आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा१) गणेशाची प्रथम पूजा का केली जाते?
कारण त्याला शिवाचे वरदान, तो जलतत्त्वाचा स्वामी व सर्व देवांचा त्याच्यात वास आहे.
शिव महापुराणात असा उल्लेख आहे की, माता पार्वतीचा द्वारपाल गणेशाचे शिर शिवाने कापले आणि नंतर त्याच्या धडावर हत्तीचे डोके जोडले. पार्वतीने या रूपात या पुत्राची पूजा कोण करणार, असा प्रश्न विचारला तेव्हा शिवाने वरदान दिले की सर्व देवी-देवतांमध्ये गणेशाची प्रथम पूजा केली जाईल. गीता प्रेसच्या गणेश अंकात, महामंडलेश्वर अनंत श्री स्वामींनी लिहिले आहे की, जलतत्त्वाचा स्वामी असल्यामुळे गणेशाची प्रथम पूजा केली जाते, कारण सर्वप्रथम विश्वात सर्वत्र पाणीच होते.
२) गणेशाला वाणीचा देव का म्हटले गेले?
कारण, तो बुद्धीला सत्य, वाक्याला शक्ती देतो, ऋग्वेदात त्याला वाणीचा स्वामी म्हटले आहे
बुद्धीची दोन परिमाणे आहेत. बुद्धीने सत्याचे पालन केले नाही तर ती हानिकारक ठरते. ती सत्याने चालते तेव्हाच ती शुभ होते. गणेश हा बुद्धीचा देव आहे. अशा प्रकारे प्रत्येक वाक्याचा आधार सत्य आहे आणि त्याची शक्ती सरस्वती आहे. वाक्याचे तत्त्व गणेश आहे आणि मूलभूत शक्ती सरस्वती आहे. गणेश आणि सरस्वती दोघेही नेहमी एकत्र असल्याने गणेशाला वाणीचा देव म्हटले जाते. ऋग्वेदात गणेशाला ब्रह्मणस्पती म्हणतात. ब्रह्मण या शब्दाचा अर्थ आहे वाक् किंवा वाणी. म्हणून ब्रह्मणस्पती म्हणजे वाणीचा स्वामी.
३) लिहिण्यापूर्वी श्रीगणेशाय नम: का?
कारण अक्षरांना गण म्हणतात, गणेश त्यांचा अध्यक्ष आहे, त्यांचा वापर करण्यात चूक होऊ नये
गण हा शब्द व्याकरणातही येतो. अक्षरांना गण म्हणतात. अक्षरांची देवता असल्यामुळे गजाननाला गणेश असेही म्हटले जाते. छंदशास्त्रात मगण, नगण, भगण, यगण, जगण, रगण, सगण आणि तगण असे गणाचे आठ प्रकार आहेत. यांचा अधिष्ठाता असल्यामुळे त्याला गणेश म्हटले जाते. त्यामुळे लेखन, कविता, विद्यारंभाच्या वेळी प्रथम गणेशाची पूजा केली जाते. वही-खात्यांपासून, पत्र-आमंत्रणपत्रिकांमध्ये सर्वप्रथम श्री गणेशाय नम: लिहिले जाते, जेणेकरून लिहिताना कोणतीही चूक होऊ नये.
४) गणपतीला सिद्धिदाता का म्हटले गेले?
कारण त्याची निर्मिती श्रद्धा व विश्वासाने झाली, त्याच्याशिवाय कोणत्याही कामात दक्षता शक्य नाही
जगद्गुरू शंकराचार्य स्वामी शांतानंद सरस्वती यांनी गणेश अंकात लिहिले आहे - गोस्वामी तुलसीदासांनी रामचरितमानसमध्ये पार्वतीला श्रद्धेचे आणि शंकराला विश्वासाचे स्वरूप मानले आहे. कोणत्याही कार्याच्या सिद्धीसाठी, म्हणजेच पूर्णता आणि दक्षतेसाठी श्रद्धा व विश्वास आवश्यक आहे. विश्वास नसेल तर आत्मविश्वास येणार नाही. विश्वासाच्या अभावात श्रद्धा टिकू शकत नाही. श्रद्धा म्हणजे पार्वती व विश्वास म्हणजे शंकर यांच्यापासून गणेशाची निर्मिती झाली. ज्या शुभ संकल्पाने काम सुरू करायचे त्यात श्रद्धा व विश्वासाने गणेशाचे असणे आवश्यक आहे.
५) त्याला कलेचा देव का म्हटले जाते?
गणेश व देवी सरस्वती संयुक्तपणे सर्व कलांमध्ये पारंगत आहेत, ते प्रावीण्य देतात
हे एक युग आहे. गणेश आणि सरस्वती संयुक्तपणे सर्व कलांमध्ये पारंगत मानले जातात. कला क्षेत्रात पहिले गणपतीचे आणि दुसरे सरस्वतीचे स्मरण केले जाते. गणेशाला वादनतही तज्ज्ञ मानले जाते. तो नृत्यदेखील करतो, म्हणून त्याच्या नृत्य गणेश मूर्तीदेखील विविध ठिकाणी आढळतात. त्याला कवींच्या बुद्धीचे स्वामीही मानले जाते. तो कल्पना निर्माण करतो आणि नंतर ती कलात्मक पद्धतीने व्यक्त करण्याची क्षमता देतो.
६) गणेशाला मंगलमूर्ती का म्हणतात?
कारण तो विघ्न दूर करतो, समृद्धी आणि सौभाग्य आणतो, तो मुहूर्ताचा देव आहे
गणेश मांगल्याचा अधिष्ठाता आहे. त्याच्या पत्नी रिद्धी आणि सिद्धी सुख आणि समृद्धीच्या देवी मानल्या जातात. आणि त्याचे दोन मुलगे शुभ आणि लाभ हेही समृद्धी आणतात. गणेश सर्व विघ्नांचा नाश करणारा विघ्नहर्ता आहे. म्हणूनच त्याची प्रतिमा लावल्याने सुख-समृद्धीसह सर्व प्रकारची विघ्ने आपोआप नष्ट होतात. भारतीय परंपरेत मुहूर्त पाहिल्यानंतर कोणतेही शुभ कार्य केले जाते. सेकंद, मिनिटे आणि तासांप्रमाणेच मुहूर्तदेखील काळाचे एकक आहे. ४८ मिनिटांचा एक मुहूर्त असतो. ज्योतिषशास्त्रात गणेशाला नक्षत्रांचा स्वामी म्हटले आहे. तो सर्व गणांचा देव आहे आणि शुभ कार्याच्या सुरुवातीला गण देवतेची पूजा केली जाते.
७) गणेशाची उजवी आणि डावी सोंड का आहे?
उजव्या सोंडेची सिद्धिविनायकाची मूर्ती आणि डाव्या सोंडेची विघ्नविनाशक
गणेशाची सोंड उजवीकडे असलेल्या मूर्तीला सिद्धिविनायकाचे रूप मानले जाते, तर डाव्या बाजूला सोंड असलेल्या मूर्तीला विघ्ननाशक म्हणतात. सिद्धिविनायकाची घरात स्थापना करण्याची परंपरा आहे आणि संकटे अडथळे घराच्या आत येऊ नयेत यासाठी विघ्नविनाशकाची घराच्या बाहेरील दरवाजावर स्थापना केली जाते. उजव्या सोंडेची मूर्ती पिंगला स्वराची (सूर्य) मानली जाते. डाव्या सोंडेची गणेशमूर्ती इडा नाडीचे (चंद्र) प्रतीक आहे. सरळ सोंड असलेली मूर्ती सुषुम्णा स्वराची असल्याचे मानले जाते. संत समाज या मूर्तीची अधिक पूजा करतो.
८) गणेश हा गज, त्याचे वाहन उंदीर का आहे?
कारण गज हे सुबुद्धीचे व उंदीर हे कुबुद्धीचे प्रतीक, सुबुद्धीने कुबुद्धीवर नियंत्रण मिळवणे शक्य आहे
श्री शरणानंद महाराजांनी गणेश अंकाच्या ‘गणेश तत्त्वाचे महत्त्व’ या लेखात लिहिले आहे की, गीतेतही सर्व प्राण्यांमध्ये देव असल्याचे मानणे शहाणपणाचे मानले आहे. हत्ती हा प्राण्यांमध्ये सर्वात हुशार आहे. म्हणून प्राण्यांशी मानवाचे साम्य प्रकट करण्यासाठी गणेशाला हत्तीचा चेहरा असल्याचे चित्रित केले आहे. उंदीर चांगल्या-वाईट, निरुपयोगी गोष्टींमधील फरक समजत नाही. तो कुतर्क बुद्धीचे प्रतिनिधित्व करतो. सुबुद्धी विशाल असेल तर कुबुद्धीवर नियंत्रण ठेवता येते, हा गणेशाच्या विशाल व उंदराच्या छोट्या शरीरामागचा संकेत आहे.
९) वाहनात गणेशाची प्रतिमा का ठेवतात?
कारण तो शुभंकर, दिशांचा देव आहे, सर्व दिशांनी येणाऱ्या संकटांपासून रक्षण करतो
गणेश मांगल्याची देवता आहे, त्यामुळे कोणत्याही प्रकारचे अमंगल दुर्भाग्य टाळण्यासाठी लोक गणेशाची प्रतिमा वाहनांमध्ये ठेवतात. तो शुभंकरही आहे. महर्षी पाणिनींच्या मते, दिशांचे स्वामी अर्थात अष्टवसूंच्या समूहाला गण म्हणतात. त्यांचा स्वामी गणेश आहे. उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम आणि आकाश-पाताळ अशा सर्व दिशांनी संरक्षण करावे, योग्य दिशा द्यावी, अशी गणेशाची प्रार्थना गणपती अथर्वशीर्षात केली आहे.
१०) घरे, मंदिरांच्या दारावर गणेश प्रतिमा का लावतात?
कारण तो स्वस्तिक आणि ॐ सारखा सर्वात मोठा शुभंकर, सर्वात शक्तिशाली संरक्षक आहे
गणेशाला शुभ कार्याचा शुभंकरदेखील मानले जाते. देवतांमध्ये तो प्रथम पूजनीय असल्याने. श्रेष्ठ असल्याने त्याची सर्वत्र स्थापना केली जाते. याप्रमाणेच स्वस्तिक आणि ॐ हेसुद्धा आपले शुभंकर आहेत. ॐ ला अनाहत नाद म्हणतात, याच्यातून विश्वाची उत्पत्ती झाल्याचे मानले जाते. अशा प्रकारे तीन प्रकारचे शुभंकर आहेत. पहिला ॐ, दुसरा स्वस्तिक आणि तिसरा गणेश. वास्तवात ॐ आणि स्वस्तिक हेही ग्रंथात गणेशाच्या रूपाने व्यक्त केले आहेत. गणेशाला विघ्नकर्ता आणि विघ्नहर्ता दोन्ही म्हटले गेले आहे. तो येणाऱ्या संकटांपासून संरक्षण करतो.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.