आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सकारात्मक:चांगल्या गोष्टी घडतात, परंतु त्याला वेळ लागतो

7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कठोर परिश्रम करणे, प्रयत्न करणे हा जीवनाचा एक भाग आहे. यामुळेच आपल्या कामाचे मूल्य वाढते...

जिम कुरियर एक यशस्वी टेनिसपटू होते. ते दीर्घ काळ टेनिस खेळत राहून चांगली कामगिरी करत अव्वल खेळाडूंमध्ये राहिले. ‘कठीण’ शब्दाची व्याख्या जिम कुरियरपेक्षा कोणी चांगली केली आहे, असे मला वाटत नाही. ते म्हणायचे, कृपया एक गोष्ट समजून घ्या, काही करणे सोपे असेल तर ते आता करता येईल. ते अवघड असेल तर आणखी थोडा वेळ लागेल.” बस्स, हाच फरक आहे. ते करणे शक्य नाही असे मुळीच नाही. चांगल्या गोष्टी अवघड असतात आणि त्यांना वेळही लागतो, परंतु याचा अर्थ असा नाही की त्या करताच येणार नाहीत. त्यांना आणखी वेळ द्या.

प्रत्येक काम त्वरित झाले तर त्यांचे काही मूल्य राहणार नाही. समजा, रस्त्यावर दहा रुपयांची नोट पडलेली आहे. त्याला तुम्ही १० रुपयेच म्हणाल. तीन फूट खड्डा खोदला आणि नंतर दहा रुपये मिळाले तर तुम्ही त्याला एक खजिना म्हणाल. दोन्हीमध्ये एकच वस्तू आहे, परंतु खोदण्याच्या मेहनतीने त्याचे मूल्य वाढवले. कठोर परिश्रम करणे, प्रयत्न करणे हा जीवनाचा एक भाग आहे.

आज तुमच्या जीवनाचा एक भाग असलेला प्रामाणिकपणा मोठ्या मुश्किलीनेच तुमच्यात आला असेल. जीवनाने आपल्यासाठी अगणित संधी दिल्या असतील आणि त्यातील काही क्षणांत तुम्हाला अप्रामाणिक होऊन भौतिक सुखसोयींचे फायदे दाखवले असतील. आणि या अस्थायी भौतिक सुखापासून, लोभापासून स्वतःचे रक्षण करणे, आपली वैयक्तिक सचोटी राखणे अवघड झाले असेल. हा बदल स्वतःमध्ये करणे अवघड झाले असेल, परंतु त्याचे एक मूल्य होते.

सकारात्मक सवय लावणे किंवा नकारात्मक सवय सोडून देणे कठीण असेल, परंतु त्याचे मूल्य आहे, त्याचे फायदे आहेत. तुम्हाला काहीही करायचे नसले तरीही ते सोपे नाही. उदा. एखाद्याने निर्णय घेतला की आजपासून तो काहीही करणार नाही. तो आपल्या बायकोला बोलावून म्हणतो, ‘अगं ऐक, आजपासून मी काहीही करणार नाही. फक्त आराम करीन. फोनचा रिसीव्हर काढून ठेव. मोबाइल बंद कर. मी माझ्या खोलीचे दार लावून घेतो, मला कोणत्याही प्रकारचा त्रास नको आहे.” मग तो आराम कसा करायचा याचा विचार करील. चांगली उशी निवडण्यापासून सुरुवात होईल. त्यानंतर ध्यानस्थ स्थितीत बसण्याचा प्रयत्न करील. मनात अनेक विचार येऊ लागतील. ‘कोणती स्थिती चांगली असेल... त्यांनी सांगितले होते की पालथी मांडी घालून बसणे आवश्यक नाही... मी थोडा टेकून बसतो, पाठीला थोडा आराम मिळेल... जमिनीवर बसू नये, खाली चटई टाकतो... गरमी होतेय, पंखा लावतो… हं, हा पंखा एकच्या स्पीडने चालतो तेव्हा त्याचे पाते दिसतात, पाचच्या स्पीडवर ते दिसत नाहीत… महात्रया रा यांनी कोणता सिद्धांत सांगितला होता, टीओई, थिअरी ऑफ… गुगलवर पाहावे लागेल… कुणी फोन का उचलत नाही? अनुमा, जरा फोनकडे बघ… हं… महात्रया रा म्हणाले होते की, छोट्यापासून सुरुवात केली पाहिजे… चला, आजच्यापुरते इतके ‘काहीही न करणे’ पुरेसे आहे… आता काही तरी करतो. आणि तो जागेवरून उठेल.

पहिल्या दिवशी एवढेच होऊ शकेल. आणि यानंतर असे काही होईल, जे फार आवश्यक आहे. तो फेसबुक उघडून पोस्ट करील, ‘मी आजपासून ध्यान करायला सुरुवात केली आहे.’ आणि खूप लोक त्याला लाइक करतील. मग तीन दिवसांनी तो छायाचित्रकाराला बोलावून आपला फोटो काढण्यासाठी मेहनत घेऊ लागेल. ‘हे बघ, इथून फोटो घे… फोटोसाठी हा प्रकाश चांगला असेल… थोडा निळा प्रकाश टाक….’ हेही कठीण आहे. विशेषत: कॉफीच्या वेळी उकळत्या कॉफीचा वास येईल तेव्हा हे सोपे नसेल. लक्ष विचलित होईल. कठीण आहे, परंतु त्याचे मूल्य आहे, त्यातून फायदा आहे. म्हणूनच जिम यांचे म्हणणे योग्य आहे. काही करणे सोपे असेल तर ते आताच होईल. ते अवघड असेल तर आणखी थोडा वेळ लागेल. ते करणे शक्य नाही असे मुळीच नाही.

महात्रया रा
आध्यात्मिक गुरू
infinitheism.com/wisdom

बातम्या आणखी आहेत...