आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

सकारात्मक:आपण स्वीकारणे शिकतो तेव्हा जीवन उत्सव होते

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • आपल्यावर संकट येण्याआधीच त्याचे समाधानही सुनिश्चित असते, यावर पूर्ण विश्वास ठेवा. रामायण ही शिकवण देते...

माझ्या तरुण बंधू-भगिनींनो, अग्नी जर समस्या असेल तर पाणी उपाय आहे. कुठे आग लागली असेल, तर त्यावर काय उपाय आहे? रडणे? नाही. नैराश्याच्या गर्तेत बुडणे? नाही. पळून जाणे? नाही, हे तर पलायन झाले. त्यावर उपाय काय हा प्रश्न कायमच आहे. उत्तर आहे पाणी. रोगावर उपाय म्हणजे आरोग्य. खूप थंडी वाजत असेल तर त्यावर उष्णता हा उपाय आहे. पण, आणखी एक तत्त्व म्हणजे मन. मनाच्या समस्येवर दुसरा कुठला उपाय नाही, फक्त मन हाच उपाय. मनात नकारात्मक भाव असतात तसे सकारात्मकही आहेत. आपण नकारात्मक बोलणे टाळावे. आपण अस्वीकाराचा नव्हे तर स्वीकाराचा मंत्र ग्रहण करणे गरजेचे आहे. जेव्हा आपण स्वीकार करण्यास शिकतो, तेव्हा जीवन उत्सव होतो. रहीम यांचा खूप सुंदर दोहा आहे-रहिमन रोष न कीजिए, कोई कहे क्यूं है? हंस कर उत्तर दीजिए, हां बाबा यूं है।

आपण सकारात्मक चिंतनाच्या मार्गावरील प्रवासी व्हावे, सकारात्मक विचार करावा. सत्याकडे पाठ करू नये, त्याला सामोरे जावे. प्रेमापासून विन्मुख व्हायचे नाही, करुणेपासूनही नाही. त्यांच्या ज‌वळ जायचे आहे. हनुमान काय आहेत? सकारात्मकतेचा पर्याय. हनुमानांना समजून घेण्याआधी शब्दार्थ-भावार्थ समजून घेऊ. हनुमानाचे पहिले अक्षर आहे ‘ह.’ ‘ह’चा अर्थ आहे सकारात्मकता. म्हणजे जीवनात सकारात्मकता यावी. आता हनुमानांचे चरित्र समजून घेऊ. हनुमान सकारात्मक आहेत. त्यांना समजून घ्यायचे असेल तर ‘ह’ समजून घ्या. भगवान श्रीरामांनी जे म्हटले, त्याला ‘हो’ म्हणणे. तुम्ही सकारात्मकतेकडे गेले, तसे विचार अंगीकारले तर हनुमान जवळ येतील.

आपल्यावर एखादे संकट, आपत्ती येण्याआधीच त्यावरील समाधानही सुनिश्चित होते, हा दृढविश्वास हवा. रामायण हीच शिकवण देते आणि आपण समस्या उद्भवली की समाधानाच्या शोधात धावत सुटतो. अस्तित्वाचा नियमच आहे-ईश्वर जर पाण्याची निर्मिती करत नसेल तर त्याला तहान निर्मिती करण्याचाही अधिकार नाही; ईश्वर अन्नाची व्यवस्था करत नसेल तर त्याला आपल्याला भूक देण्याचाही अधिकार नाही. म्हणजे ईश्वर समस्येच्या आधीच त्यावरील उपाय निश्चित करतो. समस्या उद्भवल्यास आसपास पाहू नका, वर पाहा, वर एखाद्या सद्गुरूचा हात असेल... ही सर्व विश्वासाची गोष्ट आहे. ते गणिती सूत्रासारखे सिद्ध करू शकत नाही. हे तर ज्याने अनुभवले, तोच ‘इति सिद्धम’ म्हणू शकतो. हा हिशेब खूप फायद्याचा आहे. आनंदाने झोपी जाणे आणि उत्साहाने दिवसाचा श्रीगणेशा.

माझ्याकडे तरुण येतात. जिज्ञासेने प्रश्न विचारतात. मी त्यांना एवढेच म्हणतो की, ए‌वढे निराश आणि दु:खी का? हा जीवनात प्रसन्न राहण्याचा क्षण आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा. जी व्यक्ती रात्री आनंदाने झोपते आणि सकाळी उत्साहाने जागी होते ती आध्यात्मिक आहे. आता प्रश्न असा आहे की, आध्यात्मिक व्यक्ती कशी ओळखायची? टिळा लावा, मन आनंदी ठेवा. आता टिळ्याने आध्यात्मिकता येते का? नाही. पण, जी व्यक्ती सर्व कामे करून रात्री समाधानाने झोपते आणि सकाळी उठताना आनंद-उत्साहाने परिपूर्ण असते, ही अवस्था आध्यात्मिकता आहे. ही नकारात्मक विचार, भावनाच्या हिंदोळ्यांतून स्वत: बाहेर पडत सकारात्मकतेत बदल करण्याची विद्या आहे. खूप फायद्याचा सौदा आहे हा, रोज निरीक्षण करण्याची अशी सवय लावा. म्हणजे आपण समाधानाने झोपतो का? हे आपण स्वत: पाहायला हवे. युवावस्था आनंदी राहण्याची अवस्था आहे. त्यात परस्परांबद्दल प्रेम, समर्पण असावे. तीत नकारात्मक विचार खूप गोंधळ निर्माण करतात. ‘समाधानाने झोपा आणि उत्साहाने जागे व्हा,’ हे वाक्य मंत्रासारखे लक्षात ठेवा. कुठला टिळा लावण्याची, माळ जपण्याची गरज नाही. हे झाले तर ठीकच, अन्यथा कुठलीही समस्या नाही. आपले तुरुण, विचार-मंथन करतात, ही चांगली गोष्ट आहे. पण, सुखी, प्रसन्न, आनंदित राहणे-न राहणे हेही आपल्याच हातात आहे, हेही लक्षात ठेवा. याच क्षणी जीवनात सुधारणा करा, उशीर करू नका.

मोरारी बापू
आध्यात्मिक गुरू आणि राम कथाकार

0