आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
अमेरिकेच्या संसदेत गुरुवारी झालेल्या दंगल आणि हिंसाचारासाठी मावळते राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनाच जबाबदार मानले जात आहे. ट्रम्प यांच्यामुळेच मोठ्या संख्येने जमलेल्या त्यांच्या समर्थकांनी कॅपिटल हिलमध्ये हिंसाचार केला आणि यामध्ये 4 जणांचा जीव गेला. पण, कायद्याने ट्रम्प यांना जबाबदार धरून शिक्षा दिली जाईल का हा एक मोठा प्रश्न आहे. त्यातही व्हाइट हाउसमधून बाहेर पडल्यानंतर ट्रम्प यांना अटक होणार का? त्यांचा कार्यकाळ संपण्यासाठी अजुनही 12 दिवस आहेत. अशात त्यांचा कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वीच पदावरून हटवण्यात येईल का असेही सवाल उपस्थित केले जात आहेत.
12 दिवस राष्ट्राध्यक्ष राहणार की नाही?
अमेरिकेच्या राज्यघटनेतील 25 व्या दुरुस्तीनुसार राष्ट्राध्यक्षांना त्यांचेच कॅबिनेट हटवू शकते. यासाठी मंत्रिमंडळाच्या बहुमतासह उपराष्ट्राध्यक्षांच्या पाठिंब्याची गरज आहे.
अमेरिकन माध्यम CNN च्या वृत्तानुसार, ट्रम्प यांच्या कॅबिनेटला वाटते की गुरुवारी झालेल्या हिंसाचारासाठी ट्रम्प यांचे भडकाउ भाषणच जबाबदार आहे. त्यामुळे, ट्रम्प यांना 12 दिवस पूर्ण होण्याआधीच पदावरून हटवण्यासाठी बैठका सुद्धा घेतल्या जात आहेत. ट्रम्प यांच्यावर महाभियोग चालवणे कठीण आहे. त्यांना हटवणे सुद्धा वाटते तितके सोपे नाही. कारण, उपराष्ट्राध्यक्ष माइक पेन्स त्यांच्या पाठीशी आहेत. ट्रम्प यांना त्यांनी सुनावले असले तरीही ते ट्रम्प यांची साथ सोडणार नाहीत.
ट्रम्प यांना पाठीशी का घालत आहेत पेन्स?
7 जानेवारी रोजी घडलेल्या घटनेला अमेरिकेच्या इतिहासातील काळा दिवस म्हटले जात आहे. तरीही ट्रम्प यांच्यावर महाभियोग चालवून त्यांना पदावरून हटवण्यास उपराष्ट्राध्यक्ष इच्छूक नाहीत. असे झाल्यास रिपब्लिकन्स पक्षाच्या राजकारणावर तो एक डाग ठरेल. दुसरे कारण म्हणजे, असेही होऊ शकते की येणाऱ्या राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत रिपब्लिकन्सचे उमेदवार पेन्स ठरतील. त्यांनी ट्रम्प विरोधात काही निर्णय घेतल्यास त्यांना पुढच्या निवडणुकीत ट्रम्प समर्थकांचा पाठिंबा मिळणे अशक्य राहील. अशात ट्रम्प यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता फार कमी आहे.
मग तुरुंगातही जाणार नाहीत ट्रम्प?
USA TODAY च्या एका वृत्तानुसार, ट्रम्प यांच्याच भडकाऊ भाषणामुळे हिंसाचार उसळ्याचे सबळ पुरावे तपास संस्थांकडे उपलब्ध आहेत. कॉर्नेल लॉ इंस्टिट्यूटचे प्राध्यापक डेविड ओहलीन यांच्या मते, हिंसाचारासाठी ट्रम्प हेच जबाबदार आहेत. त्यांनी गुन्हा केला असून त्यांच्यावर खटला चालवायला हवा. जॉर्ज वॉशिंगटन लॉ यूनिव्हर्सिटीचे डीन फ्रेडरिक लॉरेन्स सांगतात की कार्यवाहक अटॉर्नी जनरल माइकल शेरविन यांनी सुद्धा ट्रम्प यांच्यावर कारवाईचे समर्थन केले आहे.
चर्चा होत असल्या तरीही कायद्याने ट्रम्प यांच्याकडे दोन कार्ड आहेत. पहिला म्हणजे, राष्ट्राध्यक्ष म्हणून ते एखाद्या चुकीसाठी स्वतःला माफ करू शकतात. दुसरे म्हणजे, माफी नाही मिळाली तरीही खटला झाल्यास त्याला वेळ खूप जाणार आहे. अशात कायद्यातील पळवाटा शोधून ते सुटतील. कारण, त्यांनीच हिंसाचार घडवला याचे प्रत्यक्ष पुरावे सुद्धा नाहीत.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.