आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

न्यूयॉर्क:चेहरा आणि हातांच्या प्रत्यारोपणासाठी डॉक्टरांचा वर्षभर सराव; रुग्ण म्हणाला - रात्रीच्या गर्भात उष:काल असतो, यामुळे आशा सोडू नका

न्यूयॉर्क25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अपघातात 80% भाजलेल्या व्यक्तीचा चेहरा व दोन्ही हातांचे जगात प्रथमच प्रत्यारोपण

जुलै २०१८ मध्ये एका रस्ते अपघातात ८०% वर भाजलेल्या तरुणावर चेहरा व दोन्ही हातांचे यशस्वी प्रत्यारोपण झाले. दुहेरी प्रत्यारोपणानंतर रुग्ण बरा होऊन दैनंदिन आयुष्यात रुजू झाल्याचे हे जगातील पहिलेच उदाहरण ठरले आहे.

नाइट शिफ्टनंतर कारने घर परतताना वक्त न्यूजर्सीच्या २२ वर्षीय जोसेफ डिमियोला झापड आली हाेती. यामुळे त्याची कार उलटली आणि तिचा स्फोट झाला. त्याचे शरीर थर्ड डिग्री म्हणजे ८०% पेक्षा जास्त भाजले. सुदैवाने त्याला जिवंत बाहेर काढण्यात आले. मात्र त्याचे ओठ व पापण्या जळाल्या. बोटे माेडली, चेहरा कटला होता. उपचारांदरम्यान डिमियोला ४ महिने बर्न युनिटमध्ये ठेवले गेलै. अडीच महिने वैद्यकीय कोमात ठेवले. या दरम्यान दोन डझन रिकन्स्ट्रक्टिव्ह सर्जरीमुळे त्याची नजर अधू झाली. त्याच चालणे-फिरणेही बंद झाले. यानंतर डॉक्टर्सनी चेहरा व दोन्ही हातांच्या प्रत्यारोपण करण्याचे ठरवले. मात्र मध्येच काेरोना महामारी उद्भवली. २०२० च्या सुरुवातीस अवयवदानात घट झाल्याने त्याला १० महिने वाट पाहावी लागली. तसेच प्रत्यारोपण टीममधील सदस्य आपत्कालीन ड्यूटीवर होते. सर्जरी करणाऱ्या टीमचे प्रमुख डॉ. एडुआर्डो रॉड्रिग्ज म्हणाले, डॉक्टर पीपीई किट घालून सराव करत होते. टीमने वर्षभरात शेकडो वेळा सराव केला. उपयुक्त डोनर मिळाल्यानंतर १२ ऑगस्ट २०२० ला अत्यंत जोखमीची शस्त्रक्रिया करण्यात आली. ती २३ तास चालली. १४० पेक्षा अधिक आरोग्य कर्मचारी त्यात सहभागी झाले होते.

सर्जरीच्या ६ महिन्यांनंतर गुरुवारी डॉक्टरांनी सर्जरीच्या यशाची घोषण केली. आता डिमियो स्वत:च्या हाताने जेवण करू शकतो. तो जिममध्ये वजनही उचलत आहे. यापूर्वी चेहरा व हाताच्या प्रत्यारोपणाचे दोन प्रयत्न झाले होते, मात्र ते अपयशी ठरले. एका रुग्णाचा संसर्गाने मृत्यू झाला होता. दुसऱ्या प्रकरणात शरीराने नव्या हातांचा स्वीकार केला नव्हता. डेमियो आदर्श उमेदवार होता. कारण त्याला अपघातानंतरच्या पंगुत्वावर यशस्वीपणे मात करायची होती.

डॉक्टर म्हणाले, रुग्णाने बरे होण्याचा ठाम निर्धार केला होता, तोच आमची प्रेरणा ठरला
सर्जरी यशस्वी झाल्यानंतर डिमियो म्हणाला, मला आयुष्य जगण्याची दुसरी संधी मिळाली आहे. हा आशेचा संदेश आहे. अंधाररात्रीनंतर नेहमी उष:काल होतो. यामुळे कधीही आशा सोडू नये. डॉ. रॉड्रिग्ज म्हणाले, डिमियोने बरे होण्याचा निर्धार केला होता. तोच आमची प्रेरणा बनला व यशस्वी सर्जरीचा इतिहास घडला.

बातम्या आणखी आहेत...