आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Trafic Noise | Marathi News | Traffic Noise Affects Not Only Humans But Also Plants; Noise Pollution Has Adversely Affected Plant Growth.

दिव्य मराठी विशेष:वाहतुकीच्या गोंगाटामुळे माणसेच नव्हे, तर झाडे-रोपेही त्रस्त होतात;ध्वनिप्रदूषणामुळे रोपांच्या विकासावर दुष्परिणाम झाल्याचा निष्कर्ष

वॉशिंग्टन6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • रोपांना गोंगाटाच्या वातावरणात ठेवून केला अभ्यास, रोपांची प्रतिक्रिया दुष्काळासारखी ​​​​​​​

प्राणिमात्रांवर गोंगाटाचा परिणाम होतो ही बाब वैज्ञानिक अभ्यासांत अनेकदा सिद्ध झाली आहे. प्राण्यांवरील परिणामामुळे वनस्पतींच्या परागीकरणाची प्रक्रिया बाधित होते आणि वनस्पतीविश्व त्यामुळे प्रभावित होते यातही कुठला संशय नव्हता. बेसिक अँड अप्लाइड इकॉलॉजी जर्नलमध्ये प्रकाशित अलीकडच्या अभ्यासात ‌ध्वनिप्रदूषणाचा रोपांच्या विकासावर थेट परिणाम होत असल्याचे आढळले आहे.

तेहरानच्या शाहिद बहश्ती विद्यापीठातील वनस्पतीशास्त्रज्ञ अली अकबर घोतवी रवांडी यांनी गोंगाटामुळे रोपांवर होत असलेल्या परिणामांचा अभ्यास केला आहे. रवांडी यांनी शहरी वातावरणात आढळणाऱ्या झेंडू आणि स्कार्लेट सेज या दोन वनस्पतींची रोपे आपल्या प्रयोगशाळेत लावली. एकाच वातावरणात दोन महिने ती लावल्यानंतर ती रोपे दोन ठिकाणी ठेवली.

एका समूहाला दिवसा १६ तास तेहरानच्या गर्दीच्या वातावरणात ७३ डेसिबलच्या गोंगाटाच्या रेकॉर्डिंगमध्ये ठेवले. दुसऱ्या समूहाला शांत वातावरणात ठेवण्यात आले. १५ दिवसांनंतर दोन्ही समूहांतून अभ्यासासाठी नमुने घेण्यात आले. गोंगाटातील रोपांच्या पानांच्या विश्लेषणावरून त्यांच्यावर परिणाम झाल्याचे आढळले. या रोपांत हायड्रोजन पॅरॉक्साइड व मॅलोनडियाल्डिडाइड या रसायनांचे जास्त आढळलेले प्रमाण त्यांच्यातील तणावाचे संकेत देत होते.

शांत वातावरणातील रोपांच्या तुलनेत गोंगाटाच्या वातावरणातील स्कार्लेट सेजच्या नमुन्यांत मॅलोनडियाल्डिडाइड दुप्पट तर झेंडूच्या नमुन्यांत तिप्पट होते. गोंगाटात ठेवलेल्या रोपांत निरोगी विकास आणि वाढ करणाऱ्या हार्मोन्सचा स्तरही खूप कमी झाला होता. त्यांच्यात जासमोनिक अॅसिड आणि अॅब्सिसिक अॅसिडचे प्रमाणही खूप जास्त होते. गोंगाटातील रोपांच्या पानांचे वजनही कमी होते.

रोपांना कान नसतात, पण गोंगाटाच्या कंपनांद्वारे त्यांना सर्व जाणीव होते
अभ्यासात असे समोर आले की, भलेही रोपांना कान नसतात, पण वाहतुकीच्या गोंगाटामुळे होणाऱ्या कंपनांमुळे त्यांच्यात तणावाची प्रतिक्रिया तशीच असते, जशी दुष्काळाच्या परिस्थितीत किंवा माती क्षार किंवा जड धातूयुक्त असल्यावर असते. सर्व प्रकारच्या ध्वनिप्रदूषणाचा परिणाम सर्व प्रजातींवर सारखाच होतो का, असाही प्रश्न होता. शहरात जसा वाहतुकीचा गोंगाट असतो तसाच प्रकार जंगलांत, निसर्गातही आढळतो. पर्वतीय भागांतील गवताळ मैदाने वादळांच्या गोंगाटाचा सामना करतात. गर्जना करत कोसळणाऱ्या धबधब्यांजवळही वनस्पती असतात. वैज्ञानिकांच्या मते, वनस्पतींच्या काही प्रजाती या गोंगाटाचा सामना करण्याची यंत्रणा विकसित करत असाव्यात. मात्र, सध्यातरी त्याबाबतचे गुपित कायम आहे.

बातम्या आणखी आहेत...