आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आषाढी एकादशी:जाणून घ्या, एकादशी प्रथेला कशी झाली सुरुवात...या व्रतामुळे पूर्ण होऊ शकते आत्मिक शांती आणि मोक्ष प्राप्तीची इच्छा

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • या एकादशीला महाएकादशी म्हणतात

प्रत्येक महिन्यात शुक्ल पक्षात एक व कृष्ण पक्षात एक याप्रमाणे संपूर्ण वर्षामध्ये एकूण चोवीस एकादशी येतात. अधिक मास असल्यास त्या दोन एकादशी जास्त असतात. पण त्यापैकी आषाढी व कार्तिकी एकादशी व त्यापेक्षा आषाढी एकादशीचे महत्व अधिक मानण्यात येते. या वर्षी 1 जुलै, बुधवारी  आषाढी एकादशी आहे. आषाढी एकादशीच्या दिवशी पांडुरंगाचे नामस्मरण करून आत्मिक शांती आणि मोक्ष प्राप्तीची इच्छा पूर्ण केली जाऊ शकते.

आषाढ महिन्यातील एकादशीला फार पवित्र मानण्यात येते. म्हणून या एकादशीला महाएकादशी म्हणतात. या महिन्यातील अत्यंत आनंदाचा हा दिवस असतो. पांडुरंगाच्या भेटीसाठी कोसच्याकोस पावसा-पाण्यात भिजत-चिंबत जाणार्या वारकरी भक्तांचा दिंडीचा सोहळा अत्यंत मनोरम असा असतो. एक एकादशीस आळंदीहून ज्ञानेश्वरांची, देहूहून तुकारामाची, त्र्यंबकेश्वरहून निवृत्तीनाथाची, सासवडहून सोपानदेवाची, पैठणहून एकनाथांची व उत्तर भारतातून कबीराची पालखी निघते. महाराष्ट्रातून तीन लाखांपेक्षा अधिक वारकर्यांची "चंद्रभागे"च्या काठी जत्रा भरते. सर्व जाती-जमातींना भक्तिप्रेमाच्या जोरावर परमेश्वराचा मार्ग मोकळा करून देणारा व परमार्थाच्या प्रांतात लोकशाहीचे रूप विकसित करून देणारा वारकरी संप्रदाय म्हणजे विकसित वैष्णवधर्मच होय.

एकादशी संदर्भातील कथा

मृदुमान्य नावाच्या राक्षसाने भगवान शंकराकडे जाऊन त्यांची मोठ्या भक्तिभावाने व तल्लीन होऊन आराधना केली. श्री शंकराने प्रसन्न होऊन, तू कोणाकडूनही मरणार नाहीस, पण एका स्त्रीच्या हातून तू मरशील, असा वर दिला. असा वर मिळताच मृदुमान्य राक्षस अधिकच उन्मत झाला व त्याने सर्व देवांवर स्वारी करून देवांचा पराभव केला. तेंव्हा सर्व देव शंकराकडे आले, पण शंकरांनी त्याला वर दिल्यामुळे त्यांना त्याच्याविरुध्द काही करता येत नव्हते. मग सर्व देव शंकरासह एका गुहेत जाऊन लपून बसले. तिथे त्या सर्वांच्या श्वासातून एक देवता निर्माण झाली. तिचे नाव एकादशी. तिने त्या दिवशी मृदुमान्य राक्षसाला ठार करून सर्व देवांची मुक्तता केली. त्या दिवशी पाऊस पडत होता. त्यामुळे सर्व देवांना स्नान घडले. तसेच सर्वजन गुहेत लपून बसल्यामुळे त्यांना उपवासही घडला. त्या दिवसापासून एकादशीचे व्रत म्हणून उपवास करण्याचा प्रघात पडला.

बातम्या आणखी आहेत...