आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

श्रावण:शिवशंकराला अत्यंत प्रिय असलेल्या बेलपत्राची महती आणि त्याचे लाभ

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रावण महिन्यातील शिवपूजन अत्यंत शुभ मानले जाते. यामध्ये तीन पाने असलेले बेलपत्र महादेवाला वाहणे म्हणजे आपल्यातील तिन्ही गुण त्याला वाहणे, अशी मान्यता आहे. महादेव शिवशंकराला बेल अत्यंत प्रिय आहे.

बेलपत्राच्या उत्पत्तीची एक कथा स्कंद पुराणात आढळून येते. एका पौराणिक कथेनुसार, एकदा पार्वती देवीच्या घामाचे काही थेंब पृथ्वीवर पडले आणि त्यातून बेलाच्या झाडाची निर्मिती झाली. बेलवृक्षाच्या मुळाशी गिरिजा देवी, खोडात महेश्वर देवी, फांद्यांमध्ये दाक्षायणी देवी, पानांमध्ये पार्वती देवी, फुलांमध्ये गौरी देवी आणि फळांमध्ये कात्यायनी देवीचा वास असतो, अशी मान्यता आहे. तसेच यामध्ये महालक्ष्मी देवीचा वास असतो, असेही सांगितले जाते. शिव-पार्वती पूजनात अर्पण केलेल्या बेलाच्या पानामुळे दोन्ही देवतांचे शुभाशीर्वाद लाभतात, अशी मान्यता आहे.

श्रावणात शिवपूजनासह दररोज बेलाचे पान वाहण्याला विशेष महत्त्व असल्याचे शिवपुराण सांगते. मात्र, बेलपत्राची महती देवापुरती सीमित नसून त्याला वैद्यकीय महत्त्वसुद्धा असल्याचे आयुर्वेदाने अधोरेखित केले आहे. ​

तापावर गुणकारी : ताप आला असल्यास बेलपत्रांचा काढा गुणकारी ठरतो, असे सांगितले जाते.

मधमाशी आणि अन्य काही कीटक चावल्यास बेलपत्राचा रस जखमेवर लावल्यास आराम पडतो. बदलत्या जीवनशैलीत अनेकांना रक्ताच्या कमतरतेची लक्षणे दिसून येतात. वाळलेल्या बेलाच्या गराची पावडर तयार करून गरम दुधात खडीसाखरेसोबत रोज एक चमचा घेतल्यास शरीरात नवीन रक्त तयार होण्यास सुरुवात होते. ​

हृदयरोगावर गुणकारी : बेलामध्ये प्रथिने, बीटा कॅरोटीन, थियामीन, कॅल्शियम, लोह अ, ब, क ही जीवनसत्त्वे आणि भरपूर प्रमाणात ऑरगॅनिक कम्पाऊंड्स आणि अँटी ऑक्सिडंट्स आहेत. हृदयरोगावर बेलपत्र औषधी मानले जाते. बेलपत्राचा काढा प्यायल्याने रक्ताभिसरण उत्तम होते. नवीन रक्त तयार होण्यास मदत होते. त्यामुळे हृदयरोगाचा धोका कमी होतो. तसेच श्वासोच्छ्वासाची प्रक्रियाही सुधारते, असे सांगितले जाते. याशिवाय उष्णतेवरही बेलपत्र गुणकारी मानले गेले आहे. उष्णतेमुळे तोंड आले असल्यास बेलाची ताजी पाने खावीत, असे सांगितले जाते.

​बद्धकोष्ठ : बद्धकोष्ठतेवर बेलपत्र गुणकारी असते, असे सांगितले जाते. बद्धकोष्ठाचा त्रास असलेल्या व्यक्तींनी बेलाच्या पानाचे चूर्ण तयार करून सकाळी आणि सायंकाळी साध्या पाण्यातून वैद्यकीय सल्ल्यानुसार घ्यावे. एक आठवड्यानंतर याचा गुण दिसण्यास सुरुवात होते, असे सांगितले जाते.

दीपक महाराज आजुबाई संस्थान, अन्वा