आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काबूल:तालिबान सरकारची धुरा मुल्ला बरादरकडे, इराण सरकारच्या माॅडेलनुसार अखुंदजादा होणार सर्वोच्च नेता

काबूल20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अफगाणिस्तानमध्ये तालिबानच्या नव्या सरकारचे नेतृत्व मुल्ला बरादर करेल. तो सध्या संघटनेच्या राजकीय शाखेचा प्रमुख आहे. तालिबानच्या संस्थापकांपैकी एक असलेल्या मुल्ला उमरचा मुलगा मुल्ला याकूब आणि भारतात शिकलेला शेर मोहंमद स्टानेकझई यांनाही महत्त्वाचे पद दिले जाईल.

नवे सरकार इराणच्या माॅडेलवर काम करेल, असे सांगितले जात आहे. त्यात मुल्ला हैबतुल्ला अखुंदजादा (६०) अफगाणिस्तानचा सर्वोच्च नेता असेल. तो राजकीय आणि धार्मिक प्रकरणांची निगराणी करेल. इराणी माॅडेलमध्ये सर्वोच्च नेता धार्मिक आणि राजकीय प्रकरणांचा ज्येष्ठ अधिकारी असतो. त्याचे स्थान राष्ट्रपतींपेक्षाही मोठे असते. सरकार, न्यायपालिका आणि लष्करप्रमुखाची नियुक्ती तोच करतो. अफगाणिस्तानमध्ये सरकारचे संचालन बरादर (५३) करेल. त्याचे स्थान तालिबानचा प्रमुख अखुंदजादा याच्या खालचे आहे. सरकार स्थापनेचा समारंभ काबूलच्या राष्ट्रपती भवनात होऊ शकतो. सुरुवातीला २५ मंत्र्यांचा शपधविधी होण्याची शक्यता आहे. दरम्यान, प्रवक्ता जबीउल्ला मुजाहिद याने सांगितले की, देशाची अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर आणता यावी यासाठी तालिबान चीनकडून आर्थिक मदत घेईल.

अखुंदजादा कट्टरपंथी
अखुंदजादा हा योद्ध्यापेक्षाही धार्मिक कट्टरपंथी म्हणून ओळखला जातो. तो तालिबानमध्ये सर्वसहमती तयार करण्याच्या भूमिकेत असतो. तो कंदहारमधील आहे. तोच यापुढेही तालिबानचा सर्वोच्च नेता म्हणून काम करण्याची शक्यता आहे.

दूतावासाचे काम सुरू राहील : भारत - अफगाणिस्तानमध्ये भारतीय दूतावास काम करत राहील, असे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. भारताने आपल्या अधिकाऱ्यांना आणि सुरक्षेत तैनात दलांना तेथून काढले होते.

स्टानिकझई-भारत कनेक्शन
भारतीय सैन्य अकादमीतून प्रशिक्षण घेतलेला शेर मोहंमद स्टानेकझई हाही (६०) दोहा येथे मुख्य वार्ताकार म्हणून सहभागी होता. तो रोज होणाऱ्या चर्चेत तालिबानतर्फे उपस्थित राहत होता. चर्चेत प्रगती झाल्यानंतर बरादरही सहभागी होत होता.

अफगाण युद्धाचा निर्विवाद विजेता ठरला बरादर
पाकिस्तानातील तुरुंगातून सुटका झाल्यानंतर मुल्ला बरादर अफगाणिस्तानमध्ये २० वर्षांपासून सुरू असलेल्या युद्धाचा निर्विवाद विजेता म्हणून समोर आला आहे. बरादरचे स्थान तालिबानचा प्रमुख हैबतुल्लाह अखुंदजादा याच्या खालचे आहे. तो दोहा येथील चर्चेत मुख्य वार्ताकार होता. त्याने अमेरिकी विशेष प्रतिनिधीसोबत करारावर स्वाक्षरी केली होती.

तालिबानचे वादग्रस्त वक्तव्य / काश्मीरबाबत आम्हाला बोलण्याचा हक्क, भारताने सकारात्मक दृष्टिकोन ठेवावा
काबूल | तालिबानने काश्मीरवर पुन्हा एकदा वक्तव्य दिले आहे. तालिबानचा प्रवक्ता सुहैल शाहीन म्हणाला,‘आमचा हेतू कोणत्याही देशाविरुद्ध सशस्त्र संघर्ष करण्याचा नाही, पण मुस्लिम असल्याने भारतातील काश्मीरमध्ये किंवा दुसऱ्या कुठल्याही देशात मुस्लिमांच्या बाजूने आवाज उठवण्याचा अधिकार आमच्याकडे आहे. आम्ही आवाज उठवू आणि म्हणू की मुस्लिम तुमचे लोक आहेत. ते तुमच्या देशाचे नागरिक आहेत. तुमच्या कायद्यानुसार ते समान आहेत.’ त्याआधी आणखी एक प्रवक्ता जबीउल्लाह मुजाहिद यानेही म्हटले होते की, काश्मीरच्या प्रकरणात भारताने आपला दृष्टिकोन सकारात्मक ठेवायला हवा.

बातम्या आणखी आहेत...