आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ओशो शिवसूत्र श्रावणी सोमवार:ध्यानयोग म्हणजे काजव्यांप्रमाणे स्वयंप्रकाशित होण्याचा सर्जनशील मार्ग

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तुम्ही कितीही अब्जाधीश असाल अथवा भीकेकंगाल. अपंग असाल किंवा धडधाकट. बुध्दिवान असाल वा सामान्य! तुमच्या मनाचा आरसा इतरांना कधीच होता येणे शक्य नाही. स्वार्थी धर्मगुरूंकडून मात्र तुमच्या मनातील सत्य आणि असत्य आम्ही जाणतो, त्या समस्यांचे उपायही सांगतो, असे बिंबवून स्वार्थासाठी तशी समाजव्यवस्था निर्माण करण्यात सामूहिक प्रयत्न होत आले आहेत. अशाने वर्षानुवर्षे सामाजिक शोषणापलीकडे काय साध्य झाले आहे? ते होऊ नयेत म्हणून तुम्हीच तुमच्या अंतरंगाचा आरसा व्हा, असा आग्रह ‘शिव-सूत्र’च्या संकल्पनेतून ओशो मानवी कल्याणासाठी धरताहेत.

ओशो म्हणतात, स्वत:ला ठरावीक अंतरावरून आरशात पाहिले तर आपण आहे तसे दिसू. आरसा अगदी नाकाला लावून पाहिल्यास तुम्हालाच तुमचा चेहरा ओळखता येणार नाही. इतके बेढब दिसाल. मग कशाला अशा विवेकवांझ स्वार्थी धर्मगुरूंच्या पालखीचे वाहक होता? तुम्हालाच तुमचे अंतरंग शोधायचे आहे. तुम्ही कोणत्याही धर्म, देश, विचार अथवा समूहाचे असलात तरी चालेल. दररोज किमान पाऊण तास एका ठिकाणी स्थिर बसून निर्विचार होण्याचा प्रयत्न करा. तेव्हाच तुम्ही काजव्यांप्रमाणे स्वयंप्रकाशीत व्हाल. श्रध्दा-अंध्दश्रध्दा किंवा आस्तिक-नास्तिकतेचे हे विचार नव्हेत. तुमच्या आंतरशक्तीचे मोजमाप करणारी ध्यानयोग साधनेतील शिव-सूत्र ही सशक्त संकल्पना आहे. यंत्रागत दैनंदिन कामे करत राहण्याला तसा शून्य अर्थ आहे. अशाने तुम्ही पैसे कमवाल. भौतिक सुख खरेदी कराल. खूप चैन कराल. पण समाधानाचे काय? ते तर जगातल्या कुठल्याच बाजारपेठेत मिळत नाही. अन्न, वस्त्र आणि निवारा या तीनही मूलभूत गरजांहून महत्त्वाच्या मन:शांतीचा आनंद तुम्ही (अर्थात समाज) कधी घेणार?

शिव-सूत्र संकल्पनेचे सर्जनशील स्वाध्यायी व्हा; पाहा तुमच्यातील चैतन्याचा झरा कसा वाहू लागेल तो. अथांग स्थिर महासागरापेक्षा एखाद्या छोट्या वाहत्या झऱ्याला उगीच का महत्त्व असते? आत्म्याचे पहिले तळ म्हणजे तुमचे मन. दुसरे, तुमचा आत्मा आणि तिसरे तळ म्हणजेच परमात्मा. जे दैनंदिन सातत्याच्या ध्यानयोग साधनेच्या उजळणीमुळेच गाठता येऊ शकते. दिवसातला काही काळ सचेतन अवस्थेत सर्वस्व विसरण्याची ताकद तुम्हाला साध्य करावी लागेल. त्याशिवाय ना मनाचा तळ गाठता येईल, ना आत्म्याचा शोध घेता येईल. ना ही परमात्म्यापर्यंत पोहोचता येईल! तुम्ही स्वत:ला शोधलात तर अमुक देश-धर्म-विचार-समूहाच्या मागे लागू नका, असे तुम्हाला सांगण्याची हिंमत कोण करेल? स्वत:च्या ओंजळीने पाणी प्यायला शिका. स्वत:चा खांदा इतरांच्या विखारी विचारांच्या बंदुकांसाठी देऊ नका, असे ओशो सांगताहेत.

तुम्ही सतत ‘माझे-माझे’पणाचे रडगाणे सोडा. सहानुभूती मिळवण्याच्या प्रयत्नात तुम्ही तुमचीच फसवणूक का करून घेता? या भूतलावर केवळ मनुष्यालाच ‘मन’ हे प्रेरकवृत्ती विकसित करण्याचे नैसर्गिक वरदान लाभले आहे. अन्यथा स्वार्थी जगात आपण एकमेकांची फसवणूक करत राहू. असेच ‘शिव-सूत्र’ सांगते.

विस्मृती-विवेक-अस्तित्व : परस्परसंबंध
विस्मय म्हणजेच विस्मृती. ही योगाची मुख्य भूमिका आहे. त्याशिवाय स्वत:च्या स्थिर अंतरंगाची सर्वशक्तिमान ओळख शोधता येणार नाही. वितर्क म्हणजे विवेक. हे आत्मज्ञान शोधण्याचे साधन आहे. आपल्या अस्तित्वाचा आनंद घेणे म्हणजेचे समाधी. एकीकडे निरक्षर माणूसही केवळ सांगण्या-बोलण्यातून हे सहज शिकू शकेल. दुसरीकडे स्वत:ला बुध्दिवान समजणारे तथाकथित स्वार्थी धर्मगुरूही शिव-सूत्राचा आपापल्या सोयीचा अर्थ लावून सामान्य लोकांचे शोषण करत राहतील. त्यासाठी सजग शिव-सूत्र स्वाध्याय करणे ही मानवाची गरज आहे, असे ओशो आवर्जून सांगताहेत.

यशवंत पोपळे, सोलापूर

बातम्या आणखी आहेत...