आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनंत ऊर्जा:आपण विघ्नविनाशक व्हायला हवे, गणपतीचे गुण आत्मसात करावेत

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

आपल्याला विघ्नविनाशकाची केवळ पूजाच करायची नाही, तर स्वतः विघ्नविनाशक व्हायचे आहे आणि गणपतीचे गुण आत्मसात करायचे आहेत. हीच श्रीगणेशाची खरी पूजा ठरेल.

सर्व गुणांचा पती, असा गणपतीचा अर्थ आहे. आपल्याला त्याच्या गुणांचा महिमाच गायचा नाही, तर ते आत्मसातही करायचे आहेत. तरच आपण विघ्नविनाशक होऊ शकू. गणेशाच्या जन्माच्या कथेतून आपल्याला खूप काही शिकायला मिळते. शंकर दहा वर्षांच्या तपश्चर्येसाठी गेल्यावर पार्वतीने आपल्या शरीरावरील मळापासून एक दहा वर्षांचा मुलगा तयार केला. पार्वतीने स्नानाला जाताना त्या मुलाला दरवाजावर उभे करून सांगितले की, कुणालाही आत येऊ देऊ नकोस. शंकर दहा वर्षांच्या तपश्चर्येवरून आला तेव्हा त्या मुलाने त्याला आत येऊ दिले नाही. शंकराला इतका राग आला की त्याने त्या मुलाचे डोके उडवले, असे सांगितले जाते. पार्वतीने बाहेर आल्यावर ते पाहिले आणि ती शंकराला म्हणाली की, तुम्ही आपल्याच मुलाचे डोके उडवलेत. तेव्हा शंकर म्हणाला की, आता येथून जो जाईल त्याचे डोके मी या मुलाच्या धडाला लावून देईन. तेवढ्यात तिथून एक हत्ती जाऊ लागला. तेव्हा शंकराने त्या हत्तीचे डोके त्या मुलाच्या धडाला लावून दिले. मग आपण आज पूजा करतो त्या गणेशाचे हे रूप साकारले.

या कथेचा अर्थ काय, याचा आपण कधी विचार केला नाही. आज आपण दहा मिनिटेही ध्यान केले तर अगदी शांत वाटते. आणि इथे आपण म्हणतो की, शंकर दहा वर्षांच्या तपश्चर्येवरून आला आणि त्याला छोट्याशा गोष्टीवरून इतका राग आला की त्याने त्या मुलाचे डोके उडवले असे होऊ शकते का? कुणाला इतका राग येईल की तो आपल्याच मुलाचे डोके उडवील? आपण असे करू शकत नाही, तर दहा वर्षांच्या तपश्चर्येवरून आलेला देव असे कसे करील? एवढ्याशा गोष्टीवरून डोके कापले आणि पुन्हा तेच डोके का नाही लावले? याचे उत्तर समजून घेतले नाही, तर आपण ही केवळ एक कथा म्हणूनच ऐकत राहू. आपण आधी कधी विचारही केला नाही, असाही या कथेचा वेगळा अर्थ असू शकतो.

पार्वती एक देवी आहे. एक मुलगा तयार होईल इतकी माती एखाद्याच्या शरीरातून निघू शकते का? मग याचा अर्थ काय आहे? शरीराची माती म्हणजे अहंकार. अहंकार नेहमी डोक्यात दाखवला जातो. एखाद्याचा अहंकार वाढतो तेव्हा याच्या डोक्यात हवा गेली, असे म्हणतात. आपण देवाचे स्मरण करतो, आध्यात्मिक ज्ञानाचा अभ्यास करतो तेव्हा सर्वप्रथम आपल्यात होणारा बदल म्हणजे आपला अहंकार कमी होऊ लागतो. म्हणजे अहंकाराचे डोके कापले जाऊ लागते. वास्तवात या शरीराचे नव्हे, तर अहंकाराचे डोके आहे. अहंकाराचे डोके कापले जाते तेव्हा एक बुद्धिमान डोके त्या जागी लावले जाते. त्यामुळेच मुलाचे डोके कापून हत्तीचे लावले, असे दाखवले जाते. हत्तीच्या अंगांगात बुद्धी आणि ज्ञान आहे. गणेशाचे ललाट मोठे दाखवले जाते, म्हणजे विशाल बुद्धी. आपण ईश्वरी ज्ञानाचा अभ्यास करू लागतो तेव्हा आपल्या एकेक विचारात ऊर्जा सामावू लागते. मग आपण सर्वांच्या कल्याणाचा विचार करतो.

आपल्याकडे आहे ते ज्ञान, पण बुद्धी म्हणजे त्या ज्ञानाचा आपल्या जीवनात योग्य वापर, असा ज्ञान आणि बुद्धीमध्ये फरक आहे. तर अशाच विशाल बुद्धीमुळे गणपतीचे डोके मोठे दाखवले जाते. गणेशाची कान सुपासारखे दाखवले जातात. त्याचा अर्थ चांगल्या गोष्टीच आत घ्यायच्या आहेत, बाकी कचरा बाहेर टाकायचा आहे. कान मोठे म्हणजे ऐकणे जास्त आणि बोलणे कमी, म्हणूनच तोंड छोटे दाखवतात. दिवसभर आपण सोशल मीडिया वा इतर माध्यमातून जे ऐकतो, पाहतो, वाचतो ते आपल्या विचाराचा एक भाग होते. आपले विचार अशुद्ध होतील, असे काहीही आपण ऐकू, वाचू किंवा पाहू नये.

आपण एखादी गोष्ट करायची नाही असे ठरवतो आणि तेच करू लागतो, तेव्हा त्याचा अर्थ आपणच आपली इच्छाशक्ती कमी करत आहोत. मग आपणच म्हणतो की, मी जे करायचे ठरवतो ते करू शकत नाही. आपले सामर्थ्य आणि इच्छाशक्ती वाढवायची असेल तर आपण इतरांच्या उणिवांबाबत विचार वा त्यासंबंधी कुणाशी बोलू नये. आपण असे करू शकलो नाही, तर ती उणीव त्यांचीच राहत नाही, तर ती आपल्या विचाराचा एक भाग होऊन जाते. आज आपल्याला निर्धार करायचा आहे की, विघ्नविनाशकाची केवळ पूजाच करायची नाही, तर स्वतः विघ्नविनाशक व्हायचे आहे आणि गणपतीचे गुण आत्मसात करायचे आहेत. तरच आपण खऱ्या अर्थाने गणेशोत्सव साजरा करू शकू.

बी. के. शिवानी,
awakeningwithbks@gmail.com

बातम्या आणखी आहेत...