आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

1000 वर्ष जुन्या दंतेश्वरी मंदिरातील परंपरा:येथे 3 नवरात्री उत्सव साजरे केले जातात, दसऱ्यात सहभागी होते देवी

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

देशातील 52 शक्तीपीठांपैकी एक दंतेवाडा, छत्तीसगड येथे दंतेश्वरी देवीचे मंदिर आहे. येथे देवी सतीचे दात पडले होते, म्हणूनच देवीचे नाव दंतेश्वरी पडले. त्यांच्या नावावरून दंतेवाडा हे नाव पडले आहे. सर्व शक्तीपीठांमध्ये हे एकमेव मंदिर आहे, जिथे दोन नव्हे तर तीन नवरात्र साजरी केली जातात. साधारणपणे चैत्र आणि शारदीय हे दोन नवरात्र सर्वत्र साजरे केले जातात, पण इथे फाल्गुन महिन्यातही नवरात्र साजरी केली जाते. त्याला फागुण मडई म्हणतात.

या मंदिराचे एक वैशिष्ट्य म्हणजे येथे दसऱ्याच्या दिवशी देवी बस्तर मंदिरातून दसऱ्यात सहभागी होण्यासाठी बाहेर पडते. बस्तर दसऱ्याला रावण दहन नव्हे तर रथाची नगरप्रदक्षिणा केली जाते. ज्यामध्ये देवीचे छत्र विराजमान केले जाते. दंतेश्वरी माता दसऱ्यात सहभागी होत नाही तोपर्यंत येथे दसरा साजरा होत नाही. महाअष्टमीच्या दिवशी माता दर्शनासाठी बाहेर पडते. बस्तरमध्ये दसरा उत्सवाचा विधी 75 दिवस चालतो. ही परंपरा सुमारे 610 वर्षे जुनी आहे.

बदलत्या काळानुसार बस्तरचे चित्र बदलत आहे. कधीकाळी नक्षलवादी दहशतीमुळे भाविक इथे जास्त संख्येने येत नव्हते, परंतु आता नवरात्रीच्या काळात लाखोंची गर्दी जमते. शंखनी-डंकणी नदीच्या काठावर 12व्या-13व्या शतकापासून स्थित हे मंदिर अनेक बाबतीत विशेष आहे.

तर, आज महाष्टमीनिमित्त महामाता दंतेश्वरीची कथा....

महाराष्ट्र आणि तेलंगणातील लोकांचीही श्रद्धा
अनादी काळापासून, बस्तरचे लोक देवी दंतेश्वरीची कुलदैवत म्हणून पूजा करतात. असे मानले जाते की, बस्तरमध्ये होणारे कोणतेही विधान देवीच्या परवानगीशिवाय केले जात नाही. याशिवाय तेलंगणातील काही जिल्हे आणि महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यातील लोकही देवी दंतेश्वरीला आपली कुळदेवी मानतात. तेथील लोकही असे सांगतात की, जेव्हा काकतीय राजवंश इथे येत होता तेव्हा आमच्यापैकी काही लोक तिथेच राहिले होते. त्यामुळे आम्हीही दंतेश्वरीलाही आपली इष्टदेवी मानतो.

देवी दंतेश्वरी मंदिराचे मुख्य पुजारी हरेंद्रनाथ जिया यांनी सांगितले की, पौराणिक मान्यतेनुसार, जेव्हा भगवान श्रीविष्णूने आपल्या चक्राने सतीच्या शरीराचे 52 भाग केले तेव्हा तिच्या शरीराचे 51 भाग देशाच्या विविध भागात पडले. 52 वे अंग, त्यांचा दात इथे पडला होता. त्यामुळे देवीचे नाव दंतेश्वरी पडले आणि ज्या गावात दात पडले त्या गावाचे नाव दंतेवाडा पडले. बदलत्या काळानुसार मंदिराचे चित्रही बदलत गेले. देवीच्या चमत्कारांमुळे लोकांच्या मनात श्रद्धा आणि विश्वास आणखी वाढला.

दसरा साजरा करण्यासाठी देवी जगदलपूरला जाते
दरवर्षी शारदीय नवरात्रीच्या पंचमीला, बस्तरच्या राजघराण्याचे सदस्य जगप्रसिद्ध बस्तर दसरा उत्सवात सहभागी होण्यासाठी आराध्य देवी दंतेश्वरीला आमंत्रित करण्यासाठी मंदिरात पोहोचतात. यावेळीही पंचमीच्या दिवशी राजघराण्याने देवीला निमंत्रण दिले आहे. ही प्रथा शतकानुशतके सुरू आहे. अष्टमीला माता आपल्या भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी मंदिरातून बाहेर पडेल. बस्तर दसऱ्याला मातेची छत्र आणि पालखी नेण्यात येणार आहे. यावेळी ठिकठिकाणी मातेची पालखी आणि छत्राचे स्वागत केले जाते.

वर्षातून तीनदा विशेष पूजा केली जाते
आराध्यादेवी दंतेश्वरीच्या मंदिरात वर्षातून तीनदा विशेष पूजा केली जाते. पहिली शारदीय नवरात्री, दुसरी चैत्र नवरात्री आणि तिसरी फाल्गुन नवरात्री. फाल्गुन मासातही 9 दिवस देवीची पूजा केली जाते. यामध्ये अनेक नियम आहेत. ही परंपराही अनेक वर्षांपासून सुरू आहे. याशिवाय मंदिरात श्रद्धेची ज्योतही प्रज्वलित केली जाते. दरवर्षी 7 हजारांहून अधिक तूप आणि तेलाचे दिवे प्रज्वलित केले जातात. परदेशातूनही भाविक 9 दिवस ज्योत प्रज्वलित करण्यासाठी देणगी देतात.

अशी आहे मंदिराची रचना
खरं तर, देवी दंतेश्वरी मंदिराचे गर्भगृह जेथे देवीची मूर्ती आहे, ते अनेक वर्षांपूर्वी ग्रॅनाइट दगडांनी बनवलेले आहे. असे म्हणतात की, सुरुवातीला जेव्हा येथे मंदिराची स्थापना झाली, त्यावेळी फक्त गर्भगृह होते. बाकीचे सर्व मंदिर उघडे होते. परंतु जसेजसे राजा बदलत गेले तसे त्यांनी आपल्या श्रद्धेनुसार मंदिराचे स्वरूपही बदलले. परंतु, गर्भगृहात कोणताही बदल करण्यात आला नाही. गर्भगृहाचा बाहेरील भाग मौल्यवान लाकूड सागवानापासून बनलेला आहे. हा भाग बस्तरची राणी प्रफुल्लकुमारी देवी यांनी बांधला होता.

भैरव बाबा हे देवीचे अंगरक्षक आहेत
गाभाऱ्याच्या बाहेर दोन मोठ्या मूर्तीही स्थापित केल्या आहेत. या चार हातांच्या मूर्ती भैरवबाबांच्या आहेत. असे म्हणतात की, भैरव बाबा हे देवी दंतेश्वरीचे अंगरक्षक आहेत. मंदिराचे मुख्य पुजारी हरेंद्र नाथ जिया यांचे पुतणे विजेंद्र जिया यांनी सांगितले की, ग्रंथातही सांगितले आहे की देवीचे दर्शन घेतल्यानंतर भैरवबाबांचे दर्शन घेणे आवश्यक आहे. जर भक्तांनी भैरवबाबांना प्रसन्न केले, तर ते त्यांची इच्छा देवीला सांगतात. यामुळे भक्तांच्या मनोकामना लवकर पूर्ण होतात असा विश्वास आहे.

गरुड स्तंभाची ही मान्यता आहे
अनेक शतकांपूर्वी येथे गंगवंशीय आणि नागवंशी राजांचा राजपाठ होता. त्यानंतर काकतीय घराणे येथे राजा झाले. सर्व राजांमध्ये काही देवीची पूजा करत तर काही शिवभक्त होते. काही जण भगवान श्रीविष्णूचे भक्तही होते. मंदिराच्या मुख्य दरवाजासमोर गरुड स्तंभाची स्थापना केलेली आहे. मान्यतेनुसार जो भक्त गरुड स्तंभाला पकडून आपल्या दोन्ही हाताची बोटे एकमेकांना स्पर्श करतो त्याच्या सर्व इच्छा लवकर पूर्ण होतात.

पुजारी विजेंद्र जिया यांनी सांगितले की, ग्रंथात याबद्दल कोणताही उल्लेख नाही. पण, पहिल्यांदाच कोणीतरी हे केले असेल आणि त्याची इच्छा पूर्ण झाली असेल, तेव्हापासून लोकांचा विश्वास आणखी वाढला आहे. आता जे काही भक्त येतात ते स्वतःच्या इच्छेने स्तंभ धरून नवस बोलतात. देवी नवस पूर्ण करते.

अशा प्रकारे मंदिरापर्यंत पोहोचता येते
दंतेवाडा जिल्हा छत्तीसगडच्या दक्षिण बस्तरमध्ये आहे. दंतेवाडा जिल्ह्याच्या मुख्यालयात देवीचे मंदिर आहे. एखाद्या भाविकाला रायपूरहून देवीच्या दरबारात यायचे असेल तर त्याला रस्त्याने सुमारे 400 किमी अंतर कापावे लागते. रायपूरनंतर धमतरी, कांकेर, कोंडागाव आणि शेवटचा बस्तर (जगदलपूर) जिल्ह्याची सीमा ओलांडून दंतेवाडा गाठता येते. याशिवाय हैदराबाद आणि रायपूर येथील भाविक विमानाने जगदलपूर आणि तेथून रस्त्याने दंतेवाडा येथे पोहोचू शकतात.

ओडिशा, तेलंगणा आणि महाराष्ट्रातील भाविकांसाठीही हा रस्ता सोपा आहे. ओडिशातील भाविक प्रथम जगदलपूर, तेलंगणातील सुकमा आणि महाराष्ट्रातील विजापूर जिल्ह्यातून दंतेवाडा येथे पोहोचू शकतात. हे तीन जिल्हे दंतेवाडाच्या शेजारचे जिल्हे आहेत.

पूर्वी लोक नक्षलवाद्यांमुळे यायला घाबरायचे
देवी दंतेश्वरी ही बस्तरची प्रमुख देवता आहे. पण, आता प्रत्येक जाती, पंथाचे लोक देवीवर विश्वास ठेवू लागले आहेत. काही वर्षांपूर्वीपर्यंत नक्षल दहशतीमुळे भाविक येथे येण्यास घाबरत होते. पण, मातेप्रती भक्तांची खरी भक्ती आणि श्रद्धेने भीतीवर मात केली. आता दरवर्षी नवरात्रीनिमित्त लाखो भाविक मातेच्या दर्शनासाठी येतात. यंदाही एकीकडे भाविक पायी येत आहेत, तर दुसरीकडे अनेक जण लोटांगण घालत आहेत. काहीजण मूल होण्यासाठी नवस घेऊन देवीच्या मंदिरात आले आहेत, तर काहींनी नोकरी मिळण्याचा नवस बोलला आहे.

बातम्या आणखी आहेत...