आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासर्वत्र मंगलमय वातावरण घेऊन येणाऱ्या श्रीगणेशाच्या स्वागतासाठी सर्वजण उत्सुक झाले आहेत. यंदा (दि. १० सप्टेंबर) शुक्रवारी श्रीगणेश चतुर्थीदिनी गणपतीची घरी पहाटे ४:५० पासून दुपारी १:५० पर्यंत कधीही प्रतिष्ठापना करू शकताे, अशी माहिती दाते पंचांगकर्ते ओंकार दाते यांनी दिली.
भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थीच्या दिवशी श्रीगणेश चतुर्थी साजरी केली जाते. पार्थिव गणेश स्थापना करण्याचा भाद्रपद शुद्ध चतुर्थी हा एकच दिवस असल्याने त्या दिवशी जमले नाही तर पुढे कोणत्याही दिवशी स्थापना करता येत नाही. एखाद्या वर्षी काही कारणाने लोप झाल्यास पुन्हा पुढील वर्षी गणपती पूजन करता येते.
दुकानातून गणपतीची मूर्ती ८-१५ दिवस आधी आणून घरामध्ये ठेवता येते. श्रीगणेश चतुर्थीच्या आधी एक दिवस किंवा त्याच दिवशी सकाळी मूर्ती आणावयास पाहिजे असे काही नाही. पार्थिव गणेश स्थापना व पूजन करण्यासाठी विशिष्ट मुहूर्त नाही. प्रात:कालापासून मध्यान्हापर्यंत कोणत्याही वेळी स्थापना व पूजा करता येईल.
त्यासाठी विशिष्ट नक्षत्र, योग, विशिष्ट करण इ. वर्ज्य नाहीत म्हणून ते पाहू नयेत. अनेक जण दरवर्षी उत्सवासाठी आपल्या गावी जात असतात. या वर्षी त्यांना गावी जाणे शक्य नसल्यास त्यांनी राहत्या घरी वरीलप्रमाणे गणेशोत्सव करून आपली गणेशपूजनाची परंपरा अखंडित ठेवावी. या वर्षी कोरोना संकटामुळे ज्याप्रमाणे अनेक बदल आपण अंगीकारले त्याप्रमाणे गणेश उत्सवातसुद्धा आपणास बदल करावा लागेल, असेही त्यांनी सांगितले.
पूजन विधी
सकाळी लवकर उठून स्नान व नित्यकर्म झाल्यानंतर आपल्या सामर्थ्यानुसार सोने, चांदी, तांब, पितळ किंवा मातीपासून तयार केलेल्या श्रीगणेशाच्या मूर्तीची स्थापना करावी. (शास्त्रामध्ये मातीपासून तयार केलेल्या मूर्तीची स्थापना श्रेष्ठ मानण्यात आली आहे) संकल्प मंत्रानंतर षोडशोपचार पूजा व आरती करावी. श्रीगणेशाच्या मूर्तीला शेंदूर, गुलाल लावावा. मंत्राचा उच्चार करीत 21 दुर्वा अर्पण कराव्यात. 21 मोदकांचा नैवेद्य दाखवावा. यामधील 5 मोदक मूर्तीसमोर ठेवावेत आणि 5 मोदक ब्राह्मणांना द्यावेत. उर्वरित मोदक प्रसाद म्हणून सर्वांना वाटावेत.
पूजेला सुरुवात करण्यापूर्वी खालील संकल्प मंत्राचा उच्चार करावा..
‘मम सकुटुंबस्य क्षेमस्थिती आयुरारोग्य ऐश्वर्याभिवृद्धी, सर्वकाम निर्विघ्न सिद्धी, पुत्रपौत्र धनधान्य समृद्धीद्वारा प्रतिवार्षिक विहितम् श्री सिद्धिविनायक देवताप्रीत्यर्थ ध्यानावाहनादी षोडशोपचारै: पूजां करिष्ये।’
प्राणप्रतिष्ठा मंत्र :
रक्तांबोधिस्थपोतोल्लसदरुण सरोजधिरूढा कराब्जै:।
पाशाकोदंड भिक्षूद्रभवमथगुणप्यंकुशम् पंचबाणान्।।
बिभ्राणासृक्कपालं त्रिनयनलसिता पीतवक्षोरुहाढ्याम्।
देवी बालार्कवर्णा भवतु सुखकारी प्राणरुक्ति: परान:।।
पूजा करताना खालील मंत्राचा उच्चार करावा...
ऊं गं गणपतये नम:
दुर्वा अर्पण करताना खालील मंत्राचा उच्चार करावा...
ऊं गणाधिपतयै नम:
ऊं उमापुत्राय नम:
ऊं विघ्ननाशनाय नम:
ऊं विनायकाय नम:
ऊं ईशपुत्राय नम:
ऊं सर्वसिद्धप्रदाय नम:
ऊं एकदन्ताय नम:
ऊं इभवक्त्राय नम:
ऊं मूषकवाहनाय नम:
ऊं कुमारगुरवे नम:
घरामध्ये गर्भवती स्त्री असतानाही गणपती विसर्जन करावे : घरामध्ये गर्भवती स्त्री असताना काही कुटुंबे गणेशमूर्तीचे विसर्जन करत नाहीत. ही प्रथा चुकीची आहे. ही प्राणप्रतिष्ठा करून बसवलेली मूर्ती उत्तरपूजा करून देव्हाऱ्यातून खाली काढतात व तिचे पाण्यात विसर्जन करतात. वाहत्या पाण्यामध्ये विसर्जन करण्याची गरज नसून पाण्यातही विसर्जन करता येते. त्यामुळे तलावात किंवा स्वतंत्र टँकमध्ये, मोठ्या बादलीमधील पाण्यातसुद्धा विसर्जन करता येते. विसर्जनानंतर ती मूर्ती विरघळणे आवश्यक असल्याने शाडूची किंवा मातीची मूर्ती असावी, असेही दाते यांनी सांगितले.
असे असेल गौराईचे आगमन
१२ सप्टेंबर २०२१, रविवार गौरी आवाहन : सकाळी ९:५० नंतर परंपरेप्रमाणे गौरी आवाहन करावे. १३ सप्टेंबर २०२१, सोमवार रोजी गौरीपूजन करावे. १४ सप्टेंबर २०२१ मंगळवारी गौरी विसर्जन सकाळी ०७:०५ नंतर गौरी विसर्जन करावे. मंगळवार असला तरीही गौरी विसर्जन परंपरेप्रमाणेच करावे, अशीही माहिती ओंकार दाते यांनी दिली. दरम्यान, यंदा कोरोनामुळे अनेक निर्बंध असले तरी राज्यभरातील भाविकांची उत्साह हा कमी झालेला नाही. त्यामुळेच गणपती आणि गौराईच्या आगमनाची उत्सुकता आहे. राज्यातील सजावट आणि मूर्तीचे दुकाने ही सजली आहेेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.