आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिनपिंग यांना झटका:चीनच्या धनाढ्यांची संपत्ती फॅमिली ऑफिसच्या आडून सिंगापूरला सुरक्षित, वर्षभरात संख्या दुपटीवर, सरकारी धोरणाला श्रीमंतांचा विरोध

बीजिंग3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

चीनमध्ये आपला पैसा सुरक्षित राहील की नाही, अशी चिंता चीनच्या धनाढ्यांना सतावू लागली आहे. त्या दृष्टीने पैसा ठेवण्यासाठी सिंगापूर सुरक्षित ठिकाण असल्याचे त्यांना वाटू लागले आहे. या श्रीमंत वर्गाने आता आपला पैसा सिंगापूरला हलवण्यास सुरुवातही केली आहे. २०१९ मध्ये हाँगकाँग येथील निदर्शनांमुळे अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला होता. त्यानंतर चीनमधील धनाढ्य संपत्ती वाचवण्यासाठी पर्यायी सुरक्षित ठिकाणाचा शोध घेत होते. त्यांना सिंगापूर आकर्षक वाटू लागले. कारण सिंगापूरमध्ये मंडारिन भाषिक समुदाय मोठ्या प्रमाणात राहतो. इतर देशांच्या तुलनेत सिंगापूरमध्ये संपत्तीवर करदेखील लावला जात नाही. चीनमध्ये गेल्या वर्षी सरकारने शिक्षण तसेच रिअल इस्टेट कंपन्यांच्या विरोधात सक्तीचे नियम लागू केले. त्यानुसार सकल समृद्धी योजनेची अंमलबजावणी तेथील श्रीमंत वर्गाला आवडली नाही. तेव्हापासूनच श्रीमंत वर्गाचा पैसा सिंगापूरकडे वळला. हा पैसा वेगाने सिंगापूरला पाठवला जात आहे. शी जिनपिंग सरकार श्रीमंतांच्या विरोधात कडक धोरणाची अंमलबजावणी करत आहे. परंतु सिंगापूरच्या कंपन्या फॅमिली ऑफिसच्या नावाखाली सर्व संपत्ती सिंगापूरला स्थलांतरित करण्यासाठी चीनच्या श्रीमंतांना मदत करू लागल्या आहेत. फॅमिली ऑफिस एक खासगी कंपनी असते. ही कंपनी श्रीमंत कुटुंबांची गुंतवणूक व संपत्ती व्यवस्थापनाचे काम पाहते.

अब्जाधीशांमध्ये चीनचा दुसरा क्रमांक
फोर्ब्जच्या म्हणण्यानुसार गेल्या काही दशकांत चीनचा झपाट्याने आर्थिक विकास झाला. त्यातूनच देशात शेकडो अब्जाधीश झाले. गेल्या वर्षी फोर्ब्जच्या यादीत अनेकांच्या नावाचा समावेश करण्यात आला. त्यांची संख्या ६२६ वर पोहोचली आहे. अमेरिकेनंतर सर्वाधिक अब्जाधीश चीनमध्ये आहेत.

बातम्या आणखी आहेत...