आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकाही दिवसांपूर्वी भारत दौऱ्यावर आलेल्या अमेरिकी सेंट्रल इंटेलिजन्स एजन्सीच्या (सीआयए) एका अधिकाऱ्यात ‘हवाना सिंड्रोम’सारखी लक्षणे आढळली आहेत. हा अधिकारी सीआयएचे संचालक विलियम बर्न्स यांच्यासोबत भारतात आला होता, ही चिंतेची बाब आहे. हा अमेरिकाविरोधी लोकांचा कट असल्याचे अधिकाऱ्यांचे मत आहे. अमेरिकेच्या दोन प्रमुख अधिकाऱ्यांत ‘हवाना’ची लक्षणे आढळल्याची ही एका महिन्यातील दुसरी घटना आहे. गेल्या महिन्यात उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस यांच्या व्हिएतनाम दौऱ्यातही यामुळे विलंब झाला होता. अमेरिकेला सतावणारा हवाना सिंड्रोम काय आहे हे जाणून घेऊ...
अमेरिकी सायन्स अकॅडमी त्यासाठी ‘आरोग्यासंबंधी असामान्य घटना’ ही टर्म वापरते. त्याची सुरुवात २०१६ मध्ये हवानातून झाली. तेथील अमेरिकी दूतावासातील अधिकारी एकापाठोपाठ आजारी पडायला लागले. त्यांनी घरांत आणि हॉटेलच्या कक्षांत वेगळेच आवाज ऐकले आणि सेन्सेशन जाणवले. त्याला ‘हवाना सिंड्रोम’ असे नाव देण्यात आले. त्याच्या लक्षणांत मायग्रेन, विस्मरण, चक्कर येणे, कर्कश आवाज तसेच कानांत वेदना होणे यांचा समावेश आहे. काहींची ऐकण्याची क्षमता कमी झाली. डोकेदुखी, एकाग्रता भंग, झोप न येणे, नैराश्य, अशी लक्षणे दीर्घकाळ राहतात. वैज्ञानिकांनी प्रभावित लोकांच्या मेंदूंचे स्कॅनिंग केल्यानंतर कार अपघात किंवा स्फोटामुळे पेशींची स्थिती होते अगदी तशीच स्थिती त्यांच्यात आढळली. आतापर्यंत २०० अमेरिकी अधिकारी आणि त्यांच्या नातेवाइकांनी या समस्येचा सामना केला आहे.
अमेरिकी अभ्यासात दावा- मायक्रोवेव्ह शस्त्रास्त्रे हे सिंड्रोमचे कारण असू शकते
अमेरिकेच्या नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्सेसच्या अभ्यासानुसार, मायक्रोवेव्ह शस्त्रास्त्रे हे हवाना सिंड्रोमचे कारण असू शकते. ही शस्त्रास्त्रे ऊर्जेला ध्वनी, लेझर किंवा मायक्रोवेव्हच्या रूपात एखाद्या लक्ष्यावर मारा करू शकतात. अशी शस्त्रास्त्रे सर्वात आधी सोव्हिएत युनियनने बनवली होती. काही तज्ज्ञांच्या मते, हे आवाज मास हिस्टेरियामुळे (दुसऱ्यांचे ऐकून ती गोष्ट स्वत: अनुभवणे) होऊ शकते. क्युबात ठिकठिकाणी लावलेल्या पाळत ठेवणाऱ्या उपकरणांचे हे आवाज असू शकतात, अशी शक्यता मिशिगन विद्यापीठाच्या तज्ज्ञांनी व्यक्त केली होती. सीआयएचे संचालक विलियम बर्न्स म्हणतात की, बहुधा हा सिंड्रोम माणसाच्या नियंत्रणात असावा आणि त्यामागे रशियाचा हात असू शकतो.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.