आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ओशो शिवसूत्र - श्रावणी सोमवार:ओशो तत्वज्ञानात श्रीकृष्णाच्या बासरीमधील सुरांची अनुभूती

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रेम, आनंद आणि ध्यान हीच समाधानी जीवनाची मूल्ये आहेत. त्यातून हिंसा टाळता येते आणि युद्धही जिंकता येते. ओशो यांच्या सम्यक तत्त्वज्ञानामुळेे विश्वाला प्रेरणा मिळाली. या तत्त्वज्ञानाचे बीज शिव-सूत्राशी जोडले गेले आहे. म्हणून तर समाजाला जागतिक स्तरावर मानव कल्याणासाठी आवर्जून शिव-सूत्रांची आवश्यकता वाटते.

साक्षात भगवान श्रीकृष्ण बासरी वाजवू लागले आहेत, अशा कर्णमाधुर सूरांची प्रत्यक्ष अनुभूती ओशो यांची प्रवचने ऐकताना मला मिळते, असं ओशो यांच्या तत्त्वज्ञानाबद्दल प्रख्यात कवी मंगेश पाडगावकर यांनी म्हटलंय. कवी गुलजार म्हणतात, आम्हाला काव्य रचावे लागते. पण, ओशो यांच्या वाणीतून जे निघतं ते सर्वच काव्यबद्ध असतं. प्रख्यात पत्रकार खुशवंतसिंग यांनाही ओशो यांच्या ‘गुरुनानक वाणी’ मालिकेतील प्रवचने प्रचंड भावली होती. जो स्वत:ला पूर्णपणे ओळखू शकतो, तो जगाला सहज ओळखू शकतो. इतक्या सोप्या पध्दतीच्या ओशो यांच्या अर्थगर्भीत तत्त्वज्ञानाचे दर्शन त्यानी मांडलेल्या शिव-सूत्र संकल्पनेत घडते. स्वत्व ओळखणे आणि शिव-सूत्र परिमाणाच्या आधारे जग ओळखण्याच्या प्रक्रियेतून मानवी कल्याणाच्या विचारांची देवाण-घेवाण सुलभ होते, असा त्यांचा आत्मविश्वास होता. जगातील सर्व धर्मांच्या पाखंडी विचारांवर एकीकडे ओशो घणाघाती हल्ला चढवतात. दुसरीकडे त्याच धर्मांमधील चांगल्या मूल्यांची ताकदीने मांडणीही करताहेत. हे आपण समजून घ्यायला हवे. अशा विचारांमधून समाजाला स्वदृष्टिकोनाचे वैश्विक स्तरावर एक परिमाण मिळाले आहे. जगातल्या दीन-दुबळ्या अज्ञानी समाजाला प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष वैचारिक गुलाम बनवू पाहणाऱ्या धर्मगुरूंना ओशोंनी अभेद्य तत्त्वज्ञानाच्या आधारावर नागडे केले. स्वार्थी धर्मगुरूंनी आंधळे केलेल्या समाजाला इतकी परखड विचारसरणी पटणे ओशो यांच्या हयातीत शक्य नव्हते. आता भारतीय समाज जागा होतो आहे. जगातील समाज अभ्यासक व तत्त्वज्ञानातील संशोधकांना ओशो यांचे विचार खुणवताहेत.

उच्चशिक्षित भारतीय समाज आणि प्रामुख्याने युवा वर्ग मोठ्या प्रमाणात त्यांच्या तत्त्वज्ञानाच्या विचारांची कास धरतोय. ओशो म्हणताहेत, अंगण कितीही चांगले असूद्या. तुम्हाला नाचताच येत नसेल तर त्या प्रशस्त अंगणाचा काय दोष? म्हणून शिकणं आणि शिकण्याकडे प्रवृत्त होणं महत्त्वाचं. शिव-सूत्र ध्यानयोगासाठी त्रयस्थ शिक्षकाचा उपयोग शून्य. ते तुम्हाला स्वत:ला शिकावं लागणार आहे. स्पर्धा आणि इर्षा यांच्या पलीकडे जाऊन तुम्हाला स्वत:साठी सिध्द व्हावं लागणार आहे. तुमच्या आणि पर्यायाने समाजाच्या हितासाठी हेच उचित आहे. तुम्हीच तुम्हा स्वत:ला प्रेमपूर्वक अलिंगन देता आलं पाहिजे. मग पाहा... तुमच्यातल्या उणिवा, जाणिवा, प्रेरणा आणि आत्मविश्वासाची पुष्पकमले श्रावणातल्या मनमोहक निसर्ग हिंदोळ्यावर कशी डोलू लागतात ते! महासागरात सामावलेल्या प्रत्येक नदीला स्वत:चं अस्तित्व गमवावं लागतं व सागरमय व्हावं लागतं. त्याप्रमाणेच विविध धर्मांच्या तत्वज्ञानांचे असंख्य सात्विक प्रवाह ओशो यांच्या शिव-सूत्रात प्रवचनात दिसतात.

माझे विचार आंधळेपणाने स्वीकारू नका : मी मांडलेल्या विचारांचा आंधळेपणानेे स्वीकार करणारा, माझा साधक कधीच होऊ शकत नाही. इतक्या टोकाची निखळ भूमिका ओशो यांची असायची. कारण ज्याला स्वयंप्रेरणेने मनस्वी भावनेतून स्वत:ला ओळखण्याची इच्छा आहे, त्यानी तो शिव-सूत्रांच्या आधारे तपासून पहावा. शिव-सूत्र हे ध्यानसाधनेचे एक साधन आहे. प्रत्येक माणूस या आधारे स्वत्वाचा शोध घेऊ शकतो, अशी माझी धारणा आहे. तुम्ही माझे तत्त्वज्ञान खोडून काढले तरी चालेल पण तुम्ही तुमच्यातील स्वत्व शोधा. गरज वाटल्यास माझ्या विचारात सुधारणा करा किंवा स्व:तत्त्वज्ञान विकसित करा, असे ओशो सांगताहेत.

यशवंत पोपळे, सोलापूर

बातम्या आणखी आहेत...