प्राचीन मान्सून मंदिर / पावसाळा सुरु होण्याच्या 5-7 दिवसांपूर्वीच मंदिराच्या छतामधून टपकू लागतात पाण्याचे थेंब, यावरून बांधला जातो मान्सूनचा अंदाज

  • जवळपास एक हजार वर्ष जुन्या या मंदिराच्या भिंती आहेत 15 फूट रुंद

दिव्य मराठी

May 23,2020 06:56:51 AM IST

उत्तर प्रदेशातील कानपूरपासून जवळपास 40 किमी दूर बेहटा बुर्जुग गाव आहे. येथे मान्सूनची भविष्यवाणी करणारे एक प्राचीन मंदिर आहे. जवळपास एक हजार वर्ष जुन्या या मंदिराचे बांधकाम काहीसे अशाप्रकारचे आहे की, पावसाळा सुरु होण्याच्या 5-7 दिवसांपूर्वी या मंदिराच्या छतामधून पाण्याचे थेंब टपकण्यास सुरुवात होते. मंदिराचे निर्माण एक हजार वर्षांपेक्षाही जुने आहे. यावर अनेक रिसर्चही झाले आहेत.

मंदिराचे पुजारी केपी शुक्ला यांनी दिलेल्या माहितीनुसार येथे भगवान जगन्नाथाची मूर्ती स्थापित आहे. मंदिराच्या छतावर मान्सून दगड लावलेला आहे. या दगडातून टपकणाऱ्या थेंबांवरून पाऊस कसा पडणार याविषयी अंदाज बांधला जातो. जास्त थेंब टपकल्यास जास्त पाऊस पडणार असल्याचे मानले जाते. ही केवळ एक धार्मिक मान्यता नसून यामागे संपूर्ण विज्ञान आहे. मंदिराच्या भिंती आणि छत अशाप्रकारे बनवण्यात आले आहे की, मान्सून सुरु होण्याच्या 5-7 दिसांपूर्वीच हे काम करणे सुरु करते.

15 फूट रुंद आहेत भिंती

भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण, लखनऊचे सिनियर सीए मनोज वर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार हे मंदिर अनेकदा पडले आणि पुन्हा बांधण्यात आले आहे. येथे अनेक लोकांनी रिसर्च केले आहेत. बहुतांश रिसर्चचा असा अंदाज आहे की, हे मंदिर 9 व्या किंवा 10 व्या शतकातील आहे. मंदिरातील भिंती 15 फूट रुंद आहेत. मंदिर बांधकामात चुना आणि दगडांचा वापर करण्यात आला आहे. पावसाळ्यापूर्वी वातावरणात दमटपणा वाढू लागतो आणि यामुळे चुना वातावरणातील ओलावा ग्रहण करतो.

हा ओलावा दगडापर्यंत पोहोचतो आणि दगडातून पाण्याचे थेंब टपकू लागतात. जेव्हाही वातावरणात दमटपणा वाढतो तेव्हा पाऊस पडतो. याच कारणामुळे या मंदिराला मान्सून मंदिर म्हटले जाते. मंदिराच्या गाभाऱ्यात छतावर लावलेल्या दगडाला मान्सून दगड म्हणतात कारण यामधून पाणी टपकते. हा दगडही विशेष प्रजातीचा नसून एक सामान्य दगड आहे.

X