आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आध्यात्मिक:गणपतीच देतो सकारात्मकतेचा श्रीगणेशा करण्याचा संदेश

5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • श्रीगणेशापासून प्रेरणा घेऊन जो दिव्य आत्मा होईल तो खूप नम्र, पण खूप सामर्थ्यवान असेल. आध्यात्मिकता म्हणजे जीवनात संपूर्ण संतुलन. नम्र, पण खूप शक्तिशाली.

चांगले काम सुरू करण्यापूर्वी श्रीगणेशा करा, असे म्हटले जाते. म्हणजे प्रत्येक कामाची सुरुवात गणेश स्थापनेने केली जाते. पण फक्त गणेशाचे स्मरण करणे पुरेसे आहे का? आपण केवळ गणेशाचा महिमा गाण्यापेक्षा स्वत: श्रीगणेशासारखे झाले पाहिजे. गणेशाच्या प्रत्येक अवयवाकडे पाहिल्यास लक्षात येते की तो आपल्याला योग्य जीवन कसे जगावे हे शिकवतो. गणेशाचे कपाळ मोठे दिसते. ते दिव्य आणि अपार बुद्धिमत्तेचे प्रतीक आहे. त्याचे डोळे खूप लहान दाखवले जातात. म्हणजे ज्याच्याकडे दैवी बुद्धिमत्ता तो दूरदर्शी असेल. म्हणजे कर्म करण्यापूर्वी त्याच्या परिणामाबद्दल विचार करणे. श्रीगणेशाचे छोटे तोंड असणे म्हणजे कमी बोलण्याचा संदेश. पण कान मोठे म्हणजे जास्त ऐकणे आणि चांगल्या गोष्टी ग्रहण करणे. श्रीगणेशाचा एक दात तुटलेला दाखवतात. आज आपल्या जीवनात दुटप्पीपणा आहे. जिथे अहंकार असेल तिथे दुटप्पीपणा असेल. ईश्वर हेच शिकवतो की, मी एक आत्मा आहे, तुम्हीही एक आत्मा आहात. यामुळे आपले जग एक कुटुंब बनते. मग ही दिव्यता जीवनात येते तेव्हा दुटप्पीपणा संपतो. मग श्रीगणेशाची सोंड दाखवतात. तिचे वैशिष्ट्य म्हणजे ती एखादे झाडही उपटते आणि प्रेमाने मुलालाही उचलते. जो आत्मा दिव्य होईल तो खूप नम्र होईल, परंतु खूप सामर्थ्यवानही असेल. आध्यात्मिकता म्हणजे जीवनात संपूर्ण संतुलन. नम्र, पण खूप शक्तिशाली. मग गणपतीचे पोट मोठे दाखवतात. दिव्य आत्मा तोच जो सर्व काही आपल्या पोटात सामावून घेतो, असे मानले जाते. तर, सर्वकाही सर्वांना सांगतो त्याच्याबाबत म्हटले जाते की, याच्या पोटात काहीच राहत नाही.

श्रीगणेशाचे चार हात दाखवले जातात. एका हातात परशु आहे. म्हणजेच वाईट गोष्टी, नकारात्मकतेचा नाश करण्यासाठी परमात्म्याकडून ज्ञानाची कुऱ्हाड मिळालेली आहे. दुसऱ्या हातात दोरी आहे. ती सांगते की योग्य विचार, योग्य शब्द, योग्य कृती, योग्य आहार, कमाईचा योग्य मार्ग याला मर्यादांच्या दोरीने बांधावे. तिसरा हात आशीर्वाद देतो. तो सूचित करतो की आपला हात नेहमी देण्याच्या पवित्र्यात असावा. म्हणजे कोणीही आले आणि कसेही वागले तरी आपल्या मनात त्याच्याबद्दल चांगले विचार यावेत. चौथ्या हातात मोदक आहे, पण गणपती तो खात नाही, हातात ठेवतो. याचा अर्थ असा की, तुम्हाला यश मिळेल, परंतु गौरव स्वीकारू नये. अहंकार बाळगू नये. यश हातातच ठेवले पाहिजे. श्रीगणेशाला बसलेला दाखवतात. एक पाय दुमडलेला आहे आणि एक पाय खाली आहे. खाली असलेल्या पायाचा अंगठाच खाली स्पर्श करतो. या जगात राहायचे असेल पाय जमिनीवर ठेवा. आपल्याला सर्व काही करायचे आहे, सर्व नातेसंबंध टिकवायचे आहेत, व्यवसाय करायचा आहे, परंतु सर्वांपासून अलिप्तही राहायचे आहे. एखाद्याच्या प्रभावाखाली आपली मूल्ये सोडू नये. श्रीगणेशाचे वाहन उंदीर दाखवतात. आपण पाहतो की, उंदीर दिवसभर काही ना काही कुरतडत राहतो. हे आपल्या कर्म इंद्रियांचे प्रतीक आहे. दिवसभर काहीही पाहणे, ऐकणे, काहीही खाणे, गरज नसतानाही काही तरी पित राहणे. दुसरे म्हणजे उंदीर छोट्या जागेतूनही प्रवेश करतो. त्याच प्रकारे आपल्या जीवनात गोष्टी, ताणतणाव, दुर्बलता कधी येते हे कळत नाही. वेदना खूप नंतर होते.

आज आपण सर्व कठोर परिश्रम घेत आहोत. आनंद, आरोग्य, नातेसंबंध व कामासाठी. आपल्याला स्वतःसाठी वेळ मिळत नाही, म्हणजे आपण आपलेच जग सांभाळू शकत नाही. परंतु, ज्याचा परमात्म्याशी संबंध आहे त्याचा प्रत्येक विचार शुद्ध, प्रत्येक शब्द योग्य असेल. आयुष्य कसे जगावे हे श्रीगणेश आपल्याला शिकवतात. जो आत्मा या सर्व गोष्टी करतो त्याला विघ्नविनाशक म्हणतात. आपण सर्वांनीच गणेशासारखे विघ्नविनाशक आत्मा झाले पाहिजे. सर्वांचे दु:ख दूर करून पृथ्वीवर आपल्याला सुख आणायचे आहे.

शिवानी दीदी
ब्रह्मकुमारी

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser