आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करायॉर्कशायरमध्ये ब्रिटनचे किंग चार्ल्स-III यांच्यावर अंडी फेकण्यात आली. हे कृत्य करणाऱ्या 23 वर्षीय तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. किंग आणि क्वीन कॉन्सोर्ट कॅमिला हे यॉर्कशायर, उत्तर इंग्लंड येथे एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी दोन दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. येथे आंदोलन करणाऱ्या तरुणाने त्यांच्यावर अंडी फेकली.
एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, राजा आणि राणी मिकलेगेट बारमध्ये (यॉर्कशायरचे पारंपरिक शाही प्रवेशद्वार) लोकांशी बोलत होते. राजाचे स्वागत करण्यासाठी लोक 'गॉड सेव्ह द किंग' गात होते, तेव्हा घोषणाबाजी करत असताना एका व्यक्तीने त्यांच्यावर अंडी फेकली. तो ओरडत होता- हा देश गुलामांच्या रक्ताने बनला आहे. आम्ही त्याला अटक केली आहे.
चार्ल्स किंग व्हावेत यासाठी अनेकांनी जीव गमावला : आरोपी
पोलिसांनी सांगितले की, अटकेनंतर आरोपी तरुण म्हणाला की, मी गुलामगिरी, कोलोनायझेशन (वसाहतवाद) आणि इम्पिरिअलिझम (साम्राज्यवाद) च्या बळींसोबत आहे. न्यायासाठी ही अंडी फेकण्यात आली. त्या माणसाला (किंग चार्ल्स) राजा बनवण्यासाठी ज्यांनी आपले प्राण गमावले त्यांना न्याय मिळावा. असा न्याय जो लोकांना दिसू शकेल.
आरोपीचे हातपाय बांधून घेऊन गेले पोलिस
घटनास्थळी उपस्थित असलेली एक महिला म्हणाली की, आम्ही सर्व राजा आणि राणीची वाट पाहत होतो. सगळे खूप उत्साहात होते. दोघेही मिकलेगेट बारजवळ पोहोचताच एका व्यक्तीने त्यांच्यावर 5 अंडी फेकली. एका माणसाचे हातपाय बांधून पोलीस त्याला घेऊन जाताना मी पाहिले. जिथून अंडी फेकली त्या बाजूला काही लोक बॅनर घेऊन उभे होते. बॅनरवर लिहिले होते- नॉट माय किंग म्हणजेच माझा राजा नाही.
कोण आहे आरोपी?
डेली मेलच्या रिपोर्टनुसार, अंडी फेकणाऱ्या व्यक्तीचे नाव पॅट्रिक थेलवेल आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील त्याच्या प्रोफाइलनुसार, तो डाव्या विचारसरणीचा कार्यकर्ता आहे आणि स्थानिक निवडणुकीत ग्रीन पार्टीचा उमेदवार आहे. पॅट्रिक युनिव्हर्सिटी ऑफ यॉर्क गार्डनिंग सोसायटीचा अध्यक्षही राहिलेला आहेत. तो ब्लॉगवर हवामान बदलाबद्दल लिहीत असतो.
दिवंगत राणी एलिझाबेथ यांच्या पुतळ्याचे अनावरण
किंग चार्ल्स एका समारंभात सहभागी होण्यासाठी यॉर्कशायरला आले होते. यादरम्यान दिवंगत राणी एलिझाबेथ यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. यापूर्वी असा सोहळा 2012 मध्ये राणी एलिझाबेथच्या उपस्थितीत पार पडला होता.
महाराणी एलिझाबेथवरही फेकण्यात आली होती अंडी
राजघराण्यातील सदस्यावर अंडी फेकण्याची ही पहिलीच वेळ नाही. 1986 मध्ये राणी एलिझाबेथवरही अंडी फेकण्यात आली होती. त्या पती प्रिन्स फिलिपसोबत न्यूझीलंड टूरवर गेली होती. त्यावेळी दोघेही मोकळ्या कारमधून लोकांमधून जात होते. त्यानंतर दोन महिलांनी त्याच्यावर अंडी फेकली. पोलिसांनी दोन्ही महिलांना अटक केली होती.
किंग चार्ल्स यांना 2001 मध्ये एका मुलीने मारली होती थप्पड
2001 मध्ये प्रिन्स चार्ल्स लॅटव्हियाच्या दौऱ्यावर होते. त्यावेळी एका 16 वर्षीय मुलीने त्यांना थप्पड मारली होती. मुलीच्या हातात फूल असले तरी तिने प्रिन्स चार्ल्सला मारले. एवढेच नाही तर या तरुणीने ब्रिटनला जगाचा शत्रूही म्हटले होते. अफगाणिस्तानमधील युद्धाच्या निषेधार्थ प्रिन्स चार्ल्सला थप्पड मारल्याचे या तरुणीने पोलिसांना सांगितले होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.