आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आध्यात्मिक:सात साधनांनी आपल्या शरीरालाच ग्रंथ बनवा

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

भगवान वेद व्यासांनी सात साधनांचा क्रमशः विस्तार करण्यास सांगितले आहे. या सात गोष्टी कधी प्रत्यक्ष मिळतात, तर कधी अप्रत्यक्ष. या सात गोष्टींचा विस्तार क्रमशः ‘रामचरितमानस’मध्ये झालेला आहे. नाम साधना, रूप साधना, लीला साधना, ध्यान साधना, स्मरण साधना, धाम साधना आणि पूर्ण किंवा शून्य साधना. हा अद्भुत विचार आहे. कोणत्याही काळात एखाद्या बुद्ध पुरुषाच्या कृपेने आपण हे करून आंतरिक आनंदाचा अनुभव घेऊ शकतो.

नाम साधना म्हणजे आपले इष्ट, ज्या नामाची आपल्याला आवड आहे असे किंवा गुरूने वा एखाद्या ज्ञानी व्यक्तीने दिलेल्या मंत्राचा जप करणे. माळेने करा किंवा बोटांवर मोेजून करा. प्रत्येक पावलाला, श्वासाला करा. कलियुग नाम साधनेचा काळ आहे, यावर मी भर देतो. शास्त्र सांगते की, मोठ्या प्रमाणावरील स्नान, दान, प्राणायामानेही एखाद्या पोहोचलेल्या साधूने नाम साधनेने मिळवलेली स्थिती प्राप्त होत नाही. साधना, स्मरण, भजन, आध्यात्मिक यात्रा लोकांच्या अभिप्रायावर नव्हे, तर गुरूचे कृपापूर्वक आदेश, आपली आवड व साधनेने ती गतिशील होते. नाम साधनेचा विकास ‘रामचरितमानस’च्या बालकांडात दिसतो.

दुसरा विचार आहे रूप साधना. आपण सगुण उपासक असल्यास परमात्म्याच्या एखाद्या मूर्तीशी जोडलेलो असतो. राम, कृष्ण किंवा कोणतेही रूप असो. त्याला तत्त्वतः रूप नाही, पण भक्तांच्या प्रेमाखातर त्याने रूप धारण केलेले आहे. अशा रूप साधनेचा विस्तार करा. रूप साधनेचा विस्तार ‘अयोध्याकांडा’त झाला आहे.

तिसरा लीला साधनेचा विकास. देवाच्या मंगलमय लीलांचे वर्णन, श्रवण, गायन, कीर्तन, नर्तन हीसुद्धा एक साधना आहे. परमात्म्याची ललित नरलीला ‘अरण्यकांडा’त विकसित झाली.

चौथा आहे ध्यान साधनेचा विकास. प्रभूचे ध्यान आणि अंतर्मुखता. ‘किष्किंधाकांडा’त ध्यान साधनेचा क्रमशः विकास झाला. स्वयंप्रभाच्या गुहेत वानरे हनुमानाच्या स्वागतासाठी उपाशीपोटी जातात. तिथे ते स्नान करतात, पाणी पितात. मग स्वयंप्रभाच्या सूचनेनुसार सर्व डोळे मिटून अंतर्मुख होतात. हा ध्यान साधनेचा विकास आहे. ध्यान फार वेळ चालले नाही. त्यांनी डोळे उघडले. परंतु, त्याच किनाऱ्यावर हनुमान ध्यानस्थ होते. त्यांचे ध्यान अखंड राहिले. पाचवा म्हणजे स्मरण साधनेचा विकास ‘सुंदरकांडा’त आहे. निरंतर स्मरण साधना चालते.

कह हनुमंत बिपति प्रभु सोई।
जब तव सुमिरन भजन न होई।।

तेलाच्या धारेसारखी निरंतर स्मृती. ही स्मरण साधना आहे. तू माझी आठवण ठेव, माझे स्मरण कर. तुझ्या वाट्याला आलेली जबाबदारी पूर्ण कर, परंतु स्मृती अखंड ठेव. सिमरन, सुमिरन, स्मरण, स्मृती हे फार गोड शब्द आहेत.
सहावी आहे धाम साधना. परमात्म्याचे धाम. ‘लंकाकांडा’त प्रभूने सर्वांना निर्वाण धाम दिले. गुरुकृपेने तयार झालेली बुद्धी ‘लंकाकांड’ला धाम साधनेचा क्रमशः विकास मानते.

‘उत्तरकांड’ पूर्ण किंवा शून्य साधनेचा विकास आहे. नितांत रिकामे होणे किंवा काठोकाठ भरून जाणे. लक्षात ठेवा, जे शून्य आहे तेच पूर्ण आहे आणि जे पूर्ण आहे ते नितांत रिकामे आहे, शून्य आहे.

या शरीराला ग्रंथ बनवा. शरीरातच सातही सोपान आहेत. देवाने जीभ दिली आहे, तर आपण नाम साधना करू शकतो. देवाने डोळे दिले म्हणजे आपण रूप साधना करू शकतो. मनरूपी एक अंतःकरण दिले, त्याद्वारे ध्यान साधना करू शकतो. स्वर दिला, त्याद्वारे लीला साधना करू शकतो. नर्तन करू, गाऊ, कीर्तन करू. चित्तात नामस्मरणाची अखंड धारा सुरू ठेवू. स्थूल रूपात या देहाने कोणत्या ना कोणत्या धामात आपण राहत असतो. शेवटी गुरुकृपेने आपल्याला निजधाम मिळेल. आणि या शरीराच्या माध्यमातूनच पूर्णत्व किंवा शून्यत्वाची साधना करू शकू. शरीर एक चालता-फिरता ग्रंथ आहे. तो देवाने निर्माण केला आहे. हे शरीर सात अध्यायांचा, सात सोपानांचा, सात पर्वांचा एक दिव्य ग्रंथ आहे.

मोरारी बापू
आध्यात्मिक गुरू आणि राम कथाकार

बातम्या आणखी आहेत...