आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअफगाणिस्तानमधील सत्ताधारी तालिबानने एका महिलेला जाहीरपणे कोरडे ओढल्याची संतापजनक घटना उजेडात आली आहे. ही महिला कोणत्याही पुरुषाविना बाजारात एकटी शॉपिंग करत होती. या मारहाणीचा एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे.
व्हिडिओत सदर महिला जमिनीवर बसल्याचे व एक पुरुष तिला फटके मारताना दिसत आहे. ही घटना केव्हाची आहे हे अद्याप स्पष्ट झाले नाही. पण मानवाधिकार संघटनांनी संयुक्त राष्ट्राकडे तालिबानच्या राजवटीत घडणाऱ्या अशा घटनांच्या चौकशीची मागणी केली आहे.
विद्यापीठात हिजाबशिवाय मुलींना प्रवेश नाही
अफगाणिस्तानातील महिलांवर होणाऱ्या अत्याचाराचे असे अनेक व्हिडिओ उजेडात येत आहेत. 29 नोव्हेंबर रोजी तालिबानने काही मुलींना बाल्ख क्षेत्रातील विद्यापीठात जाण्यापासून रोखले होते. कारण, त्यांनी आपला चेहरा योग्यपणे झाकला नव्हता.
संयुक्त राष्ट्राचे तज्ज्ञ म्हणाले - आंतरराष्ट्रीय कायद्यांतर्गत चौकशी व्हावी
अफगाणिस्तानातील तालिबानच्या सत्तेला 15 महिने लोटलेत. या कालावधीत मानवाधिकार कार्यकर्त्यांनी अनेकदा संयुक्त राष्ट्राकडे महिलाधिकारांच्या सुरक्षेची मागणी केली आहे. या अंतर्गत 25 नोव्हेंबर रोजी संयुक्त राष्ट्राच्या एका तज्ज्ञानेही तालिबानच्या राजवटीत महिलांवर होणाऱ्या अत्याचारांची आंतरराष्ट्रीय कायद्यांतर्गत चौकशी करण्याची मागणी केली आहे.
अफगाणिस्तानात खुलेआम शिक्षा देण्याची परंपरा परतली
तालिबानने अफगाणची सत्ता हाती घेतल्यानंतर नागरिकांना पुन्हा एकदा खुलेआमपणे शिक्षा देण्याची पद्धत परतली आहे. यापूर्वी 24 नोव्हेंबर रोजी तालिबानने फुटबॉल स्टेडियममधील हजारोंच्या जमावापुढे 12 जणांना नैतिक गुन्हेगार म्हणून खुलेआम मारहाण केली होती. यात 3 महिलांचा समावेश होता. तालिबानी अधिकाऱ्यांच्या मते, या आरोपींवर चोरी, वेश्या व्यवसाय व गे सेक्सचे आरोप होते. नोव्हेंबर महिन्यात दुसऱ्यांदा तालिबानने एखाद्या शिक्षेप्रकरणी नागरिकांना जाहीर शिक्षा दिली आहे.
गत महिन्यात 19 जणांना मिळाली होती अशी शिक्षा
BBCच्या वृत्तानुसार, गत आठवड्यात अफगाणच्या तखार प्रांतातही अशीच एक घटना घडली होती. त्यात 19 जणांना शिक्षा देण्यात आली होती. नुरिस्तान प्रांतातील एका महिलेला गाणी ऐकल्याप्रकरणी मारहाण करण्यात आली होती. तालिबानचा सुप्रीम लीडर हिबतुल्लाह अखुंदजादा याच्या आदेशांनंतर अफगाणमध्ये अशा क्रूर शिक्षा देण्याची पद्धत सुरू झाली आहे. या सर्व शिक्षा शरिया कायद्यानुसार दिल्या जात असल्याचा दावा केला जातो.
जाणून घ्या, काय आहे अफगाणचा शरिया कायदा
तालिबानने अफगाणिस्तानची सत्ता हाती घेतल्यानंतर देशात अनेक प्रकरणांत शरिया कायदा लागू होणार असल्याचे स्पष्ट केले होते. शरिया इस्लामला मानणाऱ्या लोकांची एक लीगल सिस्टम आहे. त्यात दैनंदिन आयुष्यापासून अनेक प्रकारच्या मोठ्या मुद्यांवर कायदे आहेत. शरियाचा उल्लेख इस्लामच्या पवित्र कुरानसह पैगंबर मोहम्मद यांच्या सुन्ना व हदीस या उपदेशांतही आहे. या कायद्यांतर्गत गुन्हे करणाऱ्यांना कठोर शासन केले जाते. शरिया कायद्यात जीवन जगण्याचा मार्ग सांगण्यात आला आहे.
शरियाचे उल्लंघन केल्यास कठोर शिक्षा
सर्वच मुस्लिमांनी शरिया कायद्यानुसार जीवन जगावे अशी अपेक्षा केली जाते. एका मुस्लिम व्यक्तीने आपल्या दैनंदिन जीवनात काय करावे व काय करू नये हे शरिया सांगते. शरियात कौटुंबिक, वित्त व व्यवसायाशी संबंधित कायदे आहेत. मद्यपान, अंमली पदार्थांचे सेवन व तस्करी शरियातील सर्वात मोठ्या गुन्ह्यांपैकी एक आहेत. एखाद्या व्यक्तीने या कायद्याचे उल्लंघन केले तर तो ईश्वराविरोधात केलेला गुन्हा मानला जातो. यामुळेच या गुन्ह्यांसाठी शरियात कठोर शिक्षेची तरतूद आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.