आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आध्यात्मिक:‘जगा आणि जगू द्या’ या 80/20 सूत्राने मिळवा आनंद

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • जीवनात 20 गोष्टी आपल्या मर्जीने व पद्धतीने करा आणि जगाला हव्या तशा 80 गोष्टी करा...

समजा मला आयुष्यात काही तरी करण्याची इच्छा आहे, परंतु कोणी तरी मला काही कारणास्तव तसे करू देत नाही. मी तसे केल्यास माझे कौटुंबिक जीवन उद्ध्वस्त होते. मी हे कुटुंबामुळे तसे केले नाही तर मी दु:खी राहीन आणि मला तसे करू न देणाऱ्या व्यक्तीचा राग येईल. अशा परिस्थितीत आपण काय कराल? तुम्हाला भगवान महावीरांचा संदेश माहीत आहे : जगा आणि जगू द्या. करुणेची मूर्ती असलेल्या स्वत: भगवान महावीर स्वामींनी म्हटले की, आधी तुम्ही जगा, मग इतरांना कसे जगू द्यायचे हे तुम्हाला समजेल. त्यांनी हाच क्रम सांगितला. जगू द्या आणि जगा, असे ते म्हणाले नाहीत. ते म्हणाले, ‘तुम्हाला स्वतःला जगता येत नसेल तर तुम्ही इतरांना कसे जगू द्याल?’

येथे मी हे सांगू इच्छितो की, एकीकडे आपण पूर्णपणे त्यागाचे जीवन जगू शकत नाही. दुसरीकडे आपण पूर्णपणे स्वार्थी जीवनही जगू शकत नाही. पॅरोटोचा ८०-२० चा नियम व्यवस्थापनात शिकवला जातो. जीवनातदेखील एक ८०-२० नियम आहे. आपण आयुष्यात ज्या शंभर गोष्टी करतो त्यापैकी ८० गोष्टी जगाच्या सुखासाठी करा. आपल्या आनंदासाठी आयुष्यात २० गोष्टी करा. अन्यथा तुम्ही स्वत:चा आदर करू शकणार नाही. आपण आपल्या इच्छेनुसार जीवनात २० गोष्टी केल्या पाहिजेत आणि जगाच्या तुमच्याकडून ज्या अपेक्षा आहेत त्या ८० गोष्टी जीवनात केल्या पाहिजेत. हे अगदी छोट्या-छोट्या उदाहरणांनी समजून घेऊया.

उदा. आई-वडिलांनी फोन केली की, ‘या कार्यक्रमाला ये.’ तुम्ही म्हणाल, ‘का? तिथे कोण असेल?’ परंतु तुम्ही पालकांच्या इच्छेखातर तेथे जाता, अनेकांना भेटता. यापैकी कोणीही तुम्हाला लक्षात ठेवणार नाही, हे माहीत असूनही हसत अभिवादन करता. असे जरूर करा. आई-वडिलांनी तुमच्यासाठी बरेच काही केले आहे व ते फक्त एवढेच म्हणताहेत की, जाऊन हसतमुखाने प्रत्येकाला भेटून ये. त्यांना तुमच्याबद्दल अभिमान वाटतो म्हणून ते तुम्हाला घेऊन जातात. त्यांना हा अभिमान वाटू द्या. तसेही घरी राहून तुम्ही काय केले असते? फेसबुकवर काही निरुपयोगी पोस्ट केल्या असत्या आणि त्याला २३३ लाइक्स मिळाल्या असत्या. त्याऐवजी आपल्या आई-वडिलांना आवडते ते करा. आयुष्यभर नव्हे, फक्त तीन तासांचा तर प्रश्न आहे. तुमचे आई-वडील म्हणत असतील की, डॉक्टर हो आणि तुम्हाला आर्किटेक्ट व्हायचे असेल, तर मी ते स्वीकारण्यास सांगणार नाही. मला वाटते, तुम्ही आई-वडिलांना हे पटवून द्यायला हवे की, ‘नाही, मला आर्किटेक्चरचा अभ्यास करायचा आहे आणि तुम्हाला वाटते म्हणून मी आजीवन डॉक्टर होऊ शकत नाही.’ तुम्हाला हे आदरपूर्वक करावे लागेल. कारण हा जीवनभराचा त्याग आहे आणि तो तुम्ही करू नये, परंतु एखादी संध्याकाळ त्यांच्यासाठी देऊ शकता. त्याचप्रमाणे समजा एखादा नातेवाईक तुमच्या घरी येणार असेल आणि आई सलवार-कुर्ता घालायला सांगते. तर तुम्ही म्हणाल, “का, जीन्स घालणे काय वाईट आहे?” परंतु, आई जीन्स वाईट आहे, असे म्हणतच नाही, कारण ती तुम्हाला दररोज जीन्समध्ये पाहते आणि तुम्ही तिला असेच आवडता. जुन्या विचारसरणीच्या नातेवाइकाकडून तिला काही ऐकावे सागू नये म्हणून ती तुम्हाला सलवार घालायला सांगत आहे. म्हणून एक तासासाठी तिचे ऐकून तिला खुश करू शकता. पण ती जर तुम्हाला अशिक्षित मुलाशी लग्न करण्यास सांगत असेल तर नकार द्या, तिला समजावून सांगा, असे मी म्हणेन.

इतरांच्या आनंदासाठी काही तरी करण्यामध्ये काहीच वाईट नाही. एक ते १०० पर्यंत अंक लिहा. आयुष्यासाठी खूप महत्त्वाच्या असलेल्या, आयुष्यावर परिणाम करणाऱ्या २० गोष्टी तुम्ही स्वत:साठी करायलाच हव्यात. हेच ‘जगणे’ आहे. तुमच्यासाठी महत्त्वाच्या नसलेल्या, आपल्या जीवनावर परिणाम न करणाऱ्या ८० गोष्टी इतरांच्या आनंदासाठी करा. हेच ‘जगू देणे’ आहे. मग आयुष्यात तुम्हाला संतुलन प्राप्त होईल. जगा आणि जगू द्या हा तुमच्या जीवनाचा एक भाग होईल.

महात्रया रा
आध्यात्मिक गुरू

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser