आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Unique Bank ... Give Time For Old Age Service Save Time Bank; In Old Age Services Will Be Available In The Savings Account As Per The Need

दिव्य मराठी विशेष:अनोखी बँक... वृद्धांच्या सेवेसाठी वेळ द्या अन् टाइम बँकेत सेव्ह करा; वृद्धापकाळी गरजेनुसार बचत खात्यातील वेळेनुसार मिळेल सेवा

बर्न6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • स्वित्झर्लंडमध्ये वृद्धांच्या सेवेची विशेष योजना, स्वयंसेवक म्हणून युवकांचा उत्स्फूर्त सहभाग

६७ वर्षीय क्रिस्टिना शाळेतून निवृत्त झाल्यानंतर एकाकी आयुष्य व्यतीत करत होत्या. त्यांना सरकारकडून पुरेसे निवृत्तिवेतन मिळते. त्यांनी घराचा एक भाग भाड्याने दिलेला आहे. त्यामुळे त्यांना कुठलीही चिंता नाही. तरीही त्या ८७ वर्षांच्या एका ज्येष्ठ नागरिकाची देखभाल करत होत्या. ‘तुम्ही हे सर्व पैशासाठी करत आहात का?’ असे भाडेकरूने क्रिस्टिना यांना विचारले. त्यावर क्रिस्टिना म्हणाल्या,‘मी पैशांसाठी नाही, तर आपला वेळ बँकेत सुरक्षित ठेवण्यासाठी करत आहे. जेव्हा मी वृद्ध होईन तेव्हा मी हा बचत केलेला वेळ परत घेऊ शकेन.’ स्वित्झर्लंडने ‘टाइम बँक’ ही योजना सुरू केली आहे. त्याअंतर्गत देशातील नागरिक कोणाच्या मदतीसाठी आपला वेळ देऊन तो ‘अर्जित रकमे’च्या रूपात टाइम बँकेत सेव्ह करू शकतात. भविष्यात आवश्यकता भासल्यास ते त्याचा उपयोगही करू शकतील.

स्वित्झर्लंडच्या आरोग्य मंत्रालयाने ही योजना एकटे राहणाऱ्या ज्येष्ठांसाठी विशेषत्वाने सुरू केली आहे. त्याअंतर्गत देशातील लोक गरजू वृद्धांची प्रकृती बिघडल्यास त्यांच्याकडे स्वेच्छेने लक्ष देऊ शकतात किंवा एकाकीपण दूर करण्यासाठी ज्येष्ठांसोबत वेळ घालवू शकतात. ज्येष्ठांना दिलेला हा वेळ या स्वयंसेवकांच्या सामाजिक सुरक्षा खात्यात ‘टाइम युनिट’च्या रूपात जमा होतो. जेव्हा हे स्वयंसेवक वृद्धावस्थेत पोहोचतील आणि त्यांनाही कुठल्याही कामासाठी मदतीची गरज असेल तेव्हा टाइम बँक त्यांच्यासाठी स्वयंसेवकाची व्यवस्था करेल. जेवढा वेळ त्यांनी टाइम बँकेत जमा केला असेल तेवढ्याच वेळासाठी त्यांनाही मदत मिळेल. जगभरात ज्येष्ठांची संख्या वाढत आहे. मुले नोकरी आणि करिअरमुळे सोबत राहू शकत नाहीत. त्यामुळे ही संकल्पना उपयुक्त ठरत आहे. अमेरिका, ब्रिटन, जपान, न्यूझीलंड, स्पेन आणि ग्रीससारख्या देशांनीही ही पद्धत अवलंबली आहे. सिंगापूरही ती लागू करण्याबाबत विचार करत आहे. या संकल्पनेवर अमेरिकी प्रा. एडगर चान यांनी सर्वात आधी म्हणजे १९८० मध्ये चर्चा सुरू केली होती. तेव्हा रिगन सरकारने मोठ्या प्रमाणात सामाजिक कार्यक्रमांत कपात केली होती. प्रा. चान यांनी त्याला पर्याय म्हणून ही योजना सादर केली होती.

स्वयंसेवकांनी कामासाठी दिलेल्या वेळेचे ट्रॅकिंग करते टाइम बँक टाइम बँकेची संकल्पना देवाणघेवाणीच्या मॉडेलवर आधारित आहे. त्याअंतर्गत आयटी सेवा, सल्ला घेणे, मुलांची देखभाल, गार्डनिंग, घरात दुरुस्ती किंवा इतर वेळ लागणाऱ्या कामांचा समावेश आहे. कामासाठी लागलेल्या वेळेचे टाइम बँकेद्वारे ट्रॅकिंग केले जाते. हा वेळ टाइम युनिटच्या रूपात जमा होतो. योजनेत स्विस युवक मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. त्यांच्या मते, उतरत्या वयात त्यांनाही मदतीची गरज भासेल तेव्हा हा वाचवलेला वेळच आमच्या उपयोगास येईल.

बातम्या आणखी आहेत...