आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जागतिक मातृभाषा दिन विशेष:ठेच लागल्यावर पाकिस्तानातही ओठावर येते ती माय मराठीच!

कराची / पार्वती शंकर गायकवाड13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
कराचीतील मराठी कुटुंबांतील मुले रोज मराठीचा असा अभ्यास करतात. - Divya Marathi
कराचीतील मराठी कुटुंबांतील मुले रोज मराठीचा असा अभ्यास करतात.
  • पाकिस्तानच्या कराचीतील रहिवासी पार्वती गायकवाड यांची भावना, पंचाहत्तरीत गिरवताहेत मराठी भाषेचे धडे

फाळणीच्या वेळी अनेक मराठी कुटुंबे पाकिस्तानच्या कराचीत स्थायिक झाली. तेथे आजही भोसले, जाधव, गायकवाड, कांबळे, सांडेकर, प्रकाश, राजपूत अशी दीडशेच्या वर मराठी कुटुंबे आहेत. त्यांनी मराठी संस्कृती व भाषा प्राणपणाने जपली. मागील दोन महिन्यांपासून साताऱ्यातील दिलीप पुराणिक व त्यांचे कुटुंबीय तेथील मराठी कुटुंबीयांना मराठीचे धडे देत आहेत. जागतिक मातृभाषा दिनानिमित्त मूळ मराठी असलेल्या पार्वती गायकवाड यांच्या भावना त्यांच्याच शब्दांत….

मी पाकिस्तानात असले तरी भारत अन् महाराष्ट्राशी माझी नाळ कायम जुळलेली आहे. आम्ही मूळ महाराष्ट्रातले. माझी आई-वडील मराठी. त्यामुळे या भाषेबद्दल आणि संस्कृतीबद्दल कायमच आपलेपणाची भावना मनात आहे. आमच्यासारखी कराचीत अनेक मराठी कुटुंबे आहेत. आम्ही मराठी शिकणं सुरू केल्यानंतर साताऱ्यातील दिलीप पुराणिक सरांचं आणि माझं बहीण-भावाचं नातं निर्माण झालं. दिलीपदादांकडून मराठीचे धडे घ्यायला लागल्यापासून मला माझं हरवलेलं माहेरपण मिळाल्यासारखं वाटतंय. ऑनलाइन मीटिंगमध्ये एकदा दिलीपदादांनी मला मराठी गाणं गाण्याचा हट्ट केला. तेव्हा मी ‘मेंदीच्या पानावर मनं अजून झुलतंय गं...’ हे गाणंही गायलं होतं. माझ्याकडून मराठी गाणं ऐकताना त्यांना जेवढा आनंद झाला असेल त्यापेक्षा कैक पटीने जास्त मला समाधान मिळालं. सध्या मी वयाच्या पंचाहत्तरीत आहे. आता चालता चालता ठेच जरी लागली तरी माँ किंवा मम्मी हा उच्चार ओठावर येण्याआधी मराठीतील ती मायच मला आठवते.

पुढच्या पिढ्यांचं संस्कृती आणि मराठी भाषेशी नातं कायम राहावं म्हणून आम्ही दरवर्षी गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, दिवाळी, होळी, मकरसंक्रांती आणि गुढीपाडवा असे सर्व मराठी सण एकत्र येऊन साजरे करतो.

पुराणिक कुटुंबीय शिकवतात मराठी
कराचीतील आताची महाराष्ट्रीयन पिढी इच्छा असूनही ही भाषा पूर्णपणे आत्मसात करू शकत नाही. कारण, तेथे ही भाषा शिकवणारे कुणी मिळत नाहीत. साताऱ्यातील दिलीप पुराणिक, त्यांच्या पत्नी संगीत विशारद माधुरी, करिअर मार्गदर्शन करणारा इंजिनिअर मुलगा स्वप्निल व एमएस्सी शिक्षण झालेली त्यांची मुलगी श्रुती पुराणिक यांनी मराठी शिकवण्याचा विडा उचलला. ते गेली दोन महिने दर रविवारी दुपारी एक ते दीड तास ऑनलाइन मराठी भाषेची शिकवणी देतात. २७ फेब्रुवारीला मराठी भाषा गौरव दिनही हे सर्वजण एकत्रित साजरे करणार आहेत.

आमचे विठ्ठलाशी नाते, जेजुरीचा खंडेराया प्रिय
महाराष्ट्रातील अनेक मराठी कुटुंबांशी आमचे आजही नाते कायम आहे. पंढरपूरची विठ्ठल-रखुमाई, जेजुरीचा खंडोबा, शिर्डीचे साईबाबा यांच्याबद्दल आमच्या मनात प्रचंड आस्था आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचाही आम्हाला खूप अभिमान आहे. -विशाल राजपूत, सदस्य, मराठी पंचायत कम्युनिटी, कराची.
शब्दांकन : नितीन पोटलाशेरू

बातम्या आणखी आहेत...