आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आध्यात्मिक:ईश्वराला शरण गेल्याने मनातील संशय मिटतात, आजच्या या बिकट परिस्थितीत हाच शेवटचा उपाय आहे

9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

ठाकुर, तुम शरणाई आया।
उतर गयो मेरे मन को संसा। जब ते दर्शन पाया। असे गुरुनानकांचे एक पद आहे.
गुरुनानक देवजी म्हणतात की, ठाकूर, मी तुम्हाला शरण आलो आहे. तुम्हाला शरण येताच माझ्या मनात असलेल्या शंका, प्रेम, अंधकार किंवा द्विधा स्थिती तुमच्या दर्शनाने संपली. मी तुम्हाला शरण आलो आणि माझ्या मनातील सर्व चिंता शांत झाल्या. भगवद्गीतेच्या संदर्भात विचार केल्यास ती संशय संपवते. तुम्हाला शरण येताच माझा संशय दूर झाला, कारण मला तुमचे दर्शन झाले.

गुरुनानक देव पुढे म्हणतात की, ‘मला काही सांगावे लागले नाही. तुम्ही माझी व्यथा जाणून घेतलीत. माझ्याकडून नामस्मरण सुरू करून घेतले. परिणामी माझी दुःखे पळून गेली. पावसाळ्यात तलावातील चिखलात अनेक बेडके उड्या मारत असतात. त्याच तलावातील पाण्यात एखादी म्हैस अंघोळीसाठी उतरली तर सर्व बेडके उड्या मारून बाहेर पडतात. दुःख म्हणजे काय आहे? गोंधळ करत उड्या मारणारे आपल्या जीवनातील छोटे-मोठे बेडूक. काय करावे? तुम्ही प्रयत्न करूनही बेडकांना बाहेर काढू शकत नाहीत. तुम्ही माझ्याकडून नामस्मरण सुरू करून घेतले आणि मला सहज सुखाची प्राप्ती झाली. मी भगवद्गीतेतून सुखाची अगदी साधी व्याख्या सांगतो. या जगात सुखी कोण आहे? कोण सहज सुखी आहे?

शक्नोतीहैव य: सोढुं प्राक् शरीरविमोक्षणात्।
कामक्रोधोद्भवं वेगं स युक्त: स सुखी नर:।।

आपल्यासारख्या सांसारिकांसाठी सहज सुखाची यापेक्षा मोठी व्याख्या कोणती असू शकते? हे शरीर सोडण्याआधी जो काम आणि क्रोधाचा तीव्र वेग सहन करत संयम ठेवतो तो साधक सहज सुखी असतो. मृत्यूआधी, शरीर सोडण्यापूर्वी किती अवस्था आहेत? प्रथम बालपण, नंतर पौंगडावस्था, तारुण्य आणि मग म्हातारपण येते. देह सोडण्यापूर्वी सर्व अवस्थांत ज्यांनी काम-क्रोधाचा वेग सहन केला आणि गुरुकृपेने या आवेगांना आनंदाने रोखले, ते सुखी आहेत.

सूरदासजी दृष्टिहीन होते. त्यांच्या बाबतीत मी ऐकले आहे की ते कृष्णाचे गुणगान करत जात होते. रस्त्यात एक खोल विहीर होती. याच रस्त्यावरून वेगाने सूरदासजी जात असल्याने त्या विहिरीत पडण्याची पूर्ण शक्यता होती. भगवान बाळकृष्णाला वाटले की, सूरदास विहिरीत पडले तर माझी इभ्रत राहणार नाही. अर्ध्या रात्री सूरदासजींची काठी पकडून भगवान बाळकृष्ण त्यांच्याशी गप्पा मारू लागले, असे म्हणतात. सूरदासांना आश्चर्य वाटले की, नेहमी तर एकही जण भेटत नाही आणि आज हे बालक मला घेऊन जात आहे. त्याचा आवाजही किती मधुर आहे. सूरदासजी विहिरीत पडू नयेत, हा श्रीकृष्णाचा हेतू होता. पण त्यांच्याशी बोलताना सूरदासांच्या लक्षात आले की हे सामान्य बालक नाही. काठीवरील हात सरकवत सरकवत या बालकाचा असा हात पकडावा की पुन्हा सोडायचाच नाही, असा त्यांनी विचार केला. हे माझे माधव आहेत. भगवान कृष्ण मनातल्या मनात हसत होते की हा मला पकडू इच्छितो! तेवढ्यात ती विहीर मागे पडली आणि सूरदासांना राहावले नाही. त्यांनी घाईने हात पकडण्याचा प्रयत्न केला, पण हात सोडवून कृष्ण निघाले. सूरदासांच्या डोळ्यांत पाणी आले. ते म्हणाले, ‘बांह छुड़ाके जात हो निर्बल जानके मोही।’ तुम्ही कोण आहात, हे मी ओळखले. मी अंध, अशक्त असल्याने तुम्ही माझा हात सोडून निघून जात आहात. परंतु, माझे हृदय सोडून जाऊ शकलात तर मी तुम्हाला बलवान समजेन. मग अगदी मनमोकळे हसत श्रीकृष्ण सूरदासांना आलिंगन देतात.

ईश्वराला शरण गेल्याने मनातील संशय मिटतात. चला, आपण या परमतत्त्वाला शरण जाऊ, त्याच्या दर्शनाने मनाला संशयमुक्त करू. काहीही न सांगता आपल्या व्यथा जाणणारे ते भगवान आहेत. त्यांनी कृपा करून आपल्याकडून नामस्मरण करून घेतले तर आपली दुःखे दूर होतील, आपल्याला सहज सुख मिळेल. आजच्या या बिकट परिस्थितीत शेवटचा उपाय काय आहे? ‘तुला शरण आलोय. ईश्वरा, तू माझी प्रत्येक शंका, भीती, द्विधा स्थिती न सांगता जाणतोस. माझा हात पकडून मला वाचव.’

मोरारी बापू, आध्यात्मिक गुरू आणि राम कथाकार

बातम्या आणखी आहेत...