आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Thousands Of Blacks Were Forcibly Sterilized In The United States 50 Years Ago; Later, However, The States Paid Compensation And Apologized

इतिहास:50 वर्षांपूर्वीपर्यंत अमेरिकेत हजारो कृष्णवर्णीयांची बळजबरीने नसबंदी; नंतर राज्यांनी दिली भरपाई

लिंडा व्हिलारोसा20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

१९७३ च्या उन्हाळ्यात मिनी ली रेल्फ आणि मेरी एलिस रेल्फ यांना मोंटगोमरी, अलाबामा येथे त्यांच्या घरी आणले व इच्छेविरुद्ध त्यांची नसबंदी केली. फेडरल (केंद्र) सरकारच्या एका क्लीनिकमध्ये नसबंदी करणाऱ्या डॉक्टरने त्यांच्या आई-वडिलांची परवानगी घेतली नव्हती. रेल्फ भगिनी आता अनुक्रमे ६१ आणि ६३ वर्षांच्या आहेत. त्यांच्या प्रकरणाने इतिहास बदलला. अमेरिकन सरकारच्या अनेक दशके चाललेल्या कार्यक्रमांतर्गत एक लाखांपेक्षाही जास्त कृष्णवर्णीय, लॅटिनो आणि आदिवासी महिलांची नसबंदी करण्यात आली होती, असा खुलासा त्यांच्याकडून न्यायालयात दाखल खटल्यामुळे झाला. यानंतर सरकारने हा कार्यक्रम बंद केला. संबंधित व्यक्तीची सहमती अनिवार्य करण्यात आली. तथापि, राज्य सरकारांकडून बळजबरी नसबंदी २१व्या शतकातही सुरूच आहे.

१९०७ ते १९३२ या काळात ३२ राज्यांनी युजेनिक्स (हा ग्रीक शब्द मानवी वंश सुधारण्यासाठी जेनेटिक्स आणि आनुवंशिकतेच्या सिद्धांतांशी संबंधित आहे.) कायदे बनवले होते. याअंतर्गत वेडसर, मतिमंद, इतरांवर अवलंबून आणि आजारी लोकांची नसबंदी करण्याची परवानगी होती. हे कायदे आता संपुष्टात आले आहेत. आठ राज्यांनी माफीनामा जाहीर केला आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये वरमोंट राज्याच्या विधानसभेत अध्यक्ष जिल क्रोव्हिन्स्की म्हणाले होते, युजेनिक्सची प्रथा संपली आहे. मात्र, त्याचा प्रभाव आणि वारसा आजही कायम आहे. मूळ निवासी आणि मिश्र जातीच्या गरिबांची लोकसंख्या मर्यादीत ठेवण्यासाठी बळजबरी नसबंदी केल्याबद्दल वरमोंटच्या आमदारांनी सभागृहाची माफी मागितली.

काही राज्ये माफीनाम्याच्या पुढे गेली आहेत. व्हर्जिनिया, उत्तर कॅरोलिना व कॅलिफोर्नियाने बळजबरी नसबंदी केलेल्यांना नुकसान भरपाई देण्याचे अभियान सुरू केले. मोंटगोमरीमधील आपल्या अपार्टमेंटमध्ये रेल्फ भगिनींनी न्यूयॉर्क टाइम्सच्या पत्रकाराला आपल्या पोटावरील नसबंदीच्या खुणा दाखवल्या. मिशिगन विद्यापीठातील इतिहासाच्या प्राध्यापिका डॉ. अलेक्झांड्रा स्टर्न सांगतात, इंडियाना येथे १९०७ मध्ये बनलेल्या पहिल्या कायद्याचे लक्ष्य गरीब कृष्णवर्णीय होते. स्टर्न व त्यांच्या टीमने कॅलिफोर्निया, आयोवा, मिशिगन, उत्तर कॅरोलिना, उटा या राज्यांत नसबंदी केलेल्या व सध्या जिवंत असलेल्या ६० हजारहून अधिक लोकांची माहिती गोळा केली. १९३० पर्यंत कोर्टाच्या आदेशाने मानसिक रुग्णालये, कारागृहांत बहुतांश नसबंदी महिलांची केली जात होती. निरोगी संतती जन्माला घालण्यास या महिलांना सक्षम मानले गेले नव्हते.

जॉर्जिया स्टेट विद्यापीठाच्या विधी महाविद्यालयाचे प्राध्यापक पॉल लोबार्डो सांगतात, १९४०-५० आणि १९६० च्या दशकात लोकसंख्या नियंत्रणासाठी लोकांची बेकायदेशीर नसबंदी करण्यात आली होती. १३ जून १९७३ रोजी मोंटगोमरी येथे एका कुटुंब नियोजन क्लिनिकच्या परिचारिकेने रेल्फ भगिनींच्या आईला चकवा देऊन सरकारी दवाखान्यात १४ व १२ वर्षांच्या मुलींची नसबंदी केली होती. मॉरिस डीस व जो लेविन या वकिलांना रेल्फ भगिनींचे प्रकरण कळले तेव्हा त्यांनी न्यायालयात केंद्र व राज्य सरकारविरोधात खटला दाखल केला.

रेल्फ भगिनींचे प्रकरण वृत्तपत्रांत आल्यानंतर डेमोक्रॅट सिनेटर एडवर्ड केनेडी यांनी संसदेत ते उचलले. अमेरिकेत दरवर्षी केंद्र सरकारच्या निधीतून सुरू असलेल्या कार्यक्रमांत हजारो गरीब महिलांची नसबंदी होत असल्याचे खासदार व पत्रकारांना तपासात कळले. रेल्फ भगिनींच्या खटल्यामुळे बळजबरीच्या सरकारी नसबंदीवर निर्बंध आले. तरीही २१व्या शतकात ती सुरूच राहिली. इन्व्हेस्टिगेटिव्ह रिपोर्टिंग सेंटरने २०१३ मध्ये एका अहवालात म्हटले की, २००६ ते २०१० या काळात कॅलिफोर्नियाच्या कारागृहात १५० महिला कैद्यांची नसबंदी करण्यात आली होती.

अमेरिकेच्या धर्तीवर नाझींनीही केली होती नसबंदी
जर्मन हुकूमशहा हिटलरच्या सत्ताकाळात चार लाख मुले आणि प्रौढांची नसबंदी करण्यात आली होती. यामध्ये बहुतांश ज्यू आणि तथाकथित अनिष्ट लोक होते. १९३३ चा जर्मन कायदा अमेरिकन कायद्याच्या आधारे बनला होता. ज्यांची मुले अंध, बधिर, तणावग्रस्त किंवा गतिमंद होती, अशा लोकांसाठी हा कायदा होता. अमेरिकेत अंतिम युजेनिक्स कायदा जॉर्जियामध्ये १९३७ मध्ये संमत झाला होता. मात्र, राज्य सरकारांनी कृष्णवर्णीय महिलांची नसबंदी सुरूच ठेवली होती. दक्षिणेकडील राज्यांमध्ये इतर शस्त्रक्रियेदरम्यान मोठ्या संख्येने गरीब कृष्णवर्णीय महिलांची नसबंदी करण्यात आली.

(हा अहवाल मागच्या महिन्यात प्रकाशित ‘अंडर द स्किन...’ पुस्तकावर आधारित आहे.)

बातम्या आणखी आहेत...