आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनंत ऊर्जा:मन जिंकल्यास सर्व काही जिंकाल, माणूस मनातून हरल्यावरच वास्तवात हरतो

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

१९९१ मध्ये आखाती युद्ध सुरू होते त्या वेळी ३५ देशांनी मिळून इराकविरुद्ध युद्ध पुकारले होते, तेव्हाची गोष्ट. या लढाईत ब्रिटिश रॉयल एअर फोर्सचे पायलट जॉन पीटर्स ‘टोर्नेडो’ नावाच्या लढाऊ विमानाने इराकवर बॉम्बवर्षाव करण्यासाठी निघाले होते. त्यांच्यासोबत जॉन निकोल हे नेव्हिगेटरही होते. विमानातील तांत्रिक बिघाडामुळे ते बॉम्बवर्षाव करू शकले नाहीत. या अयशस्वी प्रयत्नानंतर परत जाताना इराकी क्षेपणास्त्राने टोर्नेडो पाडले. टोर्नेडो हवेत गिरक्या घेत जमिनीच्या दिशेने येत असताना दोन्ही जॉननी विमानातून उडी मारली. पॅराशूटच्या मदतीने ते इराकच्या युद्ध क्षेत्रात उतरले.

पण खरी कसोटी आता सुरू झाली. समोर बघितले तर २५ हून अधिक इराकी सैनिक मशीनगन रोखून उभे होते. दोघेही युद्धकैदी म्हणून पकडले गेले. मग विचारपूस सुरू झाली. डोळ्यांवर पट्टी बांधून दोघांनाही अत्याचारासाठी नेण्यात आले. त्यांच्याकडून माहिती मिळवण्याचे खूप प्रयत्न करण्यात आले. त्यांना सर्व प्रकारच्या मानसिक आणि शारीरिक छळाला सामोरे जावे लागले. कित्येकदा ते बेशुद्ध पडायचे, मग इंजेक्शनने त्यांना शुद्धीवर आणून पुन्हा अत्याचार केले जायचे. त्यांच्यावर सलग ४७ दिवस अत्याचार करण्यात आले, पण इराकी त्यांच्या तोंडून एक शब्दही वदवूू शकले नाहीत. शेवटी युद्ध संपले. युद्धकैद्यांचीही सुटका झाली. आपल्या देशात परतल्यानंतर दोघांनी मिळून ‘टोर्नेडो डाऊन’ हे पुस्तक लिहिले. यातनांचे वर्णन करताना जॉन पीटर्सने अनुभव लिहिले, ‘मी अलिप्त झालो. म्हणजे ते आमच्यावर अत्याचार करायचे तेव्हा मी विचार करत असे की, हे लोक माझ्या शरीराला दुखावत आहेत, पण मी या शरीरापासून वेगळा आहे. मन दुःखाचा मोठा भाग दाबू शकते… माझे मन या शरीरापासून वेगळे होऊन एका गुहेत पोहोचले होते. अशा अवस्थेत मन अधिकाधिक वेदनांपासून अलिप्त राहू शकते. शरीराला त्रास होतोय, पण मी या शरीरापासून वेगळा आहे. अशा प्रकारे मी वेदनांचे दोन भाग केले होते.’

जॉन पीटर्सचा हा अनुभव विचारांच्या आश्चर्यकारक शक्तीचा थेट पुरावा आहे. अनेक अत्याचार आणि आपत्ती ओढवत असताना ते केवळ विचारांच्या बळावर दुःख आणि वेदनांपासून दूर राहू शकले. दुसरीकडे, सर्व प्रकारच्या सुखसोयी असूनही सतत रडणारे लोकही आहेत. असे का? तर कमकुवत आणि नकारात्मक विचारांमुळे. एखाद्याने कितीही भौतिक संपत्ती गोळा केली तरी त्याच्याकडे वैचारिक संपत्ती नसेल तर या सर्व संपत्तीचा काही उपयोग नाही. बाह्य संपत्ती नव्हे, तर वैचारिक समृद्धी हाच माणसाच्या यशाचा निकष आहे.

एकदा एक फुगेवाला फुगे विकत होता. रंगीबेरंगी फुग्यांकडे लोकांचे लक्ष वेधण्यासाठी तो अधूनमधून एक-दोन फुगे हवेत सोडायचा, जेणेकरून मुले आकर्षित व्हावीत. एक छोटा काळा मुलगा फुगेवाल्याजवळ उभा राहून सर्व पाहत होता. काळ्या रंगामुळे त्या मुलाला अनेक वेळा तिरस्काराला सामोरे जावे लागत असे. मुलाने फुगेवाल्याला विचारले, ‘तुम्ही काळ्या रंगाचा फुगा सोडला तरीही तो आकाशात जाईल?’ फुगेवाला विचारात पडला. त्याची नजर मुलाकडे गेली. त्याला पाहताच त्याच्या मनात जणू वीज चमकली. त्याने मुलाला प्रेमाने उत्तर दिले, ‘बेटा, फुगा त्याच्या रंगामुळे नव्हे, तर त्याच्या आतल्या हेलियम वायूमुळे आकाशात वर जातो.’ म्हणजेच आपण आपला बाह्य देखावा किंवा बाह्य मालमत्तेमुळे नव्हे, तर मनातील विचारांच्या आधारे प्रगती करतो.

जीवनात विजय आणि पराभव हे बाहेरून ठरवले जात नाहीत, तर व्यक्तीची मानसिकता आणि त्याच्या विचारांच्या आधारे ते ठरवले जातात. एखादा माणूस मनातून हरल्यावरच वास्तवात हरतो.

प्रमुख स्वामी महाराजांच्या जीवनातही अनेक संकटे आली. दिल्लीतील अक्षरधाम मंदिरासाठी जमीन मिळवण्यासााठी त्यांना ३२ वर्षे लागली, पण त्यांनी कधीही हार मानली नाही. त्यांच्या मनात सकारात्मक विचारांची ऊर्जा सतत प्रज्वलित राहिली. त्यांनी न थकता, हार न मानता प्रयत्न सुरू ठेवले. परिणामी, भारतीय संस्कृतीवर प्रकाश टाकणारे भव्य अक्षरधाम मंदिर आज दिल्लीत उभे आहे. त्यामुळेच जीवनात चांगले आणि सकारात्मक विचार असणे अत्यंत आवश्यक आहे. चला तर मग, आपण आपल्या आजूबाजूला असे वातावरण निर्माण करूया, जेणेकरून आपण सर्व चांगल्या विचारांनी सतत चिंब होत राहू.

  • एखाद्याने कितीही भौतिक संपत्ती गोळा केली तरी त्याच्याकडे वैचारिक संपत्ती नसेल तर या सर्व संपत्तीचा काही उपयोग नाही.
  • जीवनात विजय आणि पराभव हे बाहेरून ठरवले जात नाहीत, तर व्यक्तीची मानसिकता व त्याच्या विचारांच्या आधारे ते ठरतात. एखादा माणूस मनातून हरल्यावरच वास्तवात हरतो.

डाॅ. ज्ञानवत्सल स्वामी

बातम्या आणखी आहेत...