आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दीपोत्सव:आरोग्याशी संबंधित आहे नरक चतुर्दशी, बदलत्या ऋतूशी संबंधित आहे अभ्यंग स्नान करण्याची परंपरा

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

दिवाळीपूर्वी अश्विन कृष्ण चतुर्दशीला नरक चतुर्दशी साजरी केली जाते. समाजातील अहंकारी, अत्याचारी वाईट प्रवृत्तीचा नाश व्हावा, यासाठी नरक चतुर्दशी साजरी करण्यात येते. या दिवशी घर परिसराची सफाई व सूर्योदयापूर्वी अंगाला उटणे आणि तेल लावून स्नान केले जाते. यंदा 4 नोव्हेंबरला गुरुवारी नरक चतुर्दशी साजरी केली जात आहे.

पौराणिक कथेनुसार प्राचीन काळी नरकासूरनावाचा एक राजा होऊन गेला. महाभारताच्या कालखंडातील या राजाने सोळा हजार १०८ स्त्रियांना आपल्या बंदिखान्यात डांबून ठेवले होते. हा नरकासूर प्रजेचाही खूप छळ करत असे, असे सांगतात. भगवान श्रीकृष्णांनी या नरकासुराचा वध केला तो दिवस होता अश्विन कृष्ण चतुर्दशीचा. नरकासुराचा वध करून सर्व स्रियांची भगवंताने मुक्तता केली. नरकासुराने भगवंताकडे शेवटी एक वर मागितला की, आजच्या तिथीला पहाटे चंद्रोदयाचे वेळी जो मंगलस्नान करेल, त्याला नरकाची पीडा होऊ नये म्हणून नरक चतुर्दशीला पहाटे चंद्रोदयाच्या सुमारास अभ्यंगस्नान करणे महत्त्वाचे मानले जाते.

शरद ऋतूचा शेवट आणि हेमंत ऋतूचे आगमन अशा संधिकालावर दिवाळीचा सण साजरा करताना पुढे येणाऱ्या थंडीच्या काळासाठी तेल लावून स्नान करण्याची सुरुवात नरक चतुर्दशीच्या अभ्यंगस्नानापासून होते. अकाली मृत्यू येऊ नये म्हणून नरक चतुर्दशीच्या दिवशी यमतर्पण करायला धर्मशास्त्राने सांगितले आहे. अकाली, अपघाती मृत्यू येऊ नये म्हणून यमाला १४ नावांनी तर्पण करून त्याची प्रार्थना करायला सांगितले आहे. पू्र्वीपेक्षा सध्याच्या काळात वेगाने चालवल्या जाणाऱ्या वाहनांमुळे अकाली मृत्यूचा संभव वाढत असल्याने या दिवशी यमतर्पण करून अपमृत्यू निवारणासाठी यमाची प्रार्थना करायची असते.

बातम्या आणखी आहेत...