आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Taliban Kabul Airport| Taliban Takes Custody Of 150 People From Kabul Airport Latest News And Updates

विमानतळावर गोंधळात गोंधळ:तालिबानींनी 70 शिख-हिंदूंना विमानतळावरून परतवले, म्हणाले - तुम्ही अफगाणी आहात देश सोडता येणार नाही

काबुल2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
काबूल विमानतळावर असलेल्या गर्दीच्या व्हिडिओतून घेतलेला स्क्रीनशॉट. - Divya Marathi
काबूल विमानतळावर असलेल्या गर्दीच्या व्हिडिओतून घेतलेला स्क्रीनशॉट.
  • आज कोणत्याही भारतीय विमानाने उड्डाण केले नाही - सूत्रांचा दावा

तालिबान्यांनी संपूर्ण अफगाणिस्तानावर ताबा मिळवला आहे. काबूल विमानतळावर लोक मोठ्या प्रमाणावर जमले असून आपापल्या देशात जाण्यासाठी विमानांची वाट पाहत आहेत. याच दरम्यान, तालिबान्यांनी 70 शीख आणि हिंदूंना वेगळे केले. तसेच त्यांना विमानतळावरून परत पाठवले. यात 2 अल्पसंख्याक खासदारांचा देखील समावेश आहे. तुम्ही अफगाणी आहात, त्यामुळे तुम्हाला देश सोडता येणार नाही असे तालिबानने म्हटले आहे.

जागतिक पंजाबी संघटनेचे अध्यक्ष विक्रमजीत सिंह साहनी म्हणाले की, अफगाणिस्तान शीख आणि हिंदूंची ही पहिली तुकडी भारतात परतण्यासाठी शुक्रवारपासून 12 तासांहून अधिक काळ विमानतळाबाहेर थांबली होती. दरम्यान, तालिबान लढाऊंनी येथे येत भारतीय आयएएफच्या विमानात चढण्यापासून या नागरिकांना रोखले. तुम्ही अफगाणी असून देश सोडू शकत नाही असे त्यांनी लोकांना सांगितले. त्यानंतर या लोकांनी काबूलमधील गुरुव्दारामध्ये परत आले. यावेळी या गटात अल्पसंख्यांक खासदार नरिंदर सिंग खालसा आणि अनारकली कौर मनोयर हे देखील उपस्थित होते असे साहनी म्हणाले.

आज कोणत्याही भारतीय विमानाने उड्डाण केले नाही - सूत्रांचा दावा
अफगाणिस्तानमध्ये तालिबानाच्या राजवटीत राजधानी काबुलच्या विमानतळावर गोंधळाचे वातावरण आहे. अमेरिका आणि भारतासह सर्व देश त्यांच्या नागरिकांना विमानात नेण्यात व्यस्त आहेत. दरम्यान, भारतीय हवाई दलाचे C-130J विमान 85 भारतीयांना घेऊन काबूलहून निघाले असल्याचा दावा काही माध्यमांत करण्यात येत आहे. परंतु, आज कोणत्याही भारतीय विमानाने काबूलमधून उड्डाण केले नाही असे दिव्य मराठीच्या सूंत्राकडून सांगितले जात आहे.

राष्ट्रपतींच्या भावांची तालिबान्यांशी हातमिळवणी
अफगाणिस्तानचे राष्ट्रपती अशरफ घनी यांचा भाऊ हशमत गनी अहमदजई यांनी तालिबान्यांशी हातमिळवणी केली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, आज काबुलमध्ये दहशतवादी खलील हक्कानीला भेटून तो तालिबानमध्ये सामील झाला आहे. विशेष म्हणजे अमेरिकेने खलील हक्कानीवर 50 लाख डॉलर्सचे बक्षीस ठेवले असून तो मोस्ट वॉन्टेड आहे. खलील हक्कानी हा जलालुद्दीन हक्कानीचा भाऊ आहे. हक्कानी नेटवर्कने अफगाणिस्तानात अनेक मोठे हल्ले केले असून भारतीय हितसंबंधांनाही लक्ष्य केले होते.

तालिबान्यांनी अपहरण केलेल्यांना परत सोडले
मीडिया रिपोर्टनुसार, तालिबानने विमानतळावरूनच 150 च्या जवळपास लोकांचे अपहरण केले होते. यामध्ये प्रामुख्याने भारतीयांचा समावेश असल्याचे सांगितले जात आहे. त्यांना तालिबानने कुठे नेले याचा कुणाला काहीच पत्ता लागला नाही. अफगाणी माध्यमाने तालिबानच्या प्रवक्त्याशी संवाद साधला. त्यावेळी बोलताना आपण नागरिकांचे अपहरण केलेले नाही असे तालिबानने स्पष्ट केले.

या घटनेच्या काही तासानंतर तालिबानने त्या सर्वांना पुन्हा त्याच ठिकाणी आणून सोडले. दिव्य मराठीला काबूलच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तालिबानने या लोकांना कागदपत्रांच्या कामानिमित्त दुसरीकडे नेले असावे. यासंदर्भात परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांना विचारल्यानंतर त्यांनी सध्या अशी कुठलीही माहिती उपलब्ध नाही असे सांगितले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, ते सगळेच सुरक्षित आहेत.

अफगाणिस्तानात अडकलेले 1000 भारतीय
अफगाणिस्तानमधील भारतीय दूतावासाच्या सर्व अधिकाऱ्यांना विमानातून हलवण्यात आले आहे. परंतु, काबूलसह इतर शहरांमध्ये आणखी 1000 भारतीय अडकल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. भारतीय परराष्ट्र मंत्रालय या सर्व लोकांचे लोकशन आणि तेथील परिस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहे. कारण अडकलेल्या सर्वच लोकांनी भारतीय दुतवासाशी संपर्क साधला नसल्याचे मंत्रालयाने म्हटले आहे.

4 दिवसांपूर्वी 120 भारतीय परतले मायदेशी
दरम्यान, अफगाणिस्तानातून भारतीयांना स्वदेशात आणण्याचे काम सुरूच आहे. गेल्या मंगळवारी 120 पेक्षा जास्त लोक ग्लोबमास्टर C-17 वरून घरी परतले होते. यामध्ये काबूलमधील भारतीय दूतावासाचे अधिकारी, आयटीबीपीचे कर्मचारी आणि इतरांचा समावेश होता. यापूर्वी सोमवारीही 45 लोकांना विमानातून भारत देशात परत आणण्यात आले होते.

बातम्या आणखी आहेत...