आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उफ्फ! गाणिस्तान:काबूलवर तालिबान्यांचा कब्जा, राष्ट्राध्यक्ष गनी देश सोडून पळाले; संयुक्त राष्ट्राने आपत्कालीन बैठक बोलावली

काबूल2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • चीन, रशिया, पाकिस्तान म्हणाले - तालिबानला सरकारची मान्यता देऊ
  • 20 वर्षांनी अफगाणिस्तानात पुन्हा तालिबानी राजवट

अखेरीस ४ कोटी लोकसंख्येचा अफगाणिस्तान अत्यंत सहजपणे तालिबानच्या हाती सापडला. ३१ ऑगस्टला अमेरिकी लष्कर अफगाणिस्तान सोडेल तेव्हा तालिबान डोके वर काढेल, असे जगाला वाटले होते. मात्र, अमेरिकी सैन्य असतानाच तालिबानने पुन्हा देश ताब्यात घेतला.रविवारी तालिबानी अतिरेकी राजधानी काबूलमध्ये घुसण्याआधीच राष्ट्राध्यक्ष अशरफ गनी कुटुंबासोबत देश सोडून पळून गेले. तालिबानच्या प्रवक्त्याने म्हटले की, गनी ५० लाख अमेरिकी डॉलर्सने भरलेली एक कारही घेऊन विमानतळापर्यंत गेले होते. मात्र आमच्या धमकीनंतर ही रक्कम तेथेच सोडून गेले.

गनी जाताच अवघे सरकार लपून बसले. काबूलमध्ये तैनात १० हजारांवर सैनिक आपल्या तोफा-रणगाडे सोडून गायब झाले. तालिबान त्यांचा घरोघरी शोध घेत आहेत. दुसरीकडे, तालिबानी लष्करी तोफांची पाहणी करताना दिसले. ते जिकडे वळायचे, महिला घरात लपून बसत. महिलांनी बाहेर काम करणे हराम असल्याचे फर्मान तालिबान्यांनी जारी केल्यामुळे सरकारी कार्यालयांत महिला पोहोचल्याच नाहीत. हा तख्तपालट बेकायदेशीर असल्याचे अमेरिका आणि युरोपियन देशांनी म्हटले आहे. मात्र, रशिया, चीन व पाकिस्तानने तालिबानला सरकार म्हणून मान्यता देण्याची घोषणा केली आहे. चीनने सोमवारी म्हटले की, आम्ही तालिबान सरकारला सहकार्य करू. रशियाने म्हटले की, तालिबान आता अफगािणस्तानाचे वास्तव आहे.

तालिबानशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवले जातील. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी तर खुलेआम तालिबानची प्रशंसा सुरू केली आहे. ते म्हणाले, अफगाणिस्तानने गुलामीच्या बेड्या तोडल्या आहे. मात्र ज्या वैचारिक गुलामीच्या बेड्या असतात, त्या तुटत नाहीत. अफगाणिस्तानातील तख्तपालट जगासाठी मोठा धोका असल्याचे सांगत यूएनच्या सुरक्षा परिषदेने सोमवारी आपत्कालीन बैठक बोलावली. परिषदेचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस म्हणाले, या धोक्याविरुद्ध अवघ्या जगाला एकजूट व्हावे लागेल. बैठकीत भारताचे राजदूत टी.एस. त्रिमूर्ती म्हणाले, अफगाणिस्तानात मुले व महिला भयाच्या सावटाखाली जगत आहेत. त्या सर्वांच्या भवितव्याबाबत भारताला काळजी आहे.

जगावर परिणाम...

मध्य आशिया व आखाती देश : ताजिकिस्तान आणि उझबेकिस्तानात हिंसेच्या झळा पोहोचू शकतात. त्यांचा अफगाणिस्तानसोबतचा व्यापार थांबू शकतो, निर्वासितही तेथे पोहोचतील. यूएई आणि कतारने याआधी तालिबानचे आतिथ्य केले आहे. आता रशिया व अमेरिका या संपर्कांचा लाभ घेण्यास उत्सुक.

चीन : या पूर्ण वातावरणाचा सर्वाधिक फायदा घेण्याच्या स्थितीत आहे. अफगाणिस्तान त्याच्या बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्हचा कॉरिडॉर आहे आणि तालिबानला सोबत घेऊन त्यावर पकड मजबूत करण्याची इच्छा आहे. पण अफगाणिस्तानमधील हिंसेच्या झळा चीनच्या शिनचियांग प्रांतापर्यंत पोहोचू शकतात.

रशिया : रशियासमोर चिंतेची अनेक कारणे आहेत. दहशतवादापासून त्यालाही धोका आहे. चेचेन बंडखोरांसाठी अफगाणिस्तान मोठे मैदान ठरेल. मध्य आशियातील उलथापालथीने रशियाच्या सामरिक-आर्थिक हितांना थेट फटका बसेल.

पाकिस्तान : सध्या पाकिस्तान फायद्यात दिसत आहे. अफगाणमध्ये त्याला आपल्या दहशतवाद्यांचे मोठे ट्रेनिंग ग्राउंड दिसत आहे. हाच फायदा आहे. अफगाणिस्तानमध्ये हिंसेची झळ आणि निर्वासितांची गर्दी दोघांचाही पाकला फटका बसेल.

इराण : इराणलाही तालिबानची सत्ता नको होती, कारण तालिबान सुनी आहे. फारसी भाषेचा दबदबा असलेल्या अफगाणी भागात इराणची पकड कमकुवत होईल.

भारतावर परिणाम
नुकसान झाले आहे, पण सध्या धोक्याबाहेर : अफगाणिस्तानमध्ये आपण सामरिक जमीन गमावली आहे, पण हे नुकसान मोठ्या धोक्यात परिवर्तित होईल असे दिसत नाही. कारण अफगाणी दहशतवाद्यांना काश्मीरकडे वळवण्याच्या स्थितीत पाकिस्तान नाही. अमेरिका पाकिस्तानला भारताशी लढू देणार नाही. कॉरिडॉरचा हेतू पूर्ण करण्यासाठी भारत-पाकिस्तान युद्ध रोखण्याची चीनचीही इच्छा असेल.

पुढील सहा महिन्यांत... रशिया, पाक आणि चीन अफगाणिस्तानमध्ये अंतरिम सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न करतील, पण ते सोपे नाही. रशिया, चीन, पाकशिवाय कोणी त्याला मान्यता देत नाही. त्यामुळे हे तिन्ही देश यूएनमध्ये वेगळे पडतील.

बुरखा नसलेल्या महिलांची हत्या, महिलांनी कामावर जाणे सोडले
विमानतळाजवळ ३ महिलांचे मृतदेह सापडले. त्यांनी बुरखा घातलेला नव्हता. तालिबान्यांनी त्यांना मारल्याचे लोक म्हणाले. काबूलमध्ये सरकारी कार्यालये उघडली, मात्र तालिबान्यांच्या धमकीमुळे महिला कर्मचारी आल्याच नाहीत.

राष्ट्राध्यक्षांच्या खुर्चीवर तालिबानी; अवघे अफगाण लष्कर गायब
अखेरपर्यंत लढू, असे राष्ट्राध्यक्ष गनी २ दिवसांपूर्वी म्हणाले होते. पळाल्यानंतर म्हणाले, रक्तपात थांबवण्यासाठी देश सोडला. ते आता अमेरिकेला जाणार आहेत. सोमवारी ते ताजिकिस्तानात होते. आेमानमध्ये त्यांना लँडिंगची परवानगी दिली नाही.

काबूलमध्ये एअर इंडियाची दोन विमाने राखीव, पण हवाई हद्द बंद
दोन विमाने काबूलमध्ये राखीव ठेवली जावीत, असे भारत सरकारने एअर इंडियाला सांगितले आहे. पण आता या धामधुमीत विमान उड्डाणे शक्य नाहीत, असे एअर इंडियाने स्पष्ट केले आहे. पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग यांनी केंद्र सरकारला लिहिले आहे की, २ हजार शीख अफगाणिस्तानमध्ये अडकले आहेत, त्यांना भारतात आणावे. त्यावर केंद्र सरकारने म्हटले, ‘सर्व भारतीयांना अफगाणिस्तानमधून आणण्याचे आमचे प्रयत्न सुरू आहेत.’

बातम्या आणखी आहेत...