आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअमेरिकेत कॅपिटल हिल म्हणजेच संसदेतील हिंसाचाराच्या वेळी सभागृहाच्या माजी अध्यक्ष नॅन्सी पेलोसी यांच्या कार्यालयात डेस्कवर पाय ठेवून बसलेल्या आरोपीला साडेचार वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. रिचर्ड बिगो बार्नेट हा अर्कान्सासमधील 63 वर्षीय निवृत्त अग्निशामक आहे. तो 6 जानेवारी 2021 रोजी कॅपिटल हिल हिंसाचारात सामील होता.
त्यानंतर तो स्टन गन आणि हातात 4.5 किलोचा स्टील रॉड घेऊन पेलोसींच्या कार्यालयात घुसला. पेलोसींच्या डेस्कवर पाय ठेवलेल्या बार्नेटचा फोटो खूप व्हायरल झाला होता. याशिवाय त्याने अधिकृत पत्रावर पेलोसींसाठी एक चिठ्ठीही लिहिली होती. या प्रकरणात त्याच्यावर 8 आरोप लावण्यात आले होते. यामध्ये गुन्ह्याचा आणि सरकारी कामात अडथळा आणणे यासारख्या आरोपांचा समावेश होता.
या वर्षी जानेवारीमध्ये बार्नेटला सर्व आरोपांमध्ये दोषी ठरवण्यात आले होते. कोर्टात सुरू असलेल्या कामकाजादरम्यान त्याने सांगितले की, आपण आपली चूक मान्य करतो, परंतु आपण हे जाणूनबुजून केले नाही.
बार्नेट म्हणाला- मी शांततापूर्ण निदर्शनासाठी आलो होतो
खटल्यादरम्यान, बार्नेटने दावा केला की, तो प्रथम आर्कान्सामधून शांततापूर्ण निदर्शनासाठी वॉशिंग्टनला आला होता. हिंसाचार सुरू असताना त्याला शौचालयात जावे लागले. या कारणास्तव तो चुकून पेलोसींच्या कार्यालयात घुसला. त्यावेळी 2 फोटोग्राफर तिथे उपस्थित होते. त्यांनी बार्नेटला तिथे आरामात राहण्यास सांगितले. ते ऐकून तो खुर्चीवर बसला आणि टेबलावर पाय ठेवला. एवढा मोठा गुन्हा घडेल याची त्याला कल्पनाही नव्हती.
हिंसाचाराच्या वेळी बार्नेट म्हणाला होता- आम्ही संसद परत घेतली
वकिलांनी सांगितले की, बार्नेटने कॅपिटल इमारतीतून बाहेर आल्यानंतर जमावाला संबोधित केले. तो म्हणाला होता- आज आम्ही आमची संसद परत घेतली आणि मी नॅन्सी पेलोसी यांचे कार्यालय परत घेतले. वकिलांनी न्यायाधीशांना बार्नेटला सात वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा करण्यास सांगितले.
मात्र, त्याचा हेतू कोणालाही धमकावण्याचा किंवा इजा करण्याचा नव्हता, असे बार्नेटने सांगितले. त्यावर बचाव पक्षाच्या वकिलांनी शिक्षा 6 महिन्यांपेक्षा कमी ठेवण्याचे आवाहन केले. ते म्हणाले की, बार्नेट फक्त शांततापूर्ण निषेधासाठी आला होता आणि अनिच्छेने हिंसाचारात अडकला होता.
आता 4 मुद्द्यांत जाणून घ्या कॅपिटल हिंसा म्हणजे काय?
1. अमेरिकेत 6 जानेवारी 2021 रोजी कॅपिटल हिलमध्ये म्हणजेच अमेरिकन संसदेत ट्रम्प यांच्या समर्थकांकडून हिंसाचार झाला होता. 3 नोव्हेंबर 2020 रोजी अध्यक्षीय निवडणुकीसाठी झालेल्या मतदानात बायडेन यांना 306 आणि ट्रम्प यांना 232 इलेक्टोरल मते मिळाली. निकाल येताच ट्रम्प आणि त्यांच्या समर्थकांनी निवडणुकीत हेराफेरीचे आरोप केले.
2. मतदानाच्या 64 दिवसांनंतर जेव्हा अमेरिकन संसद बायडेन यांच्या विजयावर शिक्कामोर्तब करण्याचा प्रयत्न करत होती, तेव्हा ट्रम्प यांच्या समर्थकांनी संसदेत प्रवेश केला. तोडफोड आणि हिंसाचार झाला. यामध्ये एका पोलीस अधिकाऱ्यासह 5 जणांचा मृत्यू झाला होता. हिंसाचारानंतर ट्रम्प यांच्यावर त्यांच्या समर्थकांना भडकवल्याचा आरोप करण्यात आला होता.
3. प्रकरणाचा तपास 18 महिने चालला. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये चौकशी समितीने 845 पानी अहवाल तयार केला होता. यासाठी ट्रम्प यांना जबाबदार धरण्यात आले. त्यांच्यावर फौजदारी खटल्याची शिफारस करण्यात आली होती. यासाठी 1000 प्रत्यक्षदर्शींचे जबाब नोंदवण्यात आले. याशिवाय 940 हून अधिक लोकांना आरोपी करण्यात आले होते. यापैकी 500 जणांनी आतापर्यंत आपला गुन्हा मान्य केला आहे.
4. न्यूयॉर्क टाइम्सच्या वृत्तानुसार, चौकशी समितीने ट्रम्प यांच्यावर अध्यक्षीय निवडणुकीतील पराभवाचा निर्णय उलथवून टाकणे, बंडखोरीला चिथावणी देणे, अधिकृत कारवाईत अडथळा आणणे, कट रचणे, खोटी विधाने करणे आणि देशाचा विश्वासघात केल्याचा आरोप केला. त्यानंतर समितीने हे प्रकरण न्याय विभागाकडे पाठवले.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.