आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Ukraine Russia Waar | Indian Student Study Ukairne | Marathi News | There Is No Panic In Ukraine At All ... Schools, Markets, Offices Continue; Emotions Of Indian Students In Ukraine, Parents Heartbroken

रशिया-युक्रेन तणाव:युक्रेनमध्ये मुळीच घबराट नाही... शाळा, बाजार, कार्यालयेही सुरूच; युक्रेनमधील भारतीय विद्यार्थ्यांची भावना, पालक हवालदिल

कीव्हमधून दिव्य मराठीसाठी अनुराग शर्मा6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • विमान कंपन्यांनी तिकिटांचे दर तिप्पट, चौपट केल्याने अडचण
  • कीव्हमध्ये लोकांनी बनवले सुरक्षित तळ, कुटुंबीय शहरापासून दूर
  • भारत सरकारने आम्हाला सुखरूप मायदेशी न्यावे

रशियाकडून कोणत्याही क्षणी हल्ला होण्याची शक्यता असल्याने आम्हाला युक्रेन सोडण्याचे आदेश आम्ही शिकत असलेल्या मेडिकल कॉलेजने दिले आहेत. अजून तरी इथे फार भयावह स्थिती नाही. तरीही इथे शिक्षणासाठी आलेले ६० टक्के विद्यार्थी मायदेशी परतले आहेत. आमच्यासारखे जे अडकून पडले आहेत ते विमानाचे तिकीट मिळवण्यासाठी धडपडत आहेत. भारत सरकारने आम्हाला सुखरूप येथून घेऊन जावे, यासाठी आम्ही सारे विद्यार्थी प्रार्थना करीत आहोत.

ज्या ठिकाणी युक्रेनच्या सीमेवर तणाव आहे ते ठिकाण आम्ही राहत आहोत त्या चर्नीवत्सी (Chernivtsi) गावापासून सुमारे ५०० किलोमीटर दूर आहे. त्यामुळे आम्हाला फारसा धोका नाही, असे सांगितले जाते आहे. पण आमचे पालक हवालदिल आहेत. लवकरात लवकर आम्ही परत यावे यासाठी त्यांचा आग्रह सुरू आहे. इकडे विमान मिळणे कठीण आहे. चुकून तिकीट मिळणार असेल तर कितीतरी पट अधिक रक्कम सांगितली जात आहे. इथे मी आणि बहीण श्रद्धाही आहे. आम्ही दोघी इथल्या बुकोविनियन स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटीत वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी १३ डिसेंबरलाच आलो आहोत. विद्यापीठात जगभरातले एकूण १८५० विद्यार्थी आहेत. त्यातील ४० टक्के अजून इथेच आहेत.

आधी तणाव होता. पण आठ दिवसांपूर्वी इथल्या सरकारने विदेशी नागरिकांना देश सोडायला सांगितले आणि परिस्थिती बदलत गेली. विमान कंपन्यांनी तिकिटांचे दर तिप्पट, चौपट केले आहेत. तरीही विद्यार्थी जिवाच्या भीतीने तेही खरेदी करताहेत. इथला भारतीय दूतावासही तिकीट मिळवून देण्यासाठी प्रयत्न करतोच आहे. पण त्यांना फारसे यश येताना दिसत नाही. भाजीपाला आणि जीवनावश्यक वस्तू महागत चालल्या आहेत. त्यांच्या किमती आणखी वाढत जाणार आहेत अशी लक्षणे आहेत. त्यामुळे चिंता आहे. सुदैवाने आमचा अभ्यासक्रम ऑनलाइन पद्धतीने पूर्ण करण्याचे आश्वासन आमच्या विद्यापीठाने दिले आहे. पाहूया, काय होते ते.

युद्ध टाळण्यासाठी बायडेन यांचे ३ प्रमुख निर्णय

वॉशिंग्टन | युक्रेनमध्ये सैनिक पाठवण्याच्या रशियाच्या पावलामुळे संपूर्ण युरोपावर ७५ वर्षांनंतर युद्धाचे ढग जमू लागले आहेत. वास्तविक रशियाच्या या मनसुब्यांची कुणकुण अमेरिकेला आधीच लागली होती. त्यामुळेच अध्यक्ष जो बायडेन यांनी गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये तीन महत्त्वाचे निर्णय घेतले होते. भागीदार राष्ट्रांना जास्तीत जास्त माहितीची देवाण-घेवाण केली जाईल. म्हणजे विश्वास घेतल्याने कडक निर्बंध लावताना अडचण येऊ नये, असा त्यामागील उद्देश आहे. गुप्तचर यंत्रणा आणि स्रोतांचा वापर करून माहितीची मोठी मोहीम सुरू केली जाईल. त्यातून रशियाच्या अपप्रचाराला तोंड देता येऊ शकेल. युक्रेनच्या सीमेवरील लष्करी घेराव वाढल्याचे दिसल्यास युक्रेनला क्षेपणास्त्र प्रतिबंधक प्रणाली पाठवण्यास बायडेन यांनी परवानगी दिली.

निजामपूरचा आशुतोष परतला
धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील निजामपूर-जैताणे येथील आशुतोष भगवान जगदाळे एमबीबीएसच्या शिक्षणासाठी महाराष्ट्रातील १८ विद्यार्थ्यांच्या पहिल्या तुकडीसोबत युक्रेनला डिसेंबरमध्ये गेला होता. युद्धाचे ढग दिसताच २० फेब्रुवारी रोजी तो निजामपुरात परतला. मात्र त्याचे काही मित्र-मैत्रिणी युक्रेनमध्येच आहेत. आशुतोषच्या माध्यमातून ‘दिव्य मराठी’ने त्याची क्लासमेट कोल्हापूरची साक्षी शेटेशी संपर्क साधला असता साक्षीने युक्रेनमधील सद्य:स्थितीची माहिती दिली.

युक्रेनमधील दाेन प्रांत लुहान्स्क, दाेनेत्स्कमध्ये (डाेनबाॅसचा भाग) रशियन सैन्याने घुसखाेरी केली आहे. काेणत्याही क्षणी हल्ला हाेऊ शकताे. युद्धाची भीती असूनही युक्रेनचे लाेक सामान्य जीवन जगत आहेत. शाळा, महाविद्यालये, सुपर मार्केट नियमितपणे सुरू आहेत. अन्नधान्य, औषधीही मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. त्यामुळे घाबरून खरेदी किंवा साठेबाजीसारखी परिस्थिती येथे दिसून येत नाही. लाेक २०१४ पासून अशा प्रकारच्या तणावाखाली जीवन जगू लागले आहेत. नागरिकांना तणावाची सवय आहे. परंतु यंदा परिस्थिती गंभीर असल्याने चिंता वाटत आहे. राजधानी कीव्हमधील नागरिकांनी स्वत:ची व्यवस्था सुरक्षित ठिकाणी केली आहे. म्हणजे हल्ल्याच्या परिस्थितीत राजधानीतून बाहेर पडता येईल. कीव्हमध्ये क्षेपणास्त्र हल्ल्याची शक्यता जास्त आहे. अनेकांनी कुटुंबीयांना नातेवाइकांकडे पाठवले आहे. कीव्हमध्ये एका कंपनीचे मालक डेन्यलाे म्हणाले, पत्नी आणि दाेन मुलांना पाेलंडला नातेवाइकांकडे पाठवले आहे. सध्या मी येथेच आहे. युक्रेनच्या उत्तर व पूर्वेकडील गावांत राहणाऱ्या लाेकांसाठी हल्ले नवे नाहीत. शालेय अभ्यासक्रमातून विद्यार्थ्यांना हल्ल्याच्या काळात कशा प्रकारे बचाव करावा, हे शिकवले जाते.

बातम्या आणखी आहेत...