आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मानस वारी:अवघे गर्जे पंढरपूर। चालला नामाचा गजर।।

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • पंढरपूरचा पांडुरंग म्हणजे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आणि आषाढी वारी म्हणजे वारकऱ्यांचा वार्षिक उत्सव.

(प्रा. श्रीधर मारुती आवटे)

पंढरपूरचा पांडुरंग म्हणजे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आणि आषाढी वारी म्हणजे वारकऱ्यांचा वार्षिक उत्सव. त्यामुळे ज्येष्ठ महिना लागला की महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र प्रदेश, गुजरात आणि मध्य प्रदेशासह देशभरातील वारकऱ्यांना वेध लागतात, ते संतांच्या पालखी सोहळ्याचे, पायी दिंड्यांचे आणि विठुरायाच्या दर्शनाचे. आषाढी वारीएवढा स्वर्गीय आनंद इतरत्र कोठेच मिळत नाही. ‘जाता पंढरीसी सुख वाटे जीवा।’ अशी भावना वारकऱ्यांची असते. पण यंदा कोरोना महामारीमुळे वारकऱ्यांना ‘घरी बसूनच वारी’ किंवा ‘मानस वारी’ करावी लागत आहे. अत्यंत जड अंत:करणाने त्यांनी तो निर्णय स्वीकारला आहे आणि ‘ठायीच बैसोनि करा एकचित्त।आवडी अनंत आळवावा ।।’ या श्री संत तुकाराम महाराज यांच्या अभंगात वर्णन केल्यानुसार मानस वारी सुरूही केली आहे. चला तर मग, आपणही तीत सहभागी झालो आहोत, अशी कल्पना करू आणि वारीचा आनंद घेऊ...

सात मानाच्या संतांच्या पालख्यांची सुरुवात झाली आहे, ती देहूतून जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याने. या सोहळ्यात लाखांच्या संख्येत वारकऱ्यांनी ‘ज्ञानोबा माउली तुकाराम,’ ‘राम कृष्ण हरी,’ आणि ‘ जय जय विठोबा रखुमाई,’ असा गजर करत पंढरपूरकडे वाटचाल सुरू केली आहे. त्याच्या दुसऱ्याच दिवशी ज्ञानेश्वर माउलींच्या पालखी सोहळ्याने आळंदी येथून प्रस्थान केले आहे. 

असंख्य दिंड्या व लाखो वारकरी त्यात सहभागी झाले आहेत आणि या वैष्णवांच्या मेळ्याने विठुरायाच्या भेटीच्या ओढीने पंढरीसाठी प्रस्थान ठेवले आहे. या दोन्ही पालखी सोहळ्यांचा संगम झालाय तो पुण्यातील हडपसरमध्ये. पुण्यात दोन्ही पालख्या दोन दिवस मुक्कामाला आहेत. त्यानंतर दोन्ही पालख्यांचा मार्ग वेगळा झालाय आणि माउलींची पालखी दिवे घाटात आली आहे. आता दिवे घाटात पांडुरंगाची भव्य मूर्ती साकारली आहे. तेथे आपण पोहोचलो आहोत. संपूर्ण दिवे घाटावर त्या सावळ्या विठ्ठलाची कृपादृष्टी आहे, असेच जणू काही वाटते आहे. पण यंदा या वैभवाला आपण मुकलो आहोत, याची खंत आहे. अवघड वळणे पार करत सोहळा सासवड मुक्कामी पोहोचला आहे. फलटण, वेळापूरमार्गे माउली आषाढ शुद्ध दशमीला पंढरपुरात पोहोचली आहे आणि अक्षरश: लाखोंच्या संख्येने पंढरीत दाखल झालेल्या वारकऱ्यांची सातही संतांच्या पादुकांच्या दर्शनासाठी झुंबड उडाली आहे.

अखेर आषाढ शुद्ध एकादशीचा पवित्र दिवस उजाडला आहे. ठिकठिकाणी मुक्कामाला असलेले आबालवृद्ध वारकरी चंद्रभागेत स्नान करण्यासाठी गर्दी करत आहेत. चला, आपणही चंद्रभागेत स्नान करू आणि ज्याच्यासाठी हे परब्रह्म या क्षेत्रात उभे ठाकले आहे त्या पुंडलिकाचे दर्शन घेऊ. आता भल्यामोठ्या रांगेत उभे राहून अखेर २४ ते ४८ तासांनी महाद्वारापर्यंत पोहोचून संत चोखामेळा यांच्या चरणावर डोके ठेवू. पुढे आहे संत शिरोमणी श्री नामदेव महाराजांची पायरी. ‘पाषाण करी परी पायरीच्या मिसे। तुझे द्वारी वसे एेसे करी।।’ ही नामदेवांनी केलेली प्रार्थना आठवत दर्शन घेऊ आणि अखेर ज्यासाठी हा अट्टहास केला, त्या पांडुरंगाचे दर्शन घेऊ. माउलींचा, ‘रूप पाहता लोचनि । सुख जालंे वो साजणी।। तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा।। हा आणि संत तुकाराम महाराजांचा, ‘सुंदर तें ध्यान उभे विटेवरी। कर कटावरी ठेवोनियां।।’’ हा अभंग आठवू. या परब्रह्माचे दर्शन घेताना,‘अवघ्या मानवजातीवर आलेले कोरोनाचे हे संकट त्वरित दूर कर रे, पांडुरंगा, मायबापा...,’ अशी आळवणी करू. आषाढी वारीसाठी आलेले तमाम वारकरी, भजनी मंडळी, कीर्तनकार-प्रवचनकार यांना शुभेच्छा देऊन, त्यांच्याही पायावर डोके ठेवून ‘राम कृष्ण हरी’ हा मंत्र आळवू. आणखी एक काम करू. कोरोनासोबतच ‘दुष्काळात तेरावा महिना’ या उक्तीप्रमाणे राज्यात धडकलेल्या ‘निसर्ग’ चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या सर्वसामान्यांना मदत करण्याचा निर्धार करू. दुसरीकडे, चीनच्या आततायीपणामुळे हुतात्मा झालेल्या २० शहिदांना श्रद्धांजली वाहू आणि त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करू. जो कोणी भारताकडे वाकड्या नजरेने पाहील, त्याला नेस्तनाबूत करण्याची ताकद आपले सरकार आणि सैनिकांना दे, अशी विठ्ठलचरणी प्रार्थना करू. आषाढीचे वारकरी हे प्रामुख्याने शेतकरी आहेत. हा बळीराजा सुखी तर जग सुखी. चांगला पाऊस पाडून त्याला आणि पर्यायाने संपूर्ण मानवमात्रालाच सुखी कर, अशीही आळवणी करू. आणि या पवित्र वारीचे दर्शन घडवताना संत तुकाराम महाराजांच्या शिष्या संत बहिणाबाई यांचा हा अभंग आठवू-

संतकृपा झाली। इमारत फळा आली।।१।।

ज्ञानदेवें घातला पाया । उभारिलें देवालया।।२।।

नामा तयाचा किंकर। तेणे केला हा विस्तार।।३।।

जनार्दन एकनाथ। खांब दिधला भागवत।।४।।

तुका झालासे कळस। भजन करा सावकाश।।५।। 

बहिणी म्हणे फडकते ध्वजा। निरूपण केले ओजा।।६।।

(प्रा. श्रीधर मारुती आवटे)

केत्तूर २ (ता. करमाळा, जि. सोलापूर)

संपर्क : ९४२०३५६४५०

बातम्या आणखी आहेत...