आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापंतप्रधान नरेंद्र मोदी तीन दिवसीय अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. मोदी यांनी काल अमेरिकेच्या उपराष्ट्रपती कमला हॅरीस यांची भेट घेतली. दरम्यान, आज पंतप्रधान मोदी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांची भेट घेणार आहेत. जो बायडेन यांनी 20 जानेवारी रोजी अमेरिकेच्या राष्ट्रपतीपदाची शपथ घेतली होती. पंतप्रधान मोदी आणि जो बायडेन यांची ही समोरासमोरची पहिलीच भेट असणार आहे.
विशेष म्हणजे दोन्ही देशात कोरोना महामारीचा प्रार्दुभाव दिवसेंदिवस वाढत आहे. तर दुसरीकडे, वेगाने लसीकरण हे एक आव्हान आहे. सध्या दोन्ही देशांपुढे समान आव्हान आहेत. त्यामुळे संपूर्ण जगाचे लक्ष या बैठकीकडे लागले आहे. अफगाणिस्तान वादावरही या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
आधीच्या वेळापत्रकात नव्हती बैठक
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अमेरिका दौऱ्याचे वेळापत्रक जेव्हा तयार करण्यात आले. तेव्हा सुरुवातीला मोदी जो बायडेन यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करतील असे ठरले नव्हते. परंतु, काही दिवसांनंतर व्हाईट हाऊसने याबाबत माहिती दिली आणि जो बायडेन व्हाईट हाऊसमध्ये पंतप्रधान मोदींचे स्वागत करतील असे सांगितले. त्यानंतर भारताचे परराष्ट्र सचिव हर्षवर्धन शृंगला यांनी या बैठकीबाबत पुष्टी केली.
भारताचे महत्त्व
मोदी संयुक्त राष्ट्राच्या महासभेच्या वार्षिक बैठकीत सहभागी होण्यासाठी अमेरिकेत गेले असले, तरी तुम्ही मोदी यांचे वेळापत्रक बारकाईने पाहिल्यास या भेटीचे राजनैतिक महत्त्व खूप जास्त आहे हे लक्षात येईल. त्यामुळे तीन पॉईंट्समध्ये समजून घेऊया हा दौरा...
1. क्वाडमध्ये चार देश आहेत. भारत, अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि जपान. विशेष म्हणजे या चारही देशांना आव्हान आणि धोका असेल तर ते थेट चीनकडून आहे. त्यामुळे चारही देशांचे राष्ट्रप्रमुख आभासी बैठकीऐवजी समोरासमोरील बैठकीसाठी वॉशिंग्टनला पोहोचले आहेत.
2. बायडेन आणि कमला हॅरिस दोघेही क्वाड देशांच्या नेत्यांना भेटणार आहेत. हे स्पष्ट आहे की, चीन हिंदी आणि प्रशांत महासागरात वर्चस्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करीत आहे. छोट्या देशांना धमकी देत आहे या बैठकीमुळे आता त्याचा थेट प्रतिकार केला जाईल.
3. मोदींनी यापूर्वी अमेरिकेचे दोन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत काम केले आहे. विशेष म्हणजे बायडेन प्रशासनाने भारताबाबत ट्रम्प यांच्यासारखाच दृष्टिकोन घेतला आहे. कारण 'रिपब्लिकन आणि डेमोक्रॅट्सचे भारताबाबत समान मत आहे' असे अलीकडेच वॉशिंग्टन पोस्टने लिहिले होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.