आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दीपोत्सव ठरणार खास:देशाबाहेर दिवाळीचा सर्वात मोठा उत्सव ब्रिटनच्या लेस्टरशायरमध्ये सुरू

लेस्टरशायर / एम. एस. स्पर्शाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

भारताबाहेर दिवाळीनिमित्त होणारा सर्वात मोठा उत्सव ब्रिटनच्या लेस्टरशायरमध्ये रविवारी सुरू झाला. सात दिवसांच्या या उत्सवासाठी येथे एका मोठ्या भागात व्हील ऑफ लाइट आणि फायर आर्टसह अनेक आकर्षणे लोकांसाठी बनवली आहेत. लेस्टरशायरचे महापौर पीटर सॉल्सबी यांनी सांगितले की, दरवर्षीप्रमाणे बेलग्रेव्ह रोड आणि त्याच्या आजूबाजूच्या भागात भव्य आयोजन केले जात आहे. या भागाला स्थानिक लोक ‘गोल्डन माइल’ या नावाने ओळखतात. ७ दिवसांच्या उत्सवात ५ लाखांपेक्षा जास्त लोक येण्याची अपेक्षा आहे. त्यात लेस्टरशायरमध्ये राहणाऱ्या भारतीय समुदायाच्या लोकांसह संपूर्ण ब्रिटनमधून लोक येतात. कोरोनाच्या प्रोटोकॉलचे पालन करूनही लोक उत्सवात भाग घेतील, अशी सॉल्सबरींना आशा आहे.

उत्सवादरम्यान लोकांची गर्दी एकाच ठिकाणी होऊ नये यासाठी येथे उत्सवाची आकर्षणे ७ वेगवेगळ्या स्थळी विभागली आहेत. उत्सव स्थळाच्या मधोमध व्हील ऑफ लाइट नावाचा भव्य रहाटपाळणा आहे. कॉसिंग्टन पार्कमध्ये फायर गार्डन बनवले आहे. त्यात मेणबत्त्यांद्वारे मॉडर्न आर्टवर्क आहे. गर्दी होऊ नये यासाठी यंदा दरवर्षीप्रमाणे आतषबाजीचा कार्यक्रम ठेवलेला नाही. त्याऐवजी फायर आर्टची व्यवस्था केली आहे. उत्सवस्थळी अनेक ठिकाणी विशाल स्क्रीन लावले आहेत, त्यावर प्री-रेकॉर्डेड सांस्कृतिक कार्यक्रम दाखवले जात आहेत. उत्सव स्थळांशिवाय काउंटीत विविध ठिकाणी दिवाळी कार्यक्रम होत आहेत. दिवाळीच्या दिवशी कॉसिंग्टन पार्कमध्ये दिवाळी व्हिलेजचे आयोजन होईल. लेझर लाइट्सद्वारे इंद्रधनुष्यही तयार केले जाईल, ते ६० किलोमीटर अंतरावरून दिसेल. महामारीचा जोर कमी झाल्याने आता या आयोजनामुळे येथे पर्यटनाला नवी चालना मिळेल तसेच भारतीय समुदायाला आपल्या सर्वात मोठ्या उत्सवात पुन्हा सहभागी होण्याची संधी मिळेल, अशी आशा आयोजकांना आहे.

आतषबाजीचा कार्यक्रम होणार नसल्याने लोक निराश आहेत, पण उत्सवासाठी एकत्र येण्याची संधी मिळत असल्याने ते खुश आहेत. लेस्टरशायरमधील ३२ वर्षीय पार्वती फाकी म्हणाल्या की, यंदा आयोजन गेल्या वर्षाएवढे मोठे नाही, तरीही बाहेर पडण्याचा आणि लोकांमध्ये जाण्याचा आनंद आहे. तथापि, अनेक लोक मास्कशिवाय फिरत असल्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली. अशीच चिंता ३६ वर्षीय अनिता सूद यांचीही आहे.

लेस्टरशायरचे हे आयोजन ब्रिटनमधील दिवाळीचे सर्वात मोठे आयोजन असते. स्थानिक लोकांनी सांगितले की, येथे सुरुवातीपासूनच भारतीयांची संख्या मोठी आहे, त्यामुळे काउंटी कौन्सिलनेच उत्सवाच्या आयोजनाची जबाबदारी घेतली आहे.

बातम्या आणखी आहेत...