आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातालिबानने अफगाणिस्तानात मुलींच्या विद्यापीठीय शिक्षणावर पूर्णपणे बंदी घातली आहे. तालिबानचे उच्च शिक्षणमंत्री नेदा मोहम्मद नदीम यांनी सर्व सरकारी आणि खासगी विद्यापीठांना पत्र लिहिले आहे. पुढील नोटीस जारी होईपर्यंत हा नियम लागू राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
संयुक्त राष्ट्रांनी (UN) या निर्णयावर चिंता व्यक्त केली आहे. सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी बुधवारी सांगितले की, हे मुली आणि महिलांच्या मानवी हक्कांचे उल्लंघन आहे. त्याचवेळी अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटोनी ब्लिंकन यांनी तालिबानला आंतरराष्ट्रीय समुदायाचे सदस्य मानले जाऊ शकत नाही, असे सांगितले.
शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींमध्ये संताप
बीबीसीशी बोलताना अफगाणिस्तान विद्यापीठात शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीने सांगितले की, तालिबानने मला माझ्या भविष्याशी जोडणारा एकमेव पूल नष्ट केला. मला विश्वास होता की मी अभ्यास करून माझे जीवन बदलू शकते, परंतु तालिबानने माझ्या आशा धुळीस मिळवल्या.
तालिबानने यापूर्वीही मुलींचे शिक्षण केले होते बंद
तालिबानने अफगाणिस्तानचा ताबा घेतल्यानंतर मुलींच्या शिक्षणावर एक वक्तव्य जारी केले होते. त्यात म्हटले होते की, मुलींना मुलांच्या शाळेत शिकता येणार नाही. त्यांना फक्त महिला शिक्षक किंवा वृद्ध पुरुषच शिकवू शकतात. तालिबानने मुला-मुलींना शाळेत एकत्र बसण्यासही बंदी घातली होती. त्यांच्या माध्यमिक शालेय शिक्षणावरही बंदी घालण्यात आली होती.
महिलांनी 3 महिन्यांपूर्वीच दिली होती परीक्षा
तालिबानने 3 महिन्यांपूर्वीच महिलांना विद्यापीठाच्या प्रवेश परीक्षेला बसण्याची परवानगी दिली होती. अफगाणिस्तानातील अनेक राज्यांत हजारो मुली आणि महिलांनी परीक्षा दिली होती. मात्र, तालिबानने विद्यापीठातील विषयांच्या निवडीवर निर्बंध लादले. महिलांना अभियांत्रिकी, अर्थशास्त्र, विज्ञान, कृषी या विषयांचा अभ्यास करता येत नव्हता.
तालिबान मुळात दहशतवादी संघटना
आंतरराष्ट्रीय समुदायात तालिबान ही दहशतवादी संघटना मानली जाते. जगातील अनेक देश याला सरकारी दर्जा देत नाहीत. तालिबानने देशात इस्लामिक कायदा लागू केला आहे. महिलांना हिजाब घालणे; उद्याने, जिम, स्विमिंग पूल अशा ठिकाणी न जाण्यासारखे निर्बंध लादण्यात आले आहेत. आता त्यांना मुलींच्या शिक्षणावर बंदी आणायची आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.