आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करायुक्रेनचे राष्ट्रपती वोलोदिमीर झेलेन्स्की यांची हेरगिरी केली जात आहे आणि हे काम करणारे दुसरे कुणी नसून खुद्द अमेरिका आहे. पेंटागॉनच्या लीक झालेल्या गोपनीय युद्ध दस्तऐवजांमधून हा खुलासा झाला आहे. लीक झालेल्या काही गुप्तचर फाईल्स गेल्या आठवड्यात अमेरिकन मीडिया सीएनएनने मिळवल्या होत्या. ज्यामध्ये झेलेन्स्कींच्या हेरगिरीबद्दल माहिती देण्यात आली आहे.
यात सांगण्यात आले आहे की अमेरिका झेलेन्स्की आणि त्यांच्या अधिकाऱ्यांमधील चर्चेवर सातत्याने नजर ठेवते, म्हणजेच ही चर्चा चोरून ऐकते. तर न्यूयॉर्क टाइम्सच्या वृत्तानुसार, अमेरिकेने युक्रेनला शस्त्रे देण्यासाठी दक्षिण कोरियावर दबाव टाकला आणि त्यांच्या राष्ट्रपतींचीही हेरगिरी केल्याचे लीक झालेल्या फाईल्समधून समोर आले आहे.
दक्षिण कोरियाच्या राष्ट्रपतींचीही हेरगिरी
बीबीसीच्या वृत्तानुसार, अमेरिकेने केवळ झेलेन्स्कींचीच नव्हे तर दक्षिण कोरियाचे राष्ट्रपती यून सुक येऊल आणि त्यांच्या दोन उच्चपदस्थ अधिकाऱ्यांचीही हेरगिरी केली आहे. अमेरिकेने दोन अधिकाऱ्यांमधील एक संवाद ऐकला आहे. ज्यामध्ये युक्रेनला शस्त्र देण्यावरून त्यांच्यात वाद झाला होता. यातील एका अधिकाऱ्याचे म्हणणे होते की, युक्रेनऐवजी पोलंडला शस्त्रे देऊन ते हे सिद्ध करू शकतात की, ते अमेरिकेच्या दबावाखाली आले नाहीत.
दक्षिण कोरियाने गेल्या वर्षीच अमेरिकेला शस्रास्रे पाठवण्याचे मान्य केले होते. यासोबतच त्यांनी अमेरिकेकडून हे आश्वासनही घेतले होते की हे शस्त्र ते युक्रेनला पाठवणार नाही. लीक झालेल्या फाईल्समधून हेही समोर आले आहे की, दक्षिण कोरियाचे सरकारी अधिकारी यी मुन हुई यांना यावर विश्वास नव्हता की ही शस्त्रे अमेरिका स्वतःकडेच ठेवेल.
दक्षिण कोरिया हेरगिरीची चौकशी करणार
एकीकडे युक्रेनचे राष्ट्रपती वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी अमेरिकेने केलेल्या हेरगिरीत काहीही नवीन नसल्याचे म्हटले आहे. तर दक्षिण कोरियात मात्र खळबळ उडाली आहे. विरोधक हा मुद्दा उपस्थित करत असून त्यांनी याला अमेरिकेने आपल्या देशाच्या सार्वभौमत्वावर केलेला हल्ला म्हटले आहे. या कृत्याबद्दल अमेरिकेने माफी मागावी, असे तेथील विरोधी पक्षनेते ली जे म्युंग यांनी म्हटले आहे. या सर्व परिस्थितीमध्ये तिथल्या सरकारने या हेरगिरीची चौकशी करू असे म्हटले आहे.
यासोबतच राष्ट्रपती आणि त्यांच्या अधिकाऱ्यांमधील संभाषण कोणत्याही प्रकारे लीक होऊ शकत नाही, असेही सांगण्यात आले आहे. दक्षिण कोरियाचे राष्ट्रपती 26 एप्रिल रोजी अमेरिकेच्या दौऱ्यावर जाणार असताना या हेरगिरीचा खुलासा झाला आहे हे विशेष.
अमेरिकेचे स्पष्टीकरण
अल जझीराच्या वृत्तानुसार, हेरगिरीची माहिती समोर आल्यानंतर अमेरिकेचे संरक्षण सचिव लॉयड ऑस्टिन यांनी दक्षिण कोरियाच्या संरक्षण सचिवांशी संवाद साधला आहे. ऑस्टिन यांनी म्हटले आहे की, ही कागदपत्रे बदलण्यात आली आहेत.
तज्ज्ञांनी म्हटले आहे की, हे बदल म्हणजेच रशियाकडून चुकीची माहिती पसरवण्याचा प्रयत्न असू शकतात. तथापि, मूळ दस्तऐवजात उपस्थित शस्त्रे वितरण, लष्करी सामर्थ्य आणि इतर गुप्तचरांशी संबंधित फोटो लीक होणे हे अमेरिकन गुप्तचर संस्थेच्या सुरक्षा व्यवस्थेतील एक मोठी त्रुटी दर्शवते.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.