आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तालिबानी राजवट:आता ड्रग्जचीही दहशत वाढवणार तालिबान; अफूची शेती आणि पाकिस्तानच्या मदतीने ड्रग्जचा धंदा वाढत जाणार

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अफगाणिस्तानवर आता तालिबानी राजवट आहे. यामुळे अफगाणिस्तानला जगभरातून मिळणारी ७.४३ लाख कोटी रुपयांची मदत बंद होणार आहे. अमेरिकेने अफगाणिस्तानचा ७०,३०० कोटींचा राखीव निधी गोठवला. आयएमएफनेही ३,४५० कोटींचा आपत्कालीन राखीव निधी गोठवला. काही दिवसांत इतर देशही मदत थांबवतील. मग तालिबान आपला खर्च भागवण्यासाठी काय करेल? त्याच्या उत्तराने जगाचा थरकाप होत आहे. कारण तालिबान आता अफूचे आंतरराष्ट्रीय नेटवर्क आणखी मजबूत करेल. अफूला ड्रग्जमध्ये बदलून युरोप, अमेरिका व भारतासह आशियन देशांत विकून आधीपेक्षा जास्त पैसे कमावेल. तालिबानी नेटवर्कमधील ६ लाखांपेक्षा जास्त लोक फक्त अफू शेतीवर अवलंबून आहेत. २००१ मध्ये अमेरिकी लष्कर अफगाणिस्तानात उतरले तेव्हापासून तालिबानचे ड्रग्ज नेटवर्क आणखीच मजबूतच झाले आहे. यामुळे अफगाणिस्तानची अफू रोखणे हेच जगासाठी सर्वात मोठे आव्हान असेल.

अफूची शेती आणि पाकिस्तानच्या मदतीने ड्रग्जचा धंदा वाढत जाणार, कारण सध्या तेथे रोजगाराची मुळीच अपेक्षा नाही
तालिबान ड्रग्ज का विकत आहे?

कारण, त्याद्वारेच ८० हजार योद्ध्यांना फंडिंग होते. नाटोनुसार, २०२० मध्ये तालिबानने ड्रग्जद्वारे ११ हजार कोटी रुपये कमावले. २००१ मध्ये अफूचे उत्पादन १८० टन होते, ते २००७ मध्ये वाढून ८,००० टन झाले. तेव्हा अफगाणिस्तानच्या जीडीपीच्या तुलनेत अफूच्या अवैध धंद्याचा वाटा ६०% होता. अफगाणिस्तानात जगातील स‌र्वात नशिली अफू पिकते. तीच जगभरात प्रोसेस्ड ड्रग्ज म्हणजे हेरॉइनच्या रूपात पोहोचते, ते मूळ अफूपेक्षा १५०० पट जास्त नशिले आहे.

या धंद्यात कोण-कोण मदत करते?
सर्वात मोठी मदत पाकिस्तानची आहे, कारण ७०% हेरॉइन पाकिस्तानमार्गेच इतर देशांत पोहोचते. ड्रग्जच्या व्यवहाराचे केंद्र दुबईत आहे. फेब्रुवारी २०२१ मध्ये अमेरिकी संस्थांनी अफगाण सरकारला हेही सांगितले होते की, ३०० अफगाणी नागरिक ५ संस्थांमार्फत ब्रिटनमधून संपूर्ण ड्रग्ज नेटवर्क नियंत्रित करत आहेत. आधी युरोपच्या वेगवेगळ्या देशांतून करत होते, पण अद्यापही त्यांचा पत्ता लागलेला नाही.

पैसे तालिबानपर्यंत कसे पोहोचतात?
तालिबानने पाकिस्तानशिवाय यूएई, चीन, व्हर्जिन बेटे, लॅटव्हिया, हाँगकाँग आणि तुर्कीत नवे नेटवर्क निर्माण केले आहे. संघटित आंतरराष्ट्रीय गुन्हेगारीवर ब्रिटिश सरकारच्या एका अहवालात म्हटले आहे की, तालिबानचा सर्व पैसा आता याच देशांत गोळा केला जात आहे.

अफगाणिस्तानचे ड्रग्ज कुठे-कुठे जाते?
चीन, रशिया, जर्मनी, ऑस्ट्रिया, ब्रिटन, स्पेन, कोलंबिया, अमेरिका, कॅनडा व ऑस्ट्रेलियात मिळणारे ड्रग्ज अफगाणिस्तानातून येते. भारतातही अफगाणिस्तानातून हेरॉइन येत आहे.

तालिबान तस्करी का बंद करणार नाही?
लोकांकडे रोजगाराची इतर साधने नसतील, तोपर्यंत ते अफू पिकवून तालिबानला विकत राहतील. रोजगार निर्मितीचा तालिबानला कुठलाही अनुभव नाही. ज्या धंद्याच्या बळावर तालिबानी सत्तेत आले, तो धंदा आता आणखी वाढवणारच. जगभरातून आर्थिक मदत बंद झाल्यानंतर तालिबानकडे हाच एक मार्ग उरत आहे.

चीनची नजर ७५ लाख कोटी रु. च्या खनिज संपत्तीवर
अफगाणिस्तानमध्ये ७५ लाख कोटी रुपयांची (१ लाख कोटी डॉलर) खनिज संपत्ती आहे. तेथे जगातील दुसरी सर्वात मोठी तांब्याची खाणही आहे. चीनच्या दोन कंपन्यांनी २००८ मध्ये तांब्याच्या खाणी ३० वर्षांच्या लीजवर घेतल्या होत्या. पण अफगाण सरकारने त्या सुरू होऊ दिल्या नाहीत. आता तालिबानची सत्ता आल्यानंतर चीन खाणींत काम सुरू करण्याच्या तयारीत आहे. तेथे ५५ लाख मे. टन उच्च गुणवत्तेचे तांबे आहे. कोरोना काळात जगात तांब्याची मागणी ४३% वाढली आहे. त्यामुळे पाकलाही खाणी हव्या आहेत.

(वॉशिंग्टनहून दैनिक भास्करसाठी वेंडा फॅलबॉब ब्राऊन नार्काेटिक्स एक्स्पर्ट, इनिशिएटिव्ह ऑफ नॉनस्टेट आर्म्ड अॅक्टर्स, ब्रुकिंग्ज इन्स्टिट्यूट)

बातम्या आणखी आहेत...