आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:गुण देताना विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वामुळे प्रभावित होतात शिक्षक, जे जास्त प्रिय त्यांना ग्रेडिंगमध्ये 10 टक्के फायदा : अभ्यासात दावा

लंडन2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • आवडत्या विद्यार्थ्यांचे मूल्यांकन करताना काही शिक्षक त्यांच्या शैक्षणिक क्षमतेकडे दुर्लक्ष करतात

अमुक विद्यार्थी शिक्षकांना आवडतो, त्यामुळे त्याला जास्त गुण मिळाले, अशी तक्रार मुले करत असल्याचे आपण पाहिले आहे. मुले सहज असे म्हणत असली तरी आता त्याला वैज्ञानिक आधारही मिळाला आहे. एका अलीकडच्या संशोधनानुसार, परीक्षेत गुण देताना काही शिक्षक आपल्या प्रिय विद्यार्थ्यांबाबत पक्षपाती होऊ शकतात. तसे करताना शिक्षक त्यांच्या वास्तविक शैक्षणिक क्षमतेकडे दुर्लक्ष करतात. एवढेच नाही तर शिक्षकांच्या आवडत्या विद्यार्थ्यांना ग्रेडिंगमध्ये १०% एवढा फायदा होतो.

बेलफास्टचे क्वीन्स विद्यापीठ आणि लंडनच्या गोल्डस्मिथ विद्यापीठाचे शिक्षणतज्ञ आणि मानसशास्त्रज्ञांनी आपल्या अभ्यासात हा दावा केला आहे. एका आंतरराष्ट्रीय प्रकल्पांतर्गत झालेल्या या अभ्यासात २०१९-२० दरम्यान विद्यापीठात तंत्रज्ञान, विज्ञान, कला आणि क्रीडा या विषयांतील विद्यार्थ्यांना शिक्षकांनी दिलेले ग्रेडिंग आणि त्याच वर्षी अज्ञात शिक्षकांनी दिलेले ग्रेडिंग यांची तुलना करण्यात आली. विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्त्व आणि मनोवैज्ञानिक रेकॉर्डही ग्रेडिंगशी जोडून पाहण्यात आले. क्वीन्स विद्यापीठाचे प्रमुख संशोधक डॉ. कोस्टास पेपेजॉर्गियो यांच्या मते, हा अभ्यास संपूर्ण शिक्षण प्रणालीसाठी महत्त्वाचा आहे. अनेक देशांत या वेळी परीक्षेचा निकाल ग्रेडिंगच्या आधारावर दिला जाईल. त्यामुळे हुशार विद्यार्थ्यांवर अन्याय होऊ नये याकडे शिक्षकांना लक्ष ठेवावे लागेल.

या अभ्यासानुसार, तणावग्रस्त, चिंतित किंवा भावनात्मकदृष्ट्या कमकुवत असलेल्या विद्यार्थ्यांबाबत शिक्षक उदार राहतात. पण नकारात्मक मानसिकता आणि असामाजिक विद्यार्थ्यांबाबत ते कठोर असतात. शिक्षकांद्वारे दिलेल्या जाणाऱ्या ग्रेडिंगवर काही मर्यादेपर्यंत पूर्वाग्रहाचा परिणामही दिसतो. शाळेच्या कामांत तत्पर असणाऱ्या, स‌र्वांशी चांगली वर्तणूक असणाऱ्या विद्यार्थ्यांबाबत उदार भूमिका असते. एक चांगली बाब म्हणजे हा पक्षपाती दृष्टिकोन लिंग आणि जातीय आधारावर नसतो, असेही अभ्यासात नमूद करण्यात आले आहे.

शैक्षणिक यशात व्यक्तिमत्त्व आणि वर्तणुकीचेही मोठे योगदान : अभ्यास
गोल्डस्मिथ विद्यापीठाच्या मानसशास्त्राच्या प्राध्यापक युलिया कोवास यांच्या मते, जी मुले आत्ममग्न असतात त्यांच्या वर्तणुकीबाबत काय समस्या आहेत, हे सहजपणे समजत नाही. ज्या मुलांवर व्यक्तित्वाचे वर्चस्व असते, मग ते सकारात्मक असो की नकारात्मक, त्यांच्या शैक्षणिक यशावर त्याचा वाईट परिणाम होतो, असे अभ्यासात आढळले. शैक्षणिक यशात व्यक्तित्व आणि वर्तणुकीचेही मोठे योगदान असते हे आमच्या अभ्यासातून निश्चित झाले आहे, असे प्राध्यापक कोवास यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...