आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दहशतवादाच्या निशाण्यावर युरोप:फ्रान्सनंतर आता ऑस्ट्रियाच्या राजधानीवर मुंबईसारखा हल्ला; 4 ठार, 17 जखमी

व्हिएन्नाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • या संकटसमयी भारत ऑस्ट्रियाच्या सोबत आहे : पंतप्रधान नरेंद्र मोदी
  • भास्कर एक्स्पर्ट : युरोपीय देशांना आधी वाटायचे की दहशतवाद ही भारताची समस्या आहे

ऑस्ट्रियाची राजधानी व्हिएन्नामध्ये साेमवारी रात्री मुंबईसारखा अतिरेकी हल्ला झाला. हल्लेखोरांनी एका ज्यू धर्मस्थळाजवळ सहा ठिकाणी अंदाधुंद गोळीबार केला. यात दोन महिलासंह चार जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेत १७ जण जखमी झाले असून त्यापैकी काहींची प्रकृती गंभीर आहे. दाेन हल्लेखोरांच्या मुसक्या बांधण्यात पोलिसांना यश आले आहे. पोलिसांच्या कारवाईत एका हल्लेखोराला कंठस्नान घालण्यात आले.

ऑस्ट्रियाचे गृहमंत्री कार्ल नेहमर यांनी सांगितले की, २० वर्षीय मृत हल्लेखोर गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये ८ महिन्यांचा तुरुंगवास भोगून सुटला होता. आयएसआयएसमध्ये सहभागी होण्यासाठी सिरियाकडे जाताना त्याला पकडले होते. ऑस्ट्रियाचे चॅन्सेलर सेबेस्टियन कुर्ज म्हणाले, ‘दहशतवादाविरुद्ध निर्णायक कारवाई करू. अतिरेकी आम्हाला घाबरवण्यात यशस्वी होणार नाहीत.’

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, व्हिएन्नातील भ्याड हल्ल्याने आम्ही दु:खी आहोत. या संकटासमयी भारत ऑस्ट्रियासोबत आहे. पीडित व त्यांच्या कुटुंबीयांप्रति आमच्या संवेदना आहेत. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इम्यॅनुअल मॅक्रॉन म्हणाले, फ्रान्सनंतर हल्ला झालेले हे दुसरे मित्रराष्ट्र आहे. आम्ही झुकणार नाही. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, हा हल्ला युरोपात दहशतवादाचे आणखी एक बीभत्स कृत्य आहे.

भास्कर एक्स्पर्ट : युरोपीय देशांना आधी वाटायचे की दहशतवाद ही भारताची समस्या आहे

‘भारताला आधीच ज्या सैतानाचा मागमूस लागला होता, युरोपने मात्र त्याला तेथे चूपचाप हातपाय पसरवण्याची संधी दिली. यूएनमध्ये मी तीन वेळा भारताचे प्रतिनिधित्व करताना आम्ही ज्या दहशतवादाचा सामना करत आहोत, एके दिवशी तो अवघ्या जगाला विळख्यात घेईल, असा इशारा दिला होता. त्या वेळी तुम्ही ज्याला दहशतवाद समजता, तो इतरांसाठी न्यायाचा लढाही असू शकतो, अशी आमची बोळवण केली होती. युरोपच्या उदारमतवाद्यांनी भारताकडे पार दुर्लक्ष केले. कट्टरपंथीयांनी त्याचा फायदा घेत २५ वर्षांत युरोपीय देशांत स्लीपर सेल तयार केले. आपण ज्यांना एकेकाळी अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे योद्धे समजत होतो, तेच आता आपल्या नागरिकांची मुंडकी उडवत आहेत, हे वास्तव अवघा युरोप भयचकित नजरेने अनुभवतो आहे. आता त्यांना दहशतवादाचे रूप लक्षात येईल. त्यांना वाटायचे की, ही भारत व उपखंडातील देशांची समस्या आहे. त्याकडे दुर्लक्ष करण्याची किंमत त्यांना आता चुकवावी लागत आहे.’

फ्रान्सचा मालीत एअरस्ट्राइक, अल कैदाच्या 50 अतिरेक्यांना टिपले

पॅरिस/बमाको | फ्रान्सच्या लष्कराने माली या अाफ्रिकन देशातील अल कैदाच्या अतिरेक्यांवर हवाई हल्ला केला. यात ५० अतिरेक्यांना खात्मा करण्यात आला. हा हल्ला बुर्किना फासोच्या हद्दीजवळ झाला. फ्रान्सने २९ ऑक्टोबरला झालेल्या अतिरेकी हल्ल्यानंतर अतिरेक्यांचे अड्डे उद्ध्वस्त करण्याची मोहीम हाती घेतली आहे.