आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागेल्या काही आठवड्यांपासून अमेरिकेच्या संसदेतील दोन सदस्यांनी कृत्रिम बुद्धिमतेच्या (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) धोक्याविषयी सावध केले. डेमोक्रॅटिक पार्टीचे खासदार टेड लियू यांनी लिहिले की, मानवी लेखकांची नक्कल करण्याच्या चॅटजीपीटी चॅटबॉटच्या क्षमतेने ते आश्चर्यचकित झाले आहेत. दुसरे डेमोक्रॅट खासदार जेक अचिनक्लॉस यांनी चॅटबॉटद्वारे लिहिलेल्या एका भाषणात एआयवर नियंत्रण ठेवण्याची गरज वर्तवली. खासदारांच्या इशाऱ्यानंतरही याबाबत कोणतीही पावले उचलली जात नाहीत. एआयच्या धोकादायक पैलूंचा विकास रोखण्यासाठी किंवा लोकांच्या सुरक्षेसाठी कोणताही कायदा बनवला जात नाही. यात भर म्हणजे चेहरा ओळखण्यासारखे एआय तंत्रज्ञान रोखण्यासाठीचे विधेयक संसदेत अडकले आहे.
रिपब्लिकन पार्टीचे खासदार ओबरनोल्टे म्हणाले, वास्तविक बहुतेक खासदारांना एआय म्हणजे काय हेच माहीत नाही. टेक्नॉलॉजी कंपन्यांनी अमेरिकी कायदे आणि नियमांना पुन्हा एकदा मागे टाकले आहे. दीर्घकाळापासून खासदारांना नवे संशोधन कळतच नाही. मायक्रोसॉफ्ट, गुगल, अॅमेझॉन आणि मेटा एकमेकांना मागे टाकण्यासाठी स्पर्धा करत आहेत. अनेकांना भीती वाटते की एआय अखेरीस नोकऱ्यांमध्ये माणसांची जागा घेईल.
लंडन येथील एडा लव्हलेस इन्स्टिट्यूटच्या संचालिका कार्ली काइंड म्हणाल्या, नियंत्रणाअभावी कंपन्यांच्या सुरक्षेचे मूल्य व्यावसायिक हितांना चालना देत आहे. अमेरिकेत नियमनाच्या मंद गतीमुळे युरोपियन युनियनने नुकसानकारक एआय टेक्नॉलॉजीला मर्यादित ठेवण्यासाठी पुढाकार घेतला आहे. या वर्षी यासंबंधी कायदा बनवण्याची शक्यता आहे. कायदा मोडणाऱ्या कंपन्यांवर त्यांच्या जागतिक उत्पन्नाच्या सहा टक्के दंड लावला जाणार आहे.
फेडरल ट्रेड कमिशनने ग्राहक संरक्षण नियमांचे उल्लंघन करण्यासाठी एआयच्या वापराविरूद्ध आदेश जारी केले आहेत. डेटा गोळा करण्यासाठी एआयचा वापर रोखण्यासाठी नियम देखील लागू केले जातील. कन्झ्युमर फायनान्शियल प्रोटेक्शन ब्युरोने क्रेडिट एजन्सीच्या अपारदर्शक एआय प्रणालींबद्दल इशारा दिला आहे. व्हाइट हाऊसने गोपनीयता अधिकार, सुरक्षित स्वयंचलित प्रणाली, अल्गोरिदमिक भेदभाव यावर एआय नियमांचा मसुदा तयार केला आहे.परंतु, यापैकी कोणत्याही प्रयत्नांचा कायद्याशी संबंध नाही.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.