आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवदुर्गा:शैलपुत्री देवीची पूजा केल्याने मिळते शक्ती आणि सर्व इच्छा पूर्ण करते देवी सिध्दिदात्री, नऊ दिवसांचा पूजन विधी

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अश्विन मासातील शुक्ल प्रतिपदेपासून नवमी तिथीपर्यंत शारदीय नवरात्रीचा उत्सव साजरा केला जाईल. या वर्षी शारदीय नवरात्रीची सुरुवात 17 ऑक्टोबर शनिवारपासून झाली असून 25 ऑक्टोबर रविवारी समापन होईल. नवरात्रीमध्ये देवीच्या विविध रूपांची क्रमानुसार पूजा केली जाते. जाणून घ्या, नवरात्रीमध्ये कोणत्या दिवशी देवीच्या कोणत्या स्वरुपाची पूजा केली जाते...

मार्कंडेय पुराणात नऊ देवीचा श्लोक
प्रथमं शैलपुत्री च द्वितीयं ब्रह्मचारिणी। तृतीयं चन्द्रघण्टेति कूष्माण्डेति चतुर्थकम्।।
पंचमं स्कन्दमातेति षष्ठं कात्यायनीति च। सप्तमं कालरात्रि महागौरीति चाष्टमम्।।
नवमं सिद्धिदात्री च नवदुर्गाः प्रकीर्तिताः। उक्तान्येतानि नामानि ब्रह्मणैव महात्मना।।

देवी शैलपुत्री - नवरात्रीच्या पहिल्या दिवशी शैलपुत्री देवीची पूजा करावी. मार्कंडेय पुराणानुसार देवीचे नाव हिमालय राजाच्या येथे जन्म झाल्यामुळे पडले आहे. ही निसर्ग स्वरूपा देवी आहे. हिमालय आपल्या शक्ती, दृढता व स्थिरतेचे प्रतिक आहे. स्त्रियांनी या देवीची पूजा करणे श्रेष्ठ आणि मंगलकारी आहे. नवरात्रीच्या दिवशी योगी महात्मा आपली शक्ती मूलाधार केंद्रामध्ये स्थित करून योग साधना करतात.

देवी ब्रह्मचारिणी - नवरात्रीच्या दुसर्या दिवशी ब्रह्मचारिणी देवीची पूजा करावी. ब्रह्माला आपल्या अंतकरणात धारण करणारी देवी भगवती ब्रह्मला संचालित करते. ऊं ऐं ह्रीं क्लीं चामुण्डायै विच्चे हा महामंत्र ब्रह्मचारिणी देवीने प्रदान केला आहे. योग शास्त्रामध्ये ही शक्ती स्वाधिष्ठान चक्रामध्ये स्थिती असते. सर्व ध्यान स्वाधिष्ठान चक्रामध्ये केल्यास ही शक्ती बलशाली होते आणि सर्वठिकाणी साधकाला सिद्धी व विजय प्राप्त होतो.

देवी चंद्रघंटा - नवरात्रीच्या तिसर्या दिवशी चंद्रघंटा देवीची पूजा केली जाते. या देवीच्या डोक्यावर घंटेच्या आकाराचा देदीप्यमान चंद्र विराजमान आहे. यामुळे या देवीला चंद्रघंटा म्हणतात. ही देवी दशभुजा आहे. देवीच्या उजव्या चारपैकी एका हाताची अभयमुद्रा, तर उर्वरित तीन हातांत धनुष्य, बाण आणि कमळपुष्प आहे. पाचवा हात गळ्यातील माळेवर आहे. तिच्या डाव्या हातांमध्ये कमंडलू, वायुमुद्रा, खङ्ग, गदा आणि त्रिशूळ आहे. गळ्यामध्ये फुलांचा हार, कानात सोन्याचे आभूषण, डोक्यावर मुकुट, वाहन सिंह आहे. ही देवी दुष्टांचा नाश करून भक्तांचे रक्षण करणारी आहे. त्यामुळे या देवीची उपासना करणारा पराक्रमी, निर्भय होतो. भक्ती व मुक्ती मिळवण्यासाठी या देवीची पूजा केली जाते.

देवी कूष्मांडा- नवरात्रीच्या चौथ्या दिवशी कूष्मांडा देवीची पूजा करावी. अष्टभूजा देवीचे हे स्वरूप, जिने आपल्या अठरा हातांत अठरा प्रकारची आयुधे धारण केली आहेत. आपल्या स्मित हास्याने कुष्मांडा देवीने ब्रह्मांडाची निर्मिती केली होती. कूष्मांडा देवीच्या पूजनाने आपल्या शरीरातील अनाहत चक्र जागृत होते. या देवीच्या उपासनेने संसारातील जेवढी काही अभिलाषा आहे, ती पूर्ण होते. या देवीला तृष्णा आणि तृप्तीचे कारण मानले गेले आहे.

देवी स्कंदमाता - नवरात्रीच्या पाचव्या दिवशी स्कंदमाता देवीची पूजा केली जाते. स्कंदकुमारला पुत्र रुपात जन्म देवून आणि तारकासुराचा वध करण्यामध्ये कारक सिद्ध झाल्यामुळे या देवीला जगतमाता म्हटले जाते. या दिवशी साधकाने विशुद्ध चक्रामध्ये ध्यान लावावे, यामुळे परम शांती आणि सुखाचा अनुभव होईल.

देवी कात्यायनी - नवरात्रीच्या सहाव्या दिवशी कात्यायनी देवीची पूजा केली जाते. महर्षी कात्यायन ऋषींच्या घरी कन्येच्या रूपाने जन्म घेतल्याने कात्यायनी म्हणतात. देवीने आश्विन शुक्ल दशमीला महिषासुराचा वध केला. या देवीच्या उपासनेचे फळ धर्म, अर्थ, काम, मोक्ष सहज व सुलभ मिळवता येते.

देवी कालरात्री - नवरात्रीच्या सातव्या दिवशी कालिका देवीची पूजा केली जाते. कालरात्री देवीच्या शरीराचा रंग अंधार्या रात्रीप्रमाणे काळा, डोक्यावरील केस विखुरलेले आणि गळ्यात चमकणारी माळ आहे. म्हणून या देवीला कालरात्री म्हणतात. या देवीच्या श्वासातून अग्नीच्या ज्वाळा निघतात. या चतुर्भुज देवीचे वाहन गाढव. उजव्या एका हाताची अभय व दुसर्याची वरमुद्रा आहे. एका डाव्या हातात लोखंडाचा काटा व दुसर्या हातात तलवार आहे. उग्र स्वरूप असूनही शुभ फळ देणार्या या देवीला शुभंकरी म्हणतात.

देवी महागौरी - नवरात्रीच्या आठव्या दिवशी पूजल्या जाणार्या या देवीचा गौरवर्ण आहे. श्वेत वस्त्रे व आभूषणे धारण करते. त्यामुळे या देवीला महागौरी म्हणतात. या देवीची आयुर्मर्यादा आठ वर्षे मानली जाते. या चतुभरुज देवीच्या उजव्या एका हाताची वरमुद्रा व दुसर्या हातात त्रिशूळ आहे. एका डाव्या हातात डमरू व दुसरा हाच अभयमुद्रेत आहे. देवीचे वाहन वृषभ (बैल) आहे. या देवीच्या उपासनेने सर्व प्रकारचे शीघ्र फळ मिळते, पूर्वजन्मीच्या संचित पापांचा विनाश होऊन मनोरथ सिद्ध होतात.

देवी सिद्धिदात्री - नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी सिद्धिदात्री देवीची पूजा केली जाते. देवी सिद्धिदात्री भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करते. शक्ती पूजनाचा हा शेवटच्या दिवस असल्यामुळे याचे विशेष महत्त्व आहे. हे देवीचे विराट रूप आहे, ज्यामध्ये पृथ्वी, आकाश सर्वकाही सामावलेले आहे.

बातम्या आणखी आहेत...