आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
तिबेटमध्ये चीनच्या कम्युनिस्ट पार्टीने केलेले अत्याचार जगापासून लपून राहिलेले नाहीत. तेथील लोकांना अभिव्यक्ती, माहिती, धार्मिक स्वातंत्र्याच्या अधिकारापासून वंचित ठेवले जात आहे. अशा कठीण परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी तिबेटच्या लोकांनी अनोखी पद्धत वापरली आहे. त्यांनी आपला सोशल मीडिया प्लॅटफॉर्म तयार केला आहे. त्याद्वारे ते परस्परांकडे विचारांची देवाण-घेवाण करतात, असा दावा तैवान टाइम्सने केला आहे.
चीनची कम्युनिस्ट पार्टी इंटरनेटवर सेन्सॉरशिप लावते. तिबेटसह अतिक्रमण केलेल्या अनेक भागांत पक्ष फेशियल रिकग्निशन तंत्रज्ञान व जीपीएसचा अकारण वापर करून लोकांच्या घडामोडींवर चीन नजर ठेवून आहे. तिबेटव्यतिरिक्त पूर्व तुर्कस्तान, दक्षिण मंगोलिया इत्यादी भागांतही चीनचे वागणे असेच आहे. याशिवाय इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून सीसीपीशी संबंधित अकाउंटच्या माध्यमातून अपप्रचार करण्याच काम केले जात आहे. चीन सरकारवर टीका करणाऱ्यांवर हल्ला केला जातो. अमेरिका आता चीनविरोधात जैविक युद्ध लढत असल्याचाही अपप्रचार चीनने केला आहे.
माहितीची देवाण-घेवाण सोपी
चीनने निर्बंध लादले असले तरी तिबेटच्या लोकांनी सोशल मीडियावर प्लॅटफॉर्म बनवला आहे. त्याद्वारे तिबेटचे लोक आपले मत, बातम्या, छायाचित्रे परस्परांना पाठवतात. हा प्लॅटफॉर्म अत्याधुनिक नसला तरी आपले उद्दिष्ट पूर्ण करण्याची क्षमता त्यात आहे. चीन सरकार सातत्याने अशा प्रकारच्या सोशल मीडियाचा शोध घेऊन ते बंद करण्याचे काम करते. असे असूनही तिबेटमध्ये १५६ कार्यकर्त्यांनी सोशल मीडियातून देवाण-घेवाण केली. महामारीच्या काळात लोकांनी आपले अनुभव सोशल मीडियातून मांडले आहेत. डिजिटल प्लॅटफॉर्मवर तिबेटच्या लोकांमध्ये होणाऱ्या चर्चा आणि छायाचित्रे-व्हिडिआेदेखील समोर आले आहेत. त्या माध्यमातून चिनी अधिकारी व व्यवस्थेत पारदर्शकता व उत्तरदायित्व नसल्याच्या अनेक घडामाेडींचा भंडाफोड केलेला दिसून येतो.
गायक-गीतकारांवरही अटकेची कारवाई
तिबेटमध्ये दडपशाही करताना चीन सरकारने लहासामध्ये १० स्थानिक लोकांना अटक केली. त्यांच्यावर अफवा पसरवल्याचा आरोप लावण्यात आला आहे. जुलैमध्ये तिबेटचे गीतकार खादो सेतन व गायक सेगाआे यांना अनुक्रमे सात व तीन वर्षांची शिक्षा ठोठावली आहे. त्यांची सुनावणी घेऊन त्यांची बाजू ऐकली गेली नाही. या प्रकरणी देशात कायद्याचे उल्लंघन केले जात होते. त्यामुळे लोकांमध्ये उद्रेकाची भावना वाढत असल्याचे सरकारचे म्हणणे आहे. कहर म्हणजे सोशल मीडियावर केवळ गाणे म्हटले म्हणून एका मुलीला देखील अटक करण्यात आली होती.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.