी ओळख होईपर्यंत कोड्यांची मजा देण्याची माझी इच्छा आहे.’ काजींनी जपानलाच नव्हे तर संपूर्ण जगाला सुडोकूद्वारे आपला प्रशंसक बनवले.

बातम्या आणखी आहेत...