आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सकारात्मक:सेवेत शुद्ध भावना असेल तरच तिचे फळ मिळेल

7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सेवा हे सर्वांना जोडणारे एकमेव माध्यम आहे. आपला सेवाभाव, आपले ऐक्य आणि पावित्र्याची शक्तीच या पृथ्वीवर सत्ययुगीन सृष्टी निर्माण करेल. गेल्या पाच-सहा महिन्यांत सर्वांनी अनुभवलेली एक गोष्ट म्हणजे आपण आपल्या घरातली सर्व कामे करत आहोत, त्यासाठी त्यापूर्वी आपल्याकडे मदतनीस असायचे. कुणी सुटी घेतली किंवा उशिरा आले तर आपल्याला किती राग येत असे! आता पाहा, आपण सर्व कामे करत आहोत. काही दिवसांनी सगळे सामान्य होईल, तेव्हा आपल्याला आपले नॉर्मल बदलावे लागेल. एखाद्या दिवशी कोणी कामावर आले नाही किंवा उशिरा आले, तर आपण त्यांच्याशी प्रेमळपणे बोलावे, कारण ते आपल्या कामाला हातभार लावत आहेत. आपण त्यांच्याशी आपुलकीने बोलून, पगारासह सदिच्छा व्यक्त करुन आदराने वागावे. आपण त्यांच्याबद्दल विचार केला, तर त्यांचेही वर्तन बदलेल.

कुणी सुटी घेतली तर त्याचा पगार आपण कापत असू. आज आपण त्यांना सांगत आहोत : तुम्ही घरीच राहा, काळजी घ्या, तुम्हाला पगार मिळेल. आज याला समाज न्यू नॉर्मल म्हणतोय. खरं म्हणजे हेच नॉर्मल आहे. स्वभाव, संस्कार, बोलण्याची पद्धत, इतरांची काळजी घेण्याची पद्धत, आपल्याआधी इतरांचा विचार करण्याची पद्धत, या सामान्य गोष्टी आहेत व त्यालाच आध्यात्मिक शक्ती म्हणतात. आता त्यात एक छोटी गोष्ट जोडायची आहे. आपण सर्व घरातील-बाहेरची सर्व कामे करत आहोत आणि इतरांसाठीही करत आहोत. आपल्याला त्यावर लक्ष केंद्रित करायचे नसून कोणत्या मन:स्थिती आपण ते करतो, याकडे लक्ष द्यायचे आहे. आपली मानसिक स्थिती चांगली झाली, तरच आपल्यामध्ये आध्यात्मिक शक्ती वाढेल.

हे कसले संकट आलेय, कोरोना कधी जाईल, ही देवाची अवकृपा आहे.. अशा विचारातून आपण दु:खीपणे आणि सक्तीने काम करत असू तर ती सेवा होणार नाही आणि आपली आत्मिक शक्तीदेखील वाढणार नाही. आत्मिक शक्ती वाढवण्यासाठी आपला प्रत्येक विचार, भाव व आपल्यातील भावना योग्य असणे आवश्यक आहे. तुम्ही कितीही सेवा करत असाल तरी जमा खाते तयार झाले आहे की नाही, याची लक्षणे म्हणजे ‘निमित्त भाव, निर्माण भाव आणि निर्मळ वाणी’, हे भगवंताचे महावाक्य आहे. आत्मिक शक्ती वाढवण्यासाठी हे तिन्ही हवे. ईश्वर म्हणतो, या तिन्हीपैकी एक कमी असेल, तर आपण कितीही सेवा केली तरी जमा खाते तयार होणार नाही, म्हणजे आत्म्याची शक्ती वाढणार नाही. मग देव म्हणतो, सेवेत अहंकार आला तर त्यामुळेही जमेचे खाते तयार होत नाही.

मी काही काम करण्याचे साधन बनलो, तर निर्माण भाव आपोआप येतो. निर्माण भाव येईल तेव्हा निर्मळ वाणी येईल. त्यामुळे आपले शब्द मधुर होतील. देवाचे एक महावाक्य आहे, कितीही परिश्रम करा, रात्रंदिवस धावत राहा, डोके चालवा, परंतु आपल्याकडे निमित्त भाव, निर्माण भाव आणि निर्मळ वाणी नसेल तर संचित तयार होणार नाही. म्हणजे आपण कठोर परिश्रम केले तर त्याचे बळ मिळेल, परंतु जर चिडचीड केली, एखाद्यावर रागावलो तर आत्म्याची केवळ पाच टक्के शक्ती वाढेल. निमित्त भाव असेल, नम्रता असेल, निर्मळ वाणी असेल तर तेथे संपूर्ण संचित जमा होईल. कारण आपल्या प्रत्येक कृतीतून आत्मिक शक्ती वाढते. हे खूप महत्त्वाचे आहे. आम्ही सेवा देत आहोत, काही महिने नव्हे, तर आजीवन सेवा करू. निमित्त भाव, निर्माण भाव आणि निर्मळ वाणीने केलेले प्रत्येक काम सेवा असते. एक म्हणजे, कल्याणकारी भावनेने सेवा करणे आणि दुसरे म्हणजे, स्वार्थाने सेवा करणे. ‘स्व’च्या अर्थाने म्हणजे मला काही तरी मिळावे, या इच्छेने. आता ऊर्जा एका दिशेने वाहू शकते - देण्याची ऊर्जा किंवा घेण्याची. यात घेण्याची ऊर्जा आली आहे. तर तो ‘स्व’ अर्थ झाला. म्हणूनच त्याला स्वार्थ म्हणतात. सेवा निःस्वार्थ असावी. म्हणजे ज्यात ‘स्व’चा काही अर्थ नसतो. तेव्हा त्या सेवेची ऊर्जा, शक्ती केवळ देण्याच्या दिशेने वाहू लागेल. मग आपल्या आत्म्याची शक्ती वाढेल व पुण्याच्या खात्यात जमा होईल.

शिवानी दीदी
ब्रह्मकुमारी

बातम्या आणखी आहेत...